उत्सव ‘आदर्श’च हवेत !

गणेशोत्सव हा सर्वत्रच्या हिंदूंसाठी मोठ्या आनंदाचा आणि श्रद्धेचा उत्सव आहे. धार्मिक उत्सव म्हणजे हिंदूंच्या जीवनाचे अविभाज्य अंग ! उत्सव साजरे करण्यामागे व्यक्तीची समाजाभिमुखता वाढावी, सामाजिक ऐक्याची वीण घट्ट व्हावी आणि समाजाला उत्सवांचा आध्यात्मिक स्तरावर लाभ व्हावा, हेही उद्देश असतात. ते साध्य होण्यासाठी सार्वजनिक उत्सव मंडळांची भूमिका महत्त्वाची असते. वर्ष १८९३ मध्ये लोकमान्य टिळक यांनी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यास प्रारंभ केला. तेव्हापासून तो अखंडपणे उत्साहाने साजरा केला जात आहे. मागील २ वर्षांमध्ये कोरोनाच्या महामारीमुळे अनेक निर्बंधांमध्ये उत्सव साजरे करावे लागले; मात्र यंदाच्या वर्षी सर्व निर्बंध शिथिल झाल्याने सर्वजण अधिक जोमाने आणि उत्साहाने गणेशोत्सव साजरा करण्याच्या सिद्धतेत आहेत. गणेशोत्सवाची सिद्धता करतांना गणेशोत्सव हा केवळ मनोरंजनाचे साधन नाही, तर भक्तीभाव वाढवण्यास आणि सार्वजनिक एकोपा निर्माण होण्यास साहाय्यभूत व्हायला हवा, हा उद्देश सर्वांनीच मनात ठेवायला हवा.

देशाला परकीय गुलामगिरीतून मुक्त करण्याच्या उद्दात्त हेतूने सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ रोवली गेली होती. कोरोनाच्या संसर्गात सर्वांनाच जी आर्थिक हानी सोसावी लागली, त्या अनुभवातून शिकून यंदाच्या गणेशोत्सवामध्ये अनावश्यक खर्च टाळून ‘आदर्श उत्सव’ साजरा करण्याचा प्रयत्न करायला हवा. सध्या राष्ट्र आणि धर्म यांची स्थिती पहाता गणेशोत्सव हे हिंदूंचे संघटन करण्याचे एक प्रभावी माध्यम बनू शकते. संघटनाचा उद्देश साध्य होण्यासाठी ‘एक गाव एक गणपति’, हा उपक्रम सर्वत्र राबवल्यास त्यातून मोठे संघटन उभे राहू शकते. छत्रपती शिवाजी महाराजांनी ‘देवाचे भक्तच राष्ट्र आणि धर्म कार्य करू शकतात’, असा आदर्श आपल्यासमोर ठेवला आहे. हाच आदर्श समोर ठेवून आपण ‘आदर्श गणेशोत्सव’ साजरा करण्याचा संकल्प करूया.

काळाचे महत्त्व ओळखून केली जाणारी कृती ही त्या काळातील ‘आदर्श कृती’ मानली जाते. सध्याच्या काळात चालू असलेले नैतिकतेचे अध:पतन थांबवण्यासाठी राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी प्रत्येकाने कृती करणे आवश्यक आहे. त्यासाठी करण्यात येणार्‍या प्रत्येक प्रयत्नातून श्री गणेशाची कृपा संपादन करता येणार आहे. अनेक संतांनी सांगितल्यानुसार येणार्‍या आपत्काळात श्री गणेशाची कृपाच आपल्याला तारणार आहे. त्यामुळे उत्सव ‘आदर्शच’ साजरे करायला हवेत.

– श्री. किशोर जगताप, सोलापूर