केळवण ते डोहाळेजेवण या समारंभांचे खरे मानकरी कोण ?

मुळात केळवण किंवा डोहाळेजेवण, हे करायची प्रथा कशासाठी आहे ? लग्नापूर्वी करतात, ते केळवण आणि गर्भारपणी करतात, ते डोहाळेजेवण ! सुप्रजा निर्माण होण्यासाठी बीज बलवान असावे, यासाठी केळवण करायचे असते, तर गर्भात वाढणार्‍या बाळाच्या योग्य पोषणासाठी डोहाळेजेवण करायचे असते. या दोन्हींतील भेद स्पष्ट करणारा लेख येथे देत आहे.

१. केळवण किंवा डोहाळेजेवण करण्यामागील कारण

‘तुळशीचे लग्न झाले आणि एका पुष्कळ जवळच्या मैत्रिणीच्या मुलीचे लग्न ठरल्याचे समजले. साहजिकच आम्ही सर्व मित्रमैत्रिणी मिळून तिचे केळवण करायचे ठरले. सगळ्यांना सोयीस्कर मुख्यत: मुलीला वेळ असेल, तो दिवस ठरवण्याचे काम माझ्याकडे आले; म्हणून मी नियोजित वधूला दूरभाष केला. दिवस निश्चित व्हायच्या आधीच तिचे चालू झाले, ‘‘मावशी केळवणात गोड काही नको हं ! माझी आवड विचारशील, तर पावभाजी किंवा पिझ्झाही चालेल किंवा असाच काहीतरी चांगला मेनू ठेवा.’’ मी डोक्यावर हात मारून घेतला.

मुळात केळवण किंवा डोहाळेजेवण करण्याची प्रथा कशासाठी आहे ? लग्नापूर्वी करतात, ते केळवण आणि गर्भारपणी करतात, ते डोहाळेजेवण ! विवाहानंतर प्रजनन करण्यासाठी शरीररूपी भूमी सिद्ध करायची असते. पती आणि पत्नी दोघांचेही बीज प्रजननक्षम व्हावे, इतकेच नव्हे, तर त्यातून सुप्रजा निर्माण होण्यासाठी बीज बलवान असावे, यांसाठी केळवण केले जाते. गर्भात वाढणार्‍या बाळाचे योग्य पोषण व्हावे, त्याच्या पेशींची वेगाने चालू असलेली पुनर्निर्मिती उत्तम व्हावी, तसेच मूल बलवान आणि बुद्धीमान व्हावे, यांसाठी डोहाळजेवण करायचे. दोन्ही कार्यात प्रजोत्पादन आणि पुनर्निर्माण करणार्‍या शुक्रधातूला बल देणे, हा महत्त्वाचा उद्देश आहे. दुधातुपाचे आणि गोड पदार्थ हे कार्य उत्तम करतात; म्हणून ‘या दोन्ही कार्यक्रमात मधुर भोजनाला प्राधान्य दिले जावे’, असा संकेत आहे.

२. दूध, तूप आणि गोड पदार्थ यांमुळे शुक्रधातू वाढणे अन् ‘जंक फूड’मुळे त्याचा घात होणे

आजकाल पूर्वीचे सगळे संकेत धाब्यावर बसवण्यातच आपण धन्यता मानतो. प्रथा गोड पदार्थांची आहे का ? मग आम्हाला ती नको. आम्ही तिखट, आंबट आणि चमचमीत खाणार ! मुळात ते गोड का खायचे ? हे तरी त्या लोकांपर्यंत कुणी पोचवते का ? सध्याच्या पिढीचे सगळे वेगळे असते. तिच्या मनाप्रमाणे होत असेल, तर ते ‘हो’ म्हणतील. ‘आपल्या पिढीसारखे ते थोडेच ऐकतात कुणाचे ?’, असे म्हणून संपूर्ण मोठी पिढी यातून अंग काढून घेते. बरं, गोड नको इथपर्यंत ठीक. नेम धरून शुक्रधातूचा घात करणारे पदार्थ निवडले जातात, हे अधिक वाईट आहे. मुळातच आजच्या आपल्या दैनंदिन आहारात दूध, तूप, गोड पदार्थ यांसारखे शुक्रवर्धक पदार्थ अल्प असतात. तिखट, आंबट, खारट, ‘सॉसेस’ आणि ‘जंक फूड’ (पिझ्झा, बर्गर यांसारखे पदार्थ) असे शुक्रधातूचा घात करणारे पदार्थच अधिक असतात. त्याला रात्रीचे जागरण, प्रवास, व्यायामाचा अभाव, चित्रविचित्र कपडे अशा आहारेतर अनेक कारणांची जोड असतेच. मग अशा युवापिढीचा शुक्रधातू वाढेल कसा ?

