संगीताकडे साधना म्हणून पहाणारे आणि ‘अध्यात्म हा भारतीय संगीताचा आत्मा आहे’, असे सांगणारे ठाणे येथील सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक पं. निषाद बाक्रे !

‘ठाणे येथील पं. निषाद बाक्रे हे शास्त्रीय संगीतातील नामवंत गायकांपैकी एक आहेत. त्यांनी डॉ. राम देशपांडे, पं. उल्हास कशाळकर, पं. दिनकर कैकिणी, डॉ. अरुण द्रविड आणि पं. मधुकर जोशी या गुरूंकडून संगीताचे शिक्षण घेतले आहे. ग्वाल्हेर, आग्रा, जयपूर या तिन्ही घराण्यांची गायकी आत्मसात् करून त्यांनी त्या घराण्यांचे एकत्रीकरण केले आणि त्यात कल्पकता अन् कलात्मकता आणण्याचा सुविद्य प्रयत्न केला आहे. पंडिता कै. केसरबाई केरकर शिष्यवृत्ती (एन्.सी.पी.ए.) यांसारखे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. शास्त्रीय संगीताच्या अनेक मैफिलीही त्यांनी भूषवल्या आहेत. ते ‘सुरंजन’ ट्रस्टचे संस्थापक असून याद्वारे ते शास्त्रीय संगीत जनमानसापर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्नरत आहेत. ‘दिन दिन आनंद’, हा प्रयोगशील कार्यक्रम त्यांनी चालू केला आहे. त्यामध्ये त्यांनी प्रकृती, समयचक्र आणि रागसंगीताचा परस्परसंबंध मांडला आहे. ‘एक कलाकार, संशोधक आणि गुरु’, अशी तिन्ही पदे भूषवत पं. निषाद बाक्रे यांनी शास्त्रीय संगीतातील उंची राखत कलाक्षेत्रात स्वत:चे अनन्यसाधारण स्थान निर्माण केले आहे.

जुलै २०१९ मध्ये महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संगीत समन्वयक सुश्री (कु.) तेजल पात्रीकर यांनी मुंबई-पुणे येथील संगीत क्षेत्रातील मान्यवर कलाकारांच्या भेटी घेतल्या होत्या. त्या वेळी त्यांनी पं. निषाद बाक्रे यांची भेट घेतली. त्या वेळी त्यांनी संगीतविषयक सांगितलेली मौलिक सूत्रे पुढे दिली आहेत.

१. संगीत आणि अध्यात्म 

पं. निषाद बाक्रे

१ अ. मूळ शास्त्रीय संगीत सत्त्वगुणप्रधान असले, तरी कलाकाराच्या कलेकडे पहाण्याच्या उद्देशानुसार ‘त्याचे गायन सत्त्वगुणी कि तमोगुणी आहे ?’, हे ठरत असणे : ‘शास्त्रीय संगीताचा खरा उद्देश आध्यात्मिक असला, तरी आता सगळेच तो उद्देश धरून काम करत नाहीत. शास्त्रीय संगीत गाणारे बहुतांश कलाकार हे सत्त्वगुणी आहेत; मात्र काही कलाकार तमोगुणप्रधानही असू शकतात. ‘एखादा कलाकार सत्त्वगुणी आहे कि तमोगुणी आहे ?’, हे त्याच्या कलेकडे पहाण्याच्या दृष्टीकोनावर अवलंबून असते. काही कलाकारांचा उद्देश ‘प्रमाणपत्र, मान, पैसा आणि प्रसिद्धी मिळवणे’, हा असतो. याउलट संगीताचा उद्देश आध्यात्मिक असेल, तर ते गायन सत्त्वगुणी असते. त्यामुळे आध्यात्मिक प्रगती होते. संगीताला ‘नादब्रह्म’ म्हटले आहे. त्यामुळे संगीताकडे साधना या अंगाने पहायला हवे.

