हिंदु राष्ट्र अधिवेशनाला उपस्थित राहून हिंदु राष्ट्राच्या सर्वत्र चालू असलेल्या व्यापक कार्याचे अवलोकन करणारे प.पू. दास महाराज !

१२ ते १८ जून २०२२ या कालावधीत रामनाथी देवस्थान येथे दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन झाले. त्या अधिवेशनाकरिता प.पू. दास महाराज हे प्रतिदिन अधिवेशन स्थळी उपस्थित राहिले होते. त्या कालावधीत प.पू. दास महाराज यांना अधिवेशनाच्या संदर्भात जाणवलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे येथे दिली आहेत.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. अधिवेशनात सहभागी झालेल्या संत वक्त्यांची जाणवलेली वैशिष्ट्ये १ अ. पू. (अधिवक्ता) हरि शंकर जैन, देहली

१ अ १. ‘पू. (अधिवक्ता) हरि शंकर जैन यांच्या वाणीतून साक्षात् शिव शंकर महादेवच बोलत आहे’, असे जाणवले ! : ‘पू. (अधिवक्ता) हरि शंकर जैन यांच्या वाणीतून साक्षात् शिवशंकर महादेवच बोलत आहे’, असे मला जाणवले. त्यांच्या नावातच हरि म्हणजे विष्णु आणि शंकर म्हणजे शिवशंकर भोलेनाथ सामावले आहेत. ‘साक्षात् विष्णुस्वरूप असलेल्या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या आशीर्वादाने शिवशंकराचे दर्शन सर्व जगाला घडले’, असे हे पू. हरि शंकर जैन यांच्या भक्तीला कोटीशः कृतज्ञतापूर्वक प्रणाम !

प. पू. दास महाराज

१ आ. सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे

१ आ १. वाणीतील चैतन्य आणि ज्ञान यांमुळे देश-विदेशापर्यंत अनेकांचे आधारस्तंभ झालेले सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे ! : सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्या वाणीतील चैतन्य आणि ज्ञान यांमुळे ते देश-विदेशातील अनेकांचे आधारस्तंभ झाले आहेत. आर्य चाणक्य यांनी त्यांच्या काळात एक चंद्रगुप्त शोधून काढला आणि त्याच्याकडून कार्य करवून घेतले. आता सद्गुरु पिंगळेकाका यांच्या मार्गदर्शनामुळे देश-विदेशांत अनेक चंद्रगुप्त सिद्ध होत असून ते राष्ट्र आणि धर्म यांच्या जागृतीचे कार्य करत आहेत. हिंदु धर्मावर आलेली ग्लानी काढून टाकण्याचे आणि सर्वांमध्ये क्षात्रतेज निर्माण करून हिंदु धर्म अन् हिंदु राष्ट्र यांसाठी कार्य करण्यासाठी प्रत्येकात क्षमता निर्माण करण्याचे कार्य ते करत आहेत. त्याच समवेत सद्गुरु डॉ. पिंगळे यांच्या माध्यमातून प्रत्येक राष्ट्र आणि धर्मप्रेमी यांच्यामध्ये शक्तीच्या उपासनेच्या समवेत भक्तीचेही बीज रोवण्याचे अद्भुत कार्य ईश्वर करत आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा संकल्प पूर्ण साकार करण्यासाठी आणि हिंदु राष्ट्राचा धर्मध्वज लावण्याकरिता सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे हे पूरक आहेत. अशा थोर संतांच्या चरणी मी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.

२. अन्य वक्ते

२ अ. कृतीच्या स्तरावर प्रयत्न करणार्‍या हिंदुत्वनिष्ठांच्या वाणीत चैतन्य आणि क्षात्रतेज अन् ते सांगत असलेल्या विषयात जिवंतपणा जाणवणे : जे हिंदुत्वनिष्ठ कृतीच्या स्तरावर प्रयत्न करतात, त्यांच्या वाणीत चैतन्य, उत्साह, क्षात्रतेज आणि ते सांगत असलेल्या विषयात जिवंतपणा जाणवतो, तसेच काहींचे निवेदन ऐकतांना भावजागृतीही होते. विशेष म्हणजे अधिवेशनातील कोणत्याही विषयाला ग्लानी किंवा झोप येत नाही. ‘अधिवेशनातील विषय ऐकत रहावे’, असे वाटते आणि ‘पुढचे विषय ऐकण्याची उत्सुकता वाढत रहाते’, असेही मला जाणवले.

