श्री गणेशाची कृपा संपादन करूया !

श्री गणेशाचे आगमन होणार आहे, त्यासाठी पूर्वसिद्धता चालू आहे. श्रींच्या आगमनापासून ११ दिवस श्री गणेशतत्त्वाचा लाभ घेण्याची अमूल्य संधी श्री गणेशानेच भक्तांना दिली आहे. या देवतेविषयी असलेल्या भावामुळे भक्त तिच्या आगमनाच्या आधीपासून ते विसर्जनापर्यंत पाहुणचारात काही न्यून पडायला नको, यासाठी पुष्कळ सिद्धता करतात. यासमवेतच श्री गणेशाच्या कृपेचा लाभ करून घेण्यासाठी काय करायला हवे  ? आणि काय टाळायला हवे ? हे पहाणेही आवश्यक आहे.

श्री गणेशाची दैनंदिन पूजा आणि आरती झाल्यावर उर्वरित वेळ ‘इकडच्या – तिकडच्या वायफळ गप्पा मारणे’, ‘भ्रमणभाषवर गेम खेळणे’, ‘या कालावधीत घरातील अनेक कुटुंबीय एकत्र येत असल्याने जुने व्यावहारिक विषय उकरून काढून त्यावरून घरी क्लेश करणे’, ‘श्री गणेशाची स्थापना केलेल्या ठिकाणी श्री गणेशावरील गीते लावली की, ‘गणेशोत्सव असल्याप्रमाणे वाटते’, असे सांगणे; पण घरातील मंडळी मनाने दुसरीकडे असणे’ अशा प्रकारच्या कृती अनवधानाने होतात. यामध्ये अशा प्रकारचे वागणे श्री गणेशाला आवडेल का ? असा विचार सर्वांनी करायला हवा. आपण ‘प्रत्यक्ष श्री गणेश घरी आला आहे’, असा भाव ठेवून सर्व आरास करतो, तर आपण काय विचार करतो ? हेही तो पहात आहे, याकडेही लक्ष द्यायला हवे.

‘भाव तेथे देव’ या तत्त्वानुसार आपण दिवसभर श्री गणेशाच्याच अनुसंधानात रहायला हवे. यासाठी दिवसभर घरातील वातावरण प्रसन्न ठेवणे, सर्वांनी मनातल्या मनात ‘श्री गणेशाय नमः ।’ किंवा ‘ॐ गँ गणपतये नमः ।’ असा नामजप काही वेळ बसून आणि घरातील कामे करतांनाही करावा. मनामध्ये नकारात्मक विचारांना थारा देऊ नये. गणेशस्तोत्र, गणपति अथर्वशीर्ष म्हणणे. श्री गणेशाची आरती भावपूर्ण करणे. आपल्या अडचणी श्री गणेशाला सांगणे, भावपूर्ण प्रार्थना करणे आणि त्याच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करणे. यांसारखे प्रयत्न केल्यास मनातून आपण श्री गणेशासमवेत रहाणार. गणेशोत्सव घरगुती किंवा सार्वजनिक कुठेही असला, तरी तो शास्त्रोक्त पद्धतीने करूया. मंगलमूर्तीचा उत्सव खर्‍या अर्थी चैतन्यमय करून त्याची कृपा संपादन करूया.

– श्री. जयेश राणे, भांडुप, मुंबई.