३. आपली परंपरा मोडण्यापूर्वी सहस्र वेळा विचार करावा !

शहरातील रुग्णालयांमध्ये वाढत चाललेल्या वंध्यत्वाच्या रुग्णांची संख्या हेच सांगते. उच्च शिक्षणाच्या अनिवार्यतेमुळे आणि त्यानंतर गंगाजळी साठवण्यात किमान २ वर्षे गेल्याने आजकालच्या तरुणांचे विवाह असेही विलंबाने होतात. पुन्हा एकमेकांना समजून घेणे आणि स्थिर होणे यांत काही काळ जातो. त्यानंतर अपत्यासाठी निर्णय घेतला, तरी तो फलदायी होत नाही, हे कळायला आणखी एखादे वर्ष जाते. विवाहानंतरच्या या सर्व काळात नियमांचे पालन न करता केलेले मैथुन आणि जोडीला शुक्रविघातक आहार-विहार चालूच असतो. मग पुनरुत्पादन करणारा शुक्रधातू बलवान कसा होणार ? परिणामी स्त्री किंवा पुरुष कुणाच्या तरी बिजात दुष्टी आढळतेच ! बरे, ‘पुढे सुप्रजा हवी असेल, तर आता दूध आणि तूप खा,’ असे आपल्या लहान मुलांना सांगितलेलेही चालत नाही. ‘असल्या ‘फालतू’ गोष्टी आम्ही करणार नाही’, असे सांगणारे कटाक्ष टाकतात ते ! पण करतात तर खरं ! परंपरा मोडण्यापूर्वी सहस्र वेळा विचार करायचा असतो, तो यासाठीच !

४. शुक्राला बल मिळण्यासाठी नियमांचे पालन करणे आणि आहारात वाजीकर (शुक्रधातूला बल देणारा) पदार्थ घेणे आवश्यक !

थोडक्यात काय अपत्यसंतान (वंशपरंपरा) चालू ठेवण्यासाठी आवश्यक असलेला शुक्रधातू बलवान हवा असेल, तर वाजीकर म्हणजे शुक्राला बल देणारा आहार घ्यावा. किमान शुक्र क्षीण करणारा आहार, म्हणजे तिखट, खारट, आंबट, क्षार, शिळे अन्न, पालेभाज्या, शीतपेये, मद्य, धूम्रपान आणि कोरडे अन्न हे टाळायला हवे. गृहस्थाश्रमी व्यक्तीचे आरोग्य, शुक्राचे रक्षण आणि ओजनिर्मिती यांसाठी शास्त्रात मैथुनाचे काही नियम सांगितलेले आहेत. बलवान ऋतूत, म्हणजे हिवाळ्यात आठवड्यातून एक किंवा दोन वेळा स्वतःचे बल पाहून मैथुन करावे. याउलट उन्हाळा आणि शरद या बल अल्प असलेल्या ऋतूंमध्ये १५ दिवसांतून एकदा मैथुन करावे. ‘हे नियम पाळणार्‍या गृहस्थांसमवेतच गृहिणींनीही आहारात शुक्राला बल देणारे पदार्थ नित्य ठेवायला हवेत’, असा शास्त्राचा आग्रह आहे. दुर्दैवाने आज लोक हे नियम पाळत नाहीत आणि आहारात वाजीकर पदार्थही नसतात.

