संभाजीनगर येथे विविध मागण्यांसाठी शेतकर्यांचे ‘रस्ता बंद’ आंदोलन !
संभाजीनगर – जिल्ह्यातील गंगापूर आणि संभाजीनगर येथील शेतकर्यांच्या विविध मागण्यांसाठी गंगापूर तालुक्यातील शेतकर्यांकडून गंगापूर-वैजापूर मार्गावर मांजरी फाटा येथे २१ ऑगस्ट या दिवशी १ घंटा ‘रस्ता बंद’ आंदोलन करण्यात आले आहे. या आंदोलनाला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भेट दिली. आंदोलनामुळे गंगापूर-वैजापूर महामार्गावर काही काळ वाहनांच्या रांगा लागल्या होत्या, तसेच पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
जिल्ह्यात सरासरीपेक्षा दुप्पट पाऊस झाला असून खरीप पिकांची हानी झाली आहे. त्यामुळे शेतकर्यांना सरसकट ६० सहस्र हेक्टरी भरपाई देण्यात यावी, पावसामुळे हानी झालेल्या पिकांचे पंचनामे तात्काळ करण्यात यावे, ग्रामीण भागातील रस्त्यांची अतिशय दुरवस्था झाली असून रस्त्यांची दुरुस्ती तात्काळ करण्यात यावी यांसह इतर मागण्यांसाठी आणि राज्य सरकारचा निषेध नोंदवण्यासाठी स्वामी विवेकानंद प्रतिष्ठानचे अध्यक्ष वाल्मीक शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. या वेळी शेकडो शेतकरी उपस्थित होते.
अंबादास दानवे म्हणाले की, ‘एन्.डी.आर.एफ्.’च्या निकषानुसार घोषित झालेले साहाय्य फसवे आहे. शेतकर्याच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम हे सरकार करत आहे. काही भागांत प्रचंड पाऊस झाल्याने पिकांची हानी झाली आहे, तर काही भागांत अल्प पाऊस आहे. पर्जन्यमापक यंत्रणा नसल्याने पावसाची नोंद होऊ शकली नाही. याला शासनाची धोरणे उत्तरदायी आहेत. विधीमंडळात शेतकर्यांच्या समस्या घेऊन सरकारला जाब विचारला आहे. पुन्हा शेतकर्यांचे प्रश्न सभागृहासमोर मांडणार आहे.