२ आ. ‘आधी लगीन कोंढाण्याचे आणि मग रायबाचे’ ही म्हण आताच्या काळातही जागवणारा खरा राष्ट्र, धर्म आणि शिवप्रेमी असा वीर मावळा श्री. जितेंद्र मोरे ! (अध्यक्ष, शिव आरती संघटन, बुलढाणा, महाराष्ट्र.) 

२ आ १. एका तरुण युवकाने दिलेल्या घोषणेमुळे सभागृहात उपस्थित असलेल्या सर्वांच्या अंतर्मनात घोषणा जाऊन सर्वांमध्ये क्षात्रतेज आणि धर्मप्रेम जागृत होणे : अधिवेशन स्थळी ‘महाराज गडपती गजअश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्नश्रीपती अष्टवधानजागृत अष्टप्रधानवेष्टित न्यायालंकारमंडित शस्त्रास्त्रशास्त्रपारंगत राजनितिधुरंधर प्रौढप्रतापपुरंदर महापराक्रमी रणधुरंधर श्रीमंत श्रीमंत श्रीमंत राजाशिवछत्रपती महाराजांचा विजय असो ! जय भवानी जय शिवाजी !’,  असा छत्रपती शिवाजी महाराज यांचा त्यांच्या बिरुदावलीसह जयघोष करणार्‍या एक तरुण युवकाची (श्री. जितेंद्र मोरे याची) आणि माझी भेट झाली. त्याने दिलेल्या घोषणांमुळे संपूर्ण सभागृह दणाणून गेले. त्याने केलेला प्रत्येक जयघोष हा त्याच्या नाभी कमळापासून (बेबींच्या देठापासून) निघून सभागृहात उपस्थित असलेल्या सर्वांच्या अंतर्मनात गेल्याने सर्वांमध्ये क्षात्रतेज आणि धर्मप्रेम जागृत होत होते. त्या वेळी माझ्या अंगावर रोमांच उभे रहात होते. त्यांच्या जयघोषातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयीची श्रद्धा आणि निष्ठा व्यक्त होत होती.

२ आ २. लहानपणापासूनच छ. शिवाजी महाराज आणि त्यांच्या कार्याविषयी प्रचंड ओढ असणे : मी त्या युवकाला भेटायला बोलावले. त्या वेळी मला त्याच्या बोलण्यातून त्याला लहानपणापासूनच छ. शिवाजी महाराज आणि त्यांच्या कार्याविषयी प्रचंड ओढ असल्याचे लक्षात आले. तो म्हणाला, ‘‘माझा जन्म त्यांच्या कार्यांसाठीच झाला आहे. मी त्यांच्याकरिता काहीही करायला सिद्ध असतो.’’

२ आ ३. ‘लग्न ठरल्यावर मुलीने राष्ट्र आणि धर्म यांविषयी काहीच वाटत नसणे’, असे सांगणे, त्यामुळे ‘मुलीच्या आई-वडिलांना साखरपुडा झालेला असतांनाही ‘हे लग्न होणार नाही’, असे कळवणे अन् त्याविषयी नंतरही काहीच न वाटणे : त्याच्या कुटुंबियांची विचारपूस केल्यावर त्याने सांगितले, ‘‘मी एकटाच मुलगा आहे. मला दोन बहिणी असून घरचे सर्व जण शिवप्रेमी, राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी आहेत. ते मला पूर्णपणे शिवकार्यासाठी साहाय्य करत आहेत. मला कुटुंबियांचा कधीच विरोध नसतो. काही मासांपूर्वीच माझे लग्न ठरून साखरपुडाही झाला होता. मी त्या मुलीशी बोलत असतांना ‘तिला राष्ट्र्र आणि धर्म यांविषयी काहीच वाटत नाही’, असे माझ्या लक्षात आले. ती म्हणाली, ‘‘छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले. आता त्यांचे काम कशाला करायचे ? हिंदु धर्माविषयी एवढा काय विचार करायचा ?’’ त्या मुलीचे हे बोलणे ऐकताच मी तिच्या आई-वडिलांना भ्रमणभाष करून सांगितले, ‘‘तुमच्या मुलीला राष्ट्र्र आणि धर्म यांविषयी काहीच वाटत नाही. त्यामुळे माझे आणि तिचे विचार जुळणार नाहीत आणि अशा मुलीशी मला लग्न करायचे नाही.’’ असे स्पष्ट सांगून मी ठरलेले लग्न मोडले. या प्रसंगानंतरही माझ्या मनात कधी तो विचार येऊन मला त्रास झाला नाही.