१ आ. गायनाचा प्रतिदिन सराव केल्यावर त्यात परिपूर्णता येऊन गायन आध्यात्मिक स्तरावर जाणे : संगीत कार्यक्रमातील रंगमंचावर गायकाचा लागणारा ‘सा’ हा षड्ज (स्वर) त्याच्या अनेक वर्षांच्या सरावाचे फळ असते. वादकाच्या संदर्भातही असेच आहे. ‘तबला आज वाजवायचा ठरवला आणि तो वाजला’, असे होत नाही. तबल्याचा ‘धा’ कमवण्यासाठी एक ‘शारीरिक क्रिया’ आहे. त्याला ‘सराव’, असे म्हणतात. एखाद्याचा आवाजच सुरात लागत नसेल आणि तरीही त्याने राग गायचा प्रयत्न केला, तर ती क्रिया पूर्णत्वाला जाणार नाही. तेथे त्याचा सराव अपुरा पडतो. साधारणपणे वयोमानानुसार आवाज कंप पावतो; परंतु पं. भीमसेन जोशी किंवा किशोरीताई आमोणकर यांचे सूर त्यांच्या अखेरच्या मैफिलीपर्यंत चांगले होते. सध्याच्या कलाकारांचे विशिष्ट वयानंतर सूर लागत नाहीत. त्यासाठी सराव महत्त्वाचा आहे. सराव पूर्ण झाल्याविना कलाकार एका टप्प्यापर्यंत येत नाही. हा टप्पा पार केल्यावर पुढचे पाऊल म्हणजे अध्यात्म होय.

१ इ. भारतीय संगीताचा आत्मा अध्यात्म असणे : काही बंदिशी (टीप १) किंवा रचनांमधील काही शब्द ऐकायला चांगले वाटत नाहीत. ‘सांस’, ‘ननंदिया’, ‘पिया’ किंवा ‘सैय्या’ यांसारखे शब्द का वापरले गेले असावेत ? ‘हे शब्द आम्ही या रागासाठी म्हणून का गायचे ?’, असा प्रश्न मला पडतो. ‘संगीत ही गुरुमुखी विद्या असल्याने बंदिश जशीच्या तशी मांडणे’, हे शिष्य म्हणून गायकाचे कर्तव्य असते. त्यामुळे हे शब्द खटकत असूनही वापरावे लागतात. यात अजून एक विचार असा आहे, ‘शास्त्रीय संगीत ही एक कला आहे. कला म्हटल्यावर त्यात सौंदर्य (ॲस्थेटिक) आलेच पाहिजे.’ त्यामुळे काही शृंगारिक शब्द असणे आवश्यक आहे. त्यातून कलेचे कलापण टिकून रहाते. या शब्दांना एक विशिष्ट (खास) सौंदर्यपूर्ण वळण असल्याने कलात्मक दृष्टीने ते ऐकायला चांगले वाटतात; मात्र त्यांचा अर्थ लक्षात घेतला, तर तो रागाशी पूर्णपणे विसंगत (मिसमॅच) वाटतो; कारण मूळ भारतीय संगीताचा आत्मा अध्यात्म आहे.

टीप १ – शास्त्रीय गायनातील रागाचे स्वरूप स्पष्ट करणारे बोलगीत. यालाच ‘छोटा ख्याल’, ‘बंदीश’ किंवा ‘चीज’ असेही म्हणतात. ही मध्यलय किंवा दृत लयीत गातात.

२. मूळ धृपद (टीप २) गायकीची वैशिष्ट्ये, तिच्या पतनाची कारणे आणि ‘ख्याल’ (टीप ३) गायकी रूढ होण्याची कारणे

कु. तेजल पात्रीकर

टीप २ – भारतीय संगीतात ख्याल गायकी प्रचारात येण्यापूर्वी हे संगीत धृपद-धमार गायकीतच सामावलेले होते. त्या काळातील अत्यंत लोकप्रिय गायनशैली म्हणजे धृपद. धृपदाचे काव्य वीर, शांत, तसेच भक्तीरसपूर्ण असते.

टीप ३ – शास्त्रीय गायनातील रागाचे स्वरूप स्पष्ट करणारे बोलगीत.

