हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी कथन केलेली सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांची गुणवैशिष्ट्ये !

सद्गुरु नीलेश सिंगबाळ

१. आश्रमाप्रती ‘आश्रमदेवता’ हा भाव असलेले सद्गुरु नीलेश सिंगबाळ ! – श्री. गुरुराज प्रभु (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के)

सद्गुरु नीलेशदादा यांचा आश्रमाविषयीचा भाव अत्यंत निराळा आहे. आश्रमातील सर्व सेवा योग्य रितीने होत आहेत ना, याकडे त्यांचे बारकाईने लक्ष असते. एकदा एका सेवेसंदर्भात बोलतांना त्यांनी ‘आश्रमदेवता’ हा शब्द वापरला, तेव्हा लक्षात आले की, ते याला वास्तू म्हणून पहात नाहीत, तर ‘ही आश्रमदेवता आहे’, या भावाने ते सर्वत्र नीटनेटके रहाण्यासाठी प्रयत्न करतात. ‘सद्गुरु दादा यांच्या रूपात आम्हाला प्रत्यक्ष गुरुदेवांचे प्रतिरूप मिळाले आहे’, यासाठी कोटीश: कृतज्ञता !

२. कार्यपद्धत आणि विनम्रता यांचा अनोखा संगम म्हणजे सद्गुरु नीलेश सिंगबाळ ! – सौ. सानिका सिंह

कार्यपद्धत आणि विनम्रता यांचा एक अनोखा संगम म्हणजे सद्गुरु नीलेशदादा ! सद्गुरु नीलेशदादा प्रत्येक सत्संगात ‘आश्रमाप्रती कसा भाव ठेवायचा ?’, ‘साधकाविषयी कसा भाव ठेवायचा ?’, हे सांगतात. त्यांच्यामध्ये आश्रमाविषयी अपार भाव असल्यामुळे साधकांमध्येही आता तो भाव निर्माण होऊ लागला आहे. आश्रमातील प्रत्येक कणाशी त्यांची एकरूपता जाणवते. आश्रमात कुठे अव्यवस्थितपणा असेल, तर ते सर्वांत पहिले सद्गुरु दादांच्याच लक्षात येते. त्यांच्या कृतीतूनच साधकांना पुष्कळ शिकायला मिळते.

वर्ष २०१७ मध्ये पू. नीलेश सिंगबाळ हे संतपदी विराजमान झाल्याचे घोषित करण्यात आले होते. त्याच वेळी काही हिंदुत्वनिष्ठ आणि अधिवक्ता म्हणाले होते की, ‘त्यांना आता घोषित केले आहे; पण ते तर जन्मजातच संत आहेत.’

 ३. साधकांना केवळ स्पर्शानेही आधार देणारे सद्गुरु नीलेश सिंगबाळ ! – श्री. प्रशांत वैती

मी पूर्णवेळ धर्मकार्य करू लागल्यानंतर जेव्हा वाराणसी येथे आलो, तेव्हा सद्गुरु दादांनी मला पुष्कळ सांभाळले. कधी रात्री उशिरापर्यंत सेवा चालू असतांना सद्गुरु दादा येऊन साधकांच्या पाठीवर हात ठेवून विचारपूस करतात, तेव्हा त्यांच्या हातांतून पुष्कळ चैतन्य मिळते. त्यांच्या केवळ स्पर्शानेही आधार वाटतो.

कोरोनाकाळात कौटुंबिक अडचणींमुळे मी त्रस्त होतो. त्या प्रत्येक प्रसंगात सद्गुरु दादांनी मला आधार दिला. त्यांच्यामुळे माझ्या आयुष्यात पुष्कळच परिवर्तन झाले आहे.

४. स्वतःच्या कृतीतून अध्यात्म शिकवणारे सद्गुरु नीलेश सिंगबाळ ! – श्री. विश्वनाथ कुलकर्णी (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के)

सद्गुरु नीलेशदादांमध्ये संयम हा महत्त्वपूर्ण गुण आहे. त्यांच्या कृतीतूनच आम्हाला साधनेचे प्रयत्न शिकता येतात. साधना करतांना आमच्याकडून पुष्कळ चुका होत असतात. त्या वेळी त्यांनी प्रसंगी आम्हाला प्रेमाने सांगितले, तर कधी तत्त्वनिष्ठ राहून जाणीव करून दिली. त्यांनी आम्हाला कृतीतून अध्यात्म शिकवले.


मनाला स्पर्शून गेलेले सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांच्या सहवासातील काही क्षण !

अ. सहसाधकाच्या बोटाला दुखापत झाल्यानंतर बैठक थांबवून स्वतः मलमपट्टी करणे : ‘एकदा आम्ही गोरखपूर (उत्तरप्रदेश) येथे हिंदुत्वनिष्ठांना संपर्क करण्यासाठी गेलो असतांना चारचाकी वाहनाच्या दरवाजात हात अडकून माझ्या बोटाला दुखापत झाली. माझ्या बोटातून रक्त येऊ लागले. सद्गुरु दादांना हे समजल्यावर ते हिंदुत्वनिष्ठांसमवेत चालू असलेली बैठक थांबवून माझ्या साहाय्याला आले. त्यांनी स्वतःच माझी जखम स्वच्छ करून त्यावर मलमपट्टी केली. त्यानंतर पुढचे २ दिवस त्यांनीच माझ्या हाताला मलमपट्टी केली.