२ आ ४. ‘एवढी त्या युवकाच्या मनाची सिद्धता म्हणजे ‘हा कोणीतरी छत्रपती शिवाजी महाराज यांचा तानाजी मालुसरे यांच्यासारखा वीर मावळाच असणार’, असे वाटते आणि ‘कलियुगातही भगवंताच्या कृपेने वीर मावळे सिद्ध होत आहेत’, हे पाहून मला पुष्कळ आनंद झाला ! : यावरून ‘त्या युवकाची मनाची सिद्धता कशी आहे ?’, हे माझ्या लक्षात आले. हा कोणीतरी छत्रपती शिवाजी महाराजांचा तानाजी मालुसरे यांच्यासारखा वीर मावळाच असणार. त्याविना एवढी मनाची सिद्धता आणि शिव कार्याविषयीची तळमळ असूच शकणार नाही. त्याचे प्रसंग ऐकून मला छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायबा या मावळ्याची आठवण होत आहे.

त्या वेळी तानाजी मालुसरे यांनी म्हटले होते, ‘आधी लगीन कोंढाण्याचे मग रायबाचे !’ असे सर्वस्व पणाला लावून हिंदवी स्वराज्याचे कार्य पुढे नेऊन, त्याप्रमाणेच आताच्याही कलियुगात भगवंताच्या कृपेने वीर मावळे सिद्ध होत आहेत. हे पाहून मला पुष्कळ आनंद झाला. त्यापैकी हासुद्धा एक वीर मावळाच आहे. ‘त्यांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज सूक्ष्मातून कार्य करत आहेत’, असे मला जाणवले. या युवकाने केलेला त्याग हे सामान्य व्यक्तीचे लक्षण नाही, तर हिंदु राष्ट्राचे कार्य करण्यासाठी शिवाजी महाराजांचे मावळे पुनर्जन्म घेऊन पृथ्वीवर आलेले आहेत. ‘हे गुरुदेवा, हे मारुतिराया, ‘अशा वीर मावळ्यांचे रक्षण करा आणि त्यांच्याभोवती संरक्षक कवच निर्माण करून त्यांच्याकडून हिंदु राष्ट्राचा धर्मध्वज लावून घ्या’, हीच प्रार्थना करून कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’

३. ‘अधिवेशनामध्ये उपस्थित असलेले संत, राष्ट्र आणि धर्म प्रेमी यांचे प्रयत्न ऐकल्यावर भगवंताचे कार्य जगाच्या पाठीवर कानाकोपर्‍यात कशा पद्धतीने भगवंतच करून घेत आहे’, हे लक्षात आले !

अधिवेशनामध्ये उपस्थित असलेले संत, हिंदुत्ववादी, राष्ट्रप्रेमी, धर्मप्रेमी आणि मान्यवर यांचे निवेदन ऐकून, तसेच त्यांनी हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी केलेले प्रयत्न ऐकून ‘भगवंताचे कार्य जगाच्या पाठीवर कानाकोपर्‍यांत कशा पद्धतीने भगवंतच करून घेत आहे’, हे माझ्या लक्षात आले. या सर्व प्रक्रियेत भगवंताने ‘कुणाचाही अहंकार वाढणार नाही’, याची काळजी घेतली आहे.