२ अ. मुसलमानांच्या आक्रमणांमुळे मूळ ध्यानयुक्त अशा धृपद गायकीचे पतन होऊन समाजात ‘ख्याल’ गायकी रूढ होणे : धृपद गायन हे अधिक ध्यानयुक्त (मेडिटेटिव्ह) आहे. प्राचीनकाळी धृपद गायकी ही देवळातच गायली जात असे. धृपदाचे शब्दही देवतांविषयीच होते. त्यानंतर झालेल्या मुसलमानांच्या आक्रमणांमुळे ‘ख्याल’ गायन ही पद्धत रूढ झाली. त्यामुळे मूळ ध्यानयुक्त धृपद प्रकारापासून ती अल्पशा बहिर्मुखतेकडे, म्हणजेच ‘ख्याल’ गायन पद्धतीकडे वळली. गायनाची तत्त्वे तीच राहिली; परंतु त्यात मनोरंजन वाढले. आजच्या काळातील बहुतांश संगीत ओळखले जाते, ते ख्याल गायकीच आहे.

२ आ. धृपदाच्या आलापींमध्ये (टीप ४) ताल नसून ख्याल गायकी प्रचलित होण्यामागे ताल हे मुख्य कारण असणे : ख्याल गायकी प्रचलित होण्यामागे ताल हे मुख्य कारण आहे. धृपदाच्या रागगायनात आलापी घेतांना त्यात ताल नसतोच. केवळ ‘नोम तोम’ आलापी असते. याउलट ख्यालगायकी पूर्ण तालासह मांडली जाते. ताल अंग हे रंजक असून ते नाट्यनिर्मितीसाठी उपयोगी आहे. नृत्य हेही लय आणि ताल या अंगाचेच असते. त्यामुळे समाजात ख्याल गायकी प्रचलित झाली. मूळ आध्यात्मिक स्वरूप असणार्‍या भारतीय शास्त्रीय संगीताला आता मनोरंजनाचे स्वरूप आले आहे.

टीप ४ – संथ गतीत केलेला स्वरविस्तार

२ इ. धृपद गायकीत बुद्धीचा सूक्ष्म उपयोग होणे, तर ख्याल गायकीत स्थूल बुद्धीचा उपयोग अधिक होत असल्याने ती वर्तमान तरुण पिढीला आकर्षित करत असणे : ख्याल गायकी तालावर अवलंबून असते. यात सतत ‘सम’ (टीप ५) गाठायचे बंधन असल्याने त्याकडे बुद्धीने अवधान द्यावे लागते. ‘ताल आणि लय गाठणे’ यात बुद्धीचा वापर अधिक होतो. त्यामुळे तार्किक विचार करणार्‍या सध्याच्या तरुण पिढीला ख्याल गायकी अधिक आकर्षित करू शकते. धृपद गायनामध्ये त्या मानाने बुद्धीचा उपयोग स्थूलरूपात होतांना दिसत नाही. ‘धृपदमध्ये बुद्धी वापरली जात नाही’, असे नाही; मात्र बुद्धी सूक्ष्म स्तरावर वापरली जाते. कदाचित् याच कारणाने धृपद ही पद्धत सध्याच्या तरुण पिढीला तेवढी आकर्षित करू शकत नसावी.

टीप ५ – तालातील प्रमुख मात्रेस ‘सम’, असे म्हणतात. प्रत्येक तालात समेची मात्रा ही नेहमी पहिली असते.

३. पं. निषाद बाक्रे यांनी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाबद्दल काढलेले गौरवोद्गार !

३ अ. ‘सर्व कलांना त्यांच्या मूळ स्वरूपात आणणे आणि कलांचे पुनरुत्थान करणे’, हे महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे कार्य अद्वितीय ! : काही दिवसांपूर्वीच माझ्या मनात ‘भारतीय कलांना उत्थापन (प्रोत्साहन) देण्यासाठी काहीतरी करायला हवे’, असा विचार आला. आज ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’चे कार्य पहातांना मला पुष्कळ आनंद होत आहे. तुम्ही सर्व कलांच्या उत्थापनाचे कार्य करत आहात. संगीताला नादब्रह्म म्हटलेले आहे. संगीतात जग पालटण्याची क्षमता आहे. ‘संगीताकडे साधना म्हणून पहाणे’, हे तुम्ही शिकवत आहात आणि तेच महत्त्वाचे आहे.’

– सुश्री (कु.) तेजल पात्रीकर (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के, संगीत विशारद), संगीत समन्वयक, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, फोंडा, गोवा. (८.८.२०२२)