५. अस्थीभंग झाल्यास स्थानिक धातूचे पुनरुत्पादन होऊन नवीन आणि सुदृढ धातू निर्माण करण्याचे काम शुक्रधातूमुळे होणे

शुक्रधातूचे काम केवळ प्रजनन हे नसून नवीन उत्पत्ती किंवा पुनरुत्पादन हेही आहे. शरिरात कुठेही इजा किंवा झीज झाली, अस्थिभंग झाला किंवा स्नायू फाटला, तर अशा कुठल्याही स्थितीत स्थानिक धातूचे पुनरुत्पादन होऊन नवीन आणि सुदृढ धातू निर्माण होण्याची आवश्यकता असते. हे काम शुक्रधातूच करतो; म्हणून ‘इजा, शस्त्रकर्म किंवा अस्थीभंग झाला असेल, तर मैथुन वर्ज्य करावे’, असा शास्त्राचा सल्ला आहे. अशा काळात शुक्राचे बल इतरत्र व्यय न करता ते बरे होण्यासाठी जपावे लागते. थोडक्यात कुठलीही नवनिर्मिती उत्तम व्हायची असेल, तर शुक्रधातू सारवान असणे आवश्यक आहे.

शुक्रधातूचे पोषण करण्यासाठी भारतीय देशी गायीचे दूध आणि तूप हे दोन श्रेष्ठ पदार्थ आहेत. दुधात तर सद्य म्हणजे ताबडतोब शुक्रनिर्मिती करण्याची क्षमता आहे. किती अविनाभाव (दोन गोष्टींतील परस्पर संबंध) संबंध आहे ना ? आपल्याला वेगळे करताच येणार नाही !

६. हिंदु संस्कृतीमध्ये व्यक्तीचे आरोग्य, बल आणि वय यांचा विचार आहाराचे नियोजन करण्यात येणे

लोणीही उत्तम शुक्रवर्धक आहे. लोण्याला ‘नवनीत’ असेही म्हणतात. नवनीत म्हणजे नित्य नवीन उत्पत्ती करणारे ! किशोरावस्थेत मुलांची उंची वाढत असते. त्या अनुषंगाने शरिरातील सर्व धातूंमध्ये नवनिर्मिती चालू असते. किशोरावस्थेतून युवावस्थेत जातांना अव्यक्त शुक्र व्यक्त होते. हे सगळे पालट सुयोग्य आणि उपयुक्त व्हायचे असतील, तर या वयात ताजे लोणी (बटर नव्हे) पोटात जायला हवे. ‘माखनचोर नंदकिशोर’, हे त्यासाठी लक्षात ठेवायचे. आजच्या किशोरवयीन आणि तरुण मुले यांच्या आहारातील देशी लोण्याचा अभाव ही अतिशय चिंताजनक गोष्ट आहे. गायीचे दूध, दुधाची साय, सायीचे दही, दह्याचे रवीने घुसळून ताक आणि त्यावर आलेले लोणी इतके करायला लोकांकडे वेळच नसतो; पण विश्वास ठेवा, या प्रक्रियेला कितीही वेळ लागत असला, तरी तो कधीच वाया जात नाही. आरोग्याच्या रूपाने तो कैकपटींनी वसूल होतो. यासह उडीद, मुसळी, अश्वगंधा, आंबा, शतावरी, कोहळा, गहू, ज्येष्ठमध, सारिवा, खडीसाखर, नारळ, बदाम, अक्रोड, गूळवेल, सुंठ, वेगवेगळ्या खिरी, हळवे, श्रीखंड, खव्याचे पदार्थ आणि तीळ असे अन्य काही पदार्थही शुक्राचे बल वाढवायला उपयुक्त ठरतात. त्यांचा उपयोग त्या त्या ऋतूंनुसार आहारात करावा. वैद्यांना विचारून औषधे चालू करावीत. एकूणच आपल्या आहारात कुठल्या पदार्थांना प्राधान्य द्यायचे, हे पूर्णपणे आपल्या जिभेला ठरवू द्यायचे नसते. आपले आरोग्य, बल आणि वय यांचा विचार करून जशी आवश्यकता असेल, तसा आहार घ्यायचा असतो. तसे झाल्यासच स्वास्थ्य आणि बल यांची प्राप्ती होऊ शकते. केळवण आणि डोहाळेजेवण या पारंपरिक रचनेत तो विचार केला आहे. त्यात पावभाजी किंवा पाणीपुरी यांना स्थान नाही. खीर, श्रीखंड आणि पंचपक्वान्ने हेच त्या समारंभाचे खरे मानकरी !’

– वैद्या सुचित्रा कुलकर्णी

(साभार: दैनिक ‘तरुण भारत’) (१०.१२.२०१९)