४. केवढ्या प्रचंड प्रमाणात देश आणि विदेशात हिंदु राष्ट्र स्थापनेचे व्यापक स्वरूपात कार्य चालू असून  अधिवेशनात याचा आवाका लक्षात आला !

अधिवेशनामध्ये असलेल्या उपस्थितांपैंकी काहींनी पूर्वी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे प्रत्यक्ष दर्शन घेतले आहे, तर काहींनी त्यांचे (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे) दर्शनही घेतलेले नाही. ‘ज्यांना स्थुलातून गुरुदेवांचा सत्संग मिळालेला नाही, अशांना भगवंतच आतून मार्गदर्शन करून त्यांच्याकडून हिंदु राष्ट्राचे कार्य करून घेत आहे’, असे या अधिवेशनात अनुभवण्यास मिळाले. केवढ्या प्रचंड प्रमाणात सर्वत्र हिंदु राष्ट्र स्थापनेचे व्यापक स्वरूपात कार्य चालू आहे. याचा आवाका काही प्रमाणात लक्षात आला. हिंदु राष्ट्र स्थापनेतील सर्व संघटनामध्ये हिंदु जनजागृती समितीने सिंहाचा वाटा उचलल्यासारखेच झाले आहे.

५. अधिवेशन चालू असतांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या संदर्भात आलेल्या अनुभूती

५ अ. अधिवेशनाच्या सभागृहात परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे सूक्ष्म रूपाने अस्तित्व जाणवणे : अधिवेशन स्थळी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अखंडपणे सूक्ष्मरूपाने अस्तित्व असल्याचे मला जाणवले. साक्षात् वायुपुत्र, वायुनंदन हनुमंत परात्पर गुरु डॉक्टरांच्या पुढे गदा घेऊन चालत आहे, तसेच ‘परात्पर गुरु डॉ. आठवले हे प्रभु श्री रामचंद्रांच्या स्वरूपात तिथे आहेत’, असे मला जाणवले.

५ आ. ‘सभागृहात फिरत असणारा प्रकाशमय गोळा, म्हणजे परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे स्वयंप्रकाशी स्वरूप आहे’, असे जाणवणे : मी काही वेळा सभागृहात असतांना तेथील दिव्याचा प्रकाश न्यून अधिक होऊन काळोख पडायचा. ‘त्या वेळी सभागृहात एक प्रकाशमय गोळा फिरत असून त्याचा प्रकाश सर्वत्र पसरत आहे’, असे मला जाणवायचे. ‘तो प्रकाशमय गोळा म्हणजे गुरुदेवांचे (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे) ते स्वयंप्रकाशी स्वरूप आहे’, असे मला जाणवले.

६. प.प. श्रीधर स्वामी यांच्यासारखे कार्य करणारे परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले हे एकमेव राष्ट्रगुरु भेटले !

सज्जनगडावरील माझे पहिले गुरु प.प. श्रीधर स्वामी महाराज यांचेही कार्य ‘आर्य सनातन हिंदु धर्म’ स्थापनेचे होते. स्वामींनी पुष्कळ मोठ्या प्रमाणात कार्य केले होते. माझ्या वयाच्या ८० वर्षांच्या अध्यात्मातील प्रवासात प.प. श्रीधर स्वामी यांच्यासारखे दुसरे कुणी गुरु मला भारतात भेटले नाहीत. आता तेच स्वामींचे कार्य करणारे दुसरे अवतार, म्हणजे परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले, हे एकमेव राष्ट्रगुरु मला भेटले. मला त्यांच्या राष्ट्र आणि धर्म यांच्या जागृती विषयक कार्याच्या स्वरूपातून याची प्रचीती आली.

७. हिंदु राष्ट्राची स्थापना, म्हणजेच रामराज्य स्थापनेसाठीच भगवंताने एवढ्या मोठ्या हिंदु राष्ट्र अधिवेशनाचे आयोजन केल्याचे मला जाणवले.’ 

– प. पू. दास महाराज, सनातन आश्रम, रामनाथी गोआ. (१६.६.२०२२)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार संतांच्या  वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.