महानंद दूध महासंघावर प्रशासकाची नियुक्ती करणार !

महानंद दूध महासंघातील भ्रष्टाचाराची चौकशी केली जाईल ! – राधाकृष्ण विखे पाटील, दुग्धव्यवसायमंत्री

विधान परिषद लक्षवेधी

महानंद दूध

मुंबई, २२ ऑगस्ट (वार्ता.) – मुंबई येथील महाराष्ट्र राज्य दूध महासंघ मर्यादित असलेल्या महानंद दूध महासंघात अपप्रकार आणि उतरती कळा लागण्याला संचालक मंडळ उत्तरदायी आहे. महासंघातील अनियमिततेविषयी सरकार बघ्याची भूमिका घेणार नाही. महानंद महासंघाचे खासगीकरण करण्याची शासनाची भूमिका नाही. महासंघातील भ्रष्टाचाराची निश्चित चौकशी केली जाईल, तसेच महानंद दूध महासंघावर प्रशासकाची नियुक्ती केली जाईल, अशी घोषणा दुग्धव्यवसायमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी २२ ऑगस्ट या दिवशी विधान परिषदेत लक्षवेधीवर बोलतांना केली. विधान परिषदेचे सदस्य विजय उपाख्य भाई गिरकर यांनी ही लक्षवेधी मांडली होती.

या वेळी झालेल्या चर्चेत सदस्य प्रवीण दरेकर म्हणाले की, महानंद दूध महासंघ तोट्यात येण्यास संचालक मंडळ उत्तरदायी असल्याने संचालकांवर कारवाई केली पाहिजे. दूध महासंघात आर्थिक अपव्यवहार झाला आहे. त्यामुळे कर्मचार्‍यांना वेतन देण्यासाठी पैसे नाहीत. महानंद संस्थेतील भ्रष्टाचाराची चौकशी होऊन दोषींवर फौजदारी गुन्हा नोंद करावा. त्यानंतर सदस्य भाई जगताप आणि जानकर यांनीही अशीच मागणी केली.