आ. धर्मप्रसारासाठी गेल्यानंतर एका शाळेत कठीण स्थितीत विनातक्रार झोपणे : एकदा गोरखपूर येथे प्रसारासाठी  गेल्यानंतर आमची निवासाची व्यवस्था एका शाळेत केली होती. उत्तरप्रदेशातील शाळांची कशी स्थिती असेल, याचा आपण विचार करू शकतो. त्या शाळेची भूमी शेणाने सारवलेली होती. ती भूमी ओलसर झाली होती. त्यावर गाद्या घालून आमच्या झोपण्याची व्यवस्था केलेली होती. त्या गाद्यांवरील चादरीही अस्वच्छ आणि काळपट होत्या. ‘मला त्या वातावरणात झोपणे कठीण आहे’, असे वाटून मी सहसाधकाला सांगून चारचाकी वाहनात झोपण्यासाठी निघालो. तेव्हा मी पाहिले सद्गुरु दादा स्वतःही त्याच परिस्थितीत शांत झोपले आहेत. सद्गुरु दादांनी तेथील परिस्थिती सहजतेने स्वीकारल्याचे पाहून मी माझा विचार पालटला.’

– श्री. प्रशांत वैती, वाराणसी (२९.६.२०२२)


सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांच्यातील कृतज्ञताभावाची काही उदाहरणे

अ. ‘एकदा सद्गुरु नीलेशदादा यांनी ते पूर्वी वाराणसी येथे करत असलेल्या पार्सल सेवेविषयी सांगितले होते. कार्यकर्ते वाराणसीमार्गे अन्यत्र प्रसाराला जात असतांना त्यांच्यासमवेत वाराणसी आश्रमासाठी काही साहित्य आले असेल किंवा वाराणसी येथून काही साहित्य अन्यत्र पाठवायचे असेल, तर त्या सेवेसाठी सद्गुरु दादा रेल्वेस्थानकावर जात असत. काही वेळा साहित्य येणार असलेल्या रेल्वेगाड्यांना उशीर होत असे, तेव्हा सद्गुरु दादांना रेल्वेस्थानकाविषयीही कृतज्ञता वाटत असे. ‘रेल्वेस्थानक असल्यामुळे थोडा वेळ थांबायला जागा उपलब्ध होते’, असे त्यांना वाटत असे.

आ. वाराणसी येथे धुळीचे प्रमाण पुष्कळ आहे. धूळ उडायला लागल्यावर तिच्याविषयीही सद्गुरु दादांचा भाव असतो की, ती काशी विश्वनाथाची धूळ आहे.’

– सौ. सानिका सिंह, वाराणसी (२९.६.२०२२)


पू. नीलेश सिंगबाळ हे सद्गुरुपदी विराजमान होण्याच्या संदर्भात साधिकेला मिळालेली पूर्वसूचना !

‘२९.६.२०२२ या दिवशी मी कन्नड ‘साप्ताहिक सनातन प्रभात’मध्ये श्री. विनायक शानभाग (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के) यांचा लेख वाचत होते. त्यात ‘गुरूंप्रती श्रद्धा’ याविषयी साधकांना शिकण्यासाठी २ उदाहरणे दिली होती. त्यात श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ, सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि पू. नीलेश सिंगबाळ यांच्या गुरूंवरील श्रद्धेच्या संदर्भातील २ प्रसंग दिले होते. तो लेख वाचतांना माझ्या मनात विचार आला, ‘पू. नीलेश सिंगबाळ यांच्या व्यतिरिक्त उर्वरित तिघेजण ‘सद्गुरु’पदावर विराजमान आहेत. जेव्हा दैनिकात त्यांच्याही नावासमोर ‘सद्गुरु’ ही उपाधी वाचायला मिळेल, तेव्हा तो लेख परिपूर्ण होईल आणि हे लवकरच होणार आहे.’

दुसर्‍या दिवशी म्हणजे ३०.६.२०२२ या दिवशी ‘दैनिक सनातन प्रभात’मध्ये ‘पू. नीलेश सिंगबाळ ‘सद्गुरु’ पदावर विराजमान झाले आहेत’, असे वृत्त मला वाचायला मिळाले. तेव्हा माझी भावजागृती झाली आणि मला अत्यंत आनंद झाला. यावरून ‘गुरुदेव माझ्यासारख्या सामान्य जिवालाही कशी प्रचीती देतात’, हे मला शिकायला मिळाले. याबद्दल गुरुचरणी कोटीशः कृतज्ञता !’ – अधिवक्त्या (सौ.) दिव्या बाळेहित्तल, बेंगळुरू (३०.६.२०२२)

(समाप्त)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक