१. साधकाला स्वप्नात दिसलेले दृश्य
१ अ. स्वप्नात सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांच्यावर समष्टी आक्रमण झाले असून साधकाने त्यांचा हात धरून त्यांना साहाय्य करणे : ‘२३.२.२०२२ या दिवशी मी रात्री झोपल्यावर मला स्वप्नात पुढील दृश्य दिसले. ‘सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांच्यावर समष्टी आक्रमण झाले आहे. त्यांचा चेहरा पूर्णपणे सुजला आहे. त्यांचा चेहरा इतका भयंकर झाला होता की, ‘ते सद्गुरु काका आहेत’, असे वाटत नव्हते. ते म्हणत होते, ‘कुणीतरी माझा हात पकडा !’ ‘मला काहीही झाले तरी चालेल; पण संतांना काही व्हायला नको’, असा विचार करून मी त्यांचा हात घट्ट पकडला.
१ आ. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांच्या हाताला स्पर्श केल्यावर साधकाला चक्कर येऊ लागणे आणि सद्गुरु काकांनी साधकाचे बोट धरून त्याला वाचवणे : मी सद्गुरु काकांच्या हाताला स्पर्श केल्यावर मला चक्कर येऊ लागली. माझा तोल जात होता. ‘तशाही परिस्थितीत संतांना वाचवायचे’, असा विचार माझ्या मनात होता. मी त्यांचे हात सोडले नाहीत. ‘माझा जीव जाईल’, असे मला वाटत असतांना सद्गुरु काकांनी माझे मधले बोट (मध्यमा) धरले. मी प.पू. भक्तराज महाराज यांचा जयघोष करून परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे नाव उच्चारले.’
१ इ. मला जाग आली, तेव्हा पहाटेचे ३ वाजले होते. त्या वेळी माझे मधले बोट एकदम गरम झाले होते आणि त्याला मुंग्या आल्या होत्या.
२. सद्गुरु काकांनी ‘तू मला वाचवलेस’, असे म्हणणे आणि त्यातून त्यांचा अहं अत्यल्प असल्याचे लक्षात येणे
मी सद्गुरु काकांना स्वप्नाविषयी सांगितल्यावर ते मला म्हणाले, ‘‘मला आज पहाटे भयंकर जुलाब झाले आणि पोटात वेदना होत होत्या. तू मला वाचवलेस.’’ प्रत्यक्षात संतच साधकांचे २४ घंटे रक्षण करत असतात. त्या वेळी सद्गुरु काकांचा अहं अत्यल्प असल्याचे माझ्या लक्षात आले.’
– श्री. चेतन हरिहर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२४.२.२०२२)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |