श्री क्षेत्र वालावल (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील सनातनचे साधक कै. गोपाळ मुननकर यांच्या मृत्यूत्तर प्रवासाचे कु. मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण !

‘कुडाळ तालुक्यातील प्रतिपंढरपूर असलेल्या ‘श्री क्षेत्र वालावल’ या गावातील सनातनचे साधक श्री. गोपाळ लक्ष्मण मुननकर (वय ७७ वर्षे आणि आध्यात्मिक पातळी ६७ टक्के) यांचे ११ ऑगस्ट २०२२ या दिवशी वृद्धापकाळाने निधन झाले. १४ ऑगस्ट या दिवशी त्यांचा मृत्यूनंतरचा तिसरा दिवस होता. या दिवशी त्यांचे जावई श्री. स्वप्नील भोसले (कु. मधुरा भोसले यांचा भाऊ) यांनी त्यांचे अस्थिविसर्जन केले. तेव्हा मी त्यांच्या घरी गेल होते. तेव्हा मला पुढील सूत्रे जाणवली. शनिवार, २० ऑगस्ट या दिवशी कै. मुननकरकाकांच्या निधनानंतरचा १० वा दिवस आहे, त्यानिमित्त ही सूत्रे देत आहे.

कै. गोपाळ मुननकर यांची एक भावमुद्रा

१. विविध मार्गांनी साधना झालेली असणे

कै. मुननकरकाकांच्या मृत्यूपूर्वीचे छायाचित्र पाहिल्यावर मला त्यांच्या मुखावर पुष्कळ तेज जाणवले. यावरून ‘जेव्हा चैतन्य तेजतत्त्वाच्या स्तरावर प्रकट होते, तेव्हा व्यक्तीचा देह तेजस्वी बनून त्याचे मुख तेजाने उजळलेले दिसते’, हे सूत्र कै. मुननकरकाकांच्या संदर्भात प्रत्यक्ष पहाण्यास मिळाले. त्यांची भक्ती, ध्यान आणि कर्म या योगमार्गांनुसार साधना झाल्याचे जाणवले.

१ अ. भक्तीयोगानुसार झालेली साधना : भक्तीयोगांतर्गत सतत भावपूर्ण नामजप करणे

१ आ. ध्यानयोगानुसार झालेली साधना : जागृत ध्यानावस्थेच्या माध्यमातून ईश्वरी अनुसंधानात रहाणे

१ इ. कर्मयोगानुसार झालेली साधना : धर्म आणि अध्यात्म यांच्या प्रसाराची सेवा अनेक वर्षे करणे

२. अंतर्साधना अखंड चालू असणे

कै. मुननकरकाकांच्या मृत्यूनंतरच्या छायाचित्रामध्येही त्यांच्याकडून पुष्कळ प्रमाणात निर्गुण-सगुण स्तरावरील पांढर्‍या रंगाच्या चैतन्यलहरींचे वायूमंडलात प्रक्षेपण होतांना जाणवले. हे ‘त्यांची अंतर्साधना अखंड चालू आहे’, याचे द्योतक असल्याचे जाणवले.

३. नित्य वापरातील पलंग चैतन्याने भारित असल्याचे जाणवणे

वडिलांच्या (कै. मुननकरकाकांच्या) निधनाच्या तिसर्‍या दिवशी त्यांनी वापरलेला पलंग पहात असतांना माझे ध्यान लागले आणि या पलंगातूनही पांढर्‍या रंगाच्या चैतन्य लहरींचे वायुमंडलात प्रक्षेपण होतांना जाणवले. या पलंगावर बसल्यावर माझा ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय ।’ हा नामजप आपोआप चालू झाला आणि माझे काही क्षणांसाठी ध्यान लागले. कै. मुननकरकाका पहाटे लवकर उठून श्रीकृष्णाचा नामजप अधिकाधिक प्रमाणात करत होते. – सौ. तृप्ती स्वप्नील भोसले (मुननकरकाकांची मुलगी)

४. कै. मुननकरकाकांनी केलेल्या भक्तीमुळे त्यांच्या खोलीतील देवतांची चित्रे सजीव आणि जागृत असल्याचे जाणवणे

कै. मुननकरकाकांच्या खोलीतील देवतांची चित्रे सजीव आणि जागृत झाल्याचे जाणवले. यावरून ‘भक्ताच्या भक्तीमुळे निर्जीव प्रतिमा किंवा मूर्ती यांच्यामध्ये देवाचे तत्त्व कार्यरत झाल्यामुळे देवतेची प्रतिमा किंवा मूर्ती जागृत आणि सजीव होते’, हे सूत्र अनुभवण्यास मिळते.

त्यांच्या देवघरातील सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे हसतमुख असणारे छायाचित्र पुष्कळ सजीव आणि आनंदी झाल्याचे जाणवत होते.

यावरून कै. मुननकरकाकांनी केलेल्या भक्तीमुळे त्यांच्यावर विविध देवता आणि गुरु प्रसन्न अन् कृपावंत असल्याचे जाणवले.

५. श्रीकृष्णाचे चित्र जागृत आणि सजीव असल्याचे जाणवणे

बाहेरील खोलीमध्ये लावलेले भगवान श्रीकृष्णाचे मोठे चित्र पहात असतांना श्रीकृष्ण सजीव असल्याचे जाणवले. श्रीकृष्णाच्या चित्रातील डोळे आपण ज्या दिशेला वळू त्या दिशेला फिरत होते. यावरून ‘भक्ताच्या भक्तीवर भगवंत प्रसन्न झाल्यावर तो प्रतिमा किंवा मूर्ती यांच्या माध्यमातून साक्षात् प्रगट होतो’, हे सूत्र अनुभवण्यास मिळते.

६. भोजनगृहातील लादीवर पांढर्‍या रंगाचे ‘ॐ’ हे शुभचिन्ह उमटलेले असणे

कै. मुननकरकाकांच्या निधनाचे वृत्त समजताच मला असे जाणवले की, त्यांच्या घरामध्ये शुभचिन्ह उमटले असणार. त्याप्रमाणे पाहिले असता त्यांच्या भोजनगृहातील लादीवर स्थुलातून ‘ॐ’ हे शुभचिन्ह उमटले आहे.

यावरून कै. मुननकरकाका यांच्या साधनेचा प्रवास स्थुलातून सूक्ष्माकडे आणि सगुणातून निर्गुणाकडे चालू असल्याची प्रचीती येते.

७. निसर्गही प्रसन्न असल्याचे जाणवणे

कै. मुननकरकाकांच्या घराच्या सभोवती असणारी झाडे आणि वृक्षलता चैतन्याने प्रफुल्लित झाल्याचे जाणवत होते. त्यामुळे त्यांच्याकडे पहातांना प्रसन्नता जाणवत होती.

८. सात्त्विक पक्षांचे दर्शन होऊन कै. मुननकरकाकांना सद्गती मिळाल्याचे शुभसंकेत मिळणे

श्री क्षेत्र वालावलला जातांना आम्हाला निळ्या रंगाचा ‘खंड्या’ आणि तेथून परत येतांना मोर या सात्त्विक पक्षांचे प्रत्यक्ष स्थुलातून दर्शन झाले. यावरून कै. मुननकरकाकांना सद्गती मिळाल्याचे शुभसंकेत मिळाले.

९. मृत्यूत्तर विधीत सहभागी असणार्‍या व्यक्तींवर चैतन्याची चंदेरी झालर निर्माण झाल्याचे दिसणे

कै. मुननकरकाकांचे मृत्यूत्तर विधी त्यांचा जावई तथा माझा सख्खा भाऊ श्री. स्वप्नील करत होता आणि त्याला माझे वडील डॉ. भिकाजी भोसले अन् वालावल येथील स्थानिक साधक श्री. संजोग साळसकर, तसेच वालावल गावातील अन्य साधक आणि शेजारचे लोक निरपेक्षपणे साहाय्य करत होते. मृत्यूत्तर विधी करूनही त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचे त्रासदायक (काळ्या) शक्तीचे आवरण आले नव्हते;  उलट त्यांच्यावर आध्यात्मिक स्तरावरील उपाय होऊन भोवती चैतन्याची चंदेरी रंगाची झालर दिसत होती.

९ अ. सर्वसामान्य व्यक्तीच्या मृत्यूनंतर मृत्यूत्तर विधी करणारी व्यक्ती, वास्तू आणि वातावरण यांवर त्रासदायक आवरण येण्यामागील कार्यकारणभाव अन् त्यावरील आध्यात्मिक स्तरावरील उपाय :  कलियुगातील बहुतांश व्यक्तींची पातळी ५० टक्क्यांहून अल्प असते. त्यामुळे त्या व्यक्तींमध्ये रज-तम गुण प्रबळ असतात. त्यामुळे जेव्हा अशा व्यक्तींचा मृत्यू होतो, तेव्हा त्यांच्या चित्तावरील रज-तम प्रधान कुसंस्कारांमुळे त्यांच्या लिंगदेहाभोवती रज-तम प्रधान त्रासदायक शक्तीचे आवरण निर्माण होते. त्याचप्रमाणे या लिंगदेहातून या रज-तम प्रधान शक्तीच्या लहरींचेही वायूमंडलात प्रक्षेपण होऊन वातावरण रज-तम प्रधान होते. त्यामुळे सर्वसामान्य व्यक्तीच्या (२० ते ४९ टक्के आध्यात्मिक पातळीच्या व्यक्तीचे) निधन झाल्यावर घर, सभोवतालचा परिसर आणि वातावरण हे रज-तम प्रधान होते. मृत्यूत्तर विधींच्या वेळी विधीतून सत्त्वप्रधान शक्तीचे प्रक्षेपण होऊन मृत व्यक्तीच्या लिंगदेहातील त्रासदायक शक्तीशी सूक्ष्म युद्ध होते. त्यामुळे मृत व्यक्तीच्या लिंगदेहातील रज-तम प्रधान त्रासदायक शक्तीच्या लहरींचे सतत प्रक्षेपण होऊन मृत व्यक्तीच्या मृत्यूत्तर विधींच्या वेळी उपस्थित असणार्‍या व्यक्तींच्या भोवतीही त्रासदायक आवरण निर्माण होते. त्यामुळे विधी कर्ता आणि अन्य व्यक्ती यांचे ‘डोके जड होणे, मन उदास होणे, निरुत्साह वाटणे’,  असे त्रास होतात. त्यामुळे मृत्यूत्तर विधी केल्यावर कर्त्याने स्नान करणे, स्वच्छ धूत वस्र परिधान करणे, केशवपन करणे (केस काढणे), वास्तूमध्ये गोमूत्र प्रोक्षण करून वास्तूची शुद्धी करणे, दक्षिण दिशेला कणकेचा दिवा लावणे, उदक शांत करणे इत्यादी कृती करण्यास धर्मशास्त्रात सांगितले आहे. त्यामुळे मृत्यूत्तर विधींचा कर्ता, वास्तू आणि वातावरण यांवरील त्रासदायक आवरण दूर होण्यास साहाय्य होते. ’

– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१६.८.२०२२)

१०. कै. मुननकरकाकांच्या लिंगदेहाचा मृत्यूत्तर दैवी प्रवास

१० अ. मृत्यूनंतर पहिला दिवस : कै. मुननकरकाकांचा लिंगदेह मला ज्योतीस्वरूपात दिसला. कै. मुननकरकाकांच्या लिंगदेहाला मनुष्यजन्मातील स्मृतींचे स्मरण असल्यामुळे त्याला पृथ्वीच्या कक्षेच्या बाहेर जातांना पितरांचे लिंगदेह अवरोध निर्माण करत होते. कै. मुननकरकाकांची सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यावर दृढ श्रद्धा असल्यामुळे त्यांनी नेहमीप्रमाणे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे भावपूर्ण स्मरण केले. त्यामुळे त्यांच्यावर श्री गुरुकृपेचा वर्षाव झाला आणि कै. मुननकरकाकांच्या लिंगदेहाच्या भोवती मारक शक्तीचे लालसर रंगाचे अभेद्य संरक्षककवच निर्माण झाले. त्यामुळे मृत्यूनंतर पहिल्या दिवशी त्यांच्या ज्योतीस्वरूप लिंगदेहाने पृथ्वीची कक्षा पार करून भुवलोकाला (पितरलोकाला) शीघ्रतेने पार केले.

१० आ. मृत्यूनंतर दुसरा दिवस : त्यांच्या मनात श्री क्षेत्र वालावल येथील जागृत देवता श्री लक्ष्मीनारायण यांच्याप्रती पुष्कळ भक्तीभाव असल्यामुळे आणि मनामध्ये कोणतीही कामना (इच्छा) नसल्यामुळे त्यांच्या चित्तातील निष्काम भक्ती जागृत झाली. त्यामुळे त्यांच्या लिंगदेहाने मृत्यूनंतर दुसर्‍या दिवशी स्वर्गलोकात प्रवेश केला. त्यांच्या चित्तावर निष्काम साधनेचा दृढ संस्कार असल्यामुळे ते स्वर्गीय सुखावर मोहीत झाले नाहीत आणि त्यांच्या लिंगदेहाने स्वर्गलोकालाही त्वरित पार केले अन् तो लिंगदेह महर्लाेकात पोचला.

१० इ. मृत्यूनंतर तिसरा दिवस : तिसर्‍या दिवशी त्यांचे अस्थिविसर्जन झाल्यावर त्यांच्या लिंगदेहाच्या चित्तावरील मनुष्यजन्मातील ७० टक्के स्मृती पुसल्या गेल्यामुळे लिंगदेहाला ईश्वराकडे जाण्याचा, म्हणजे आध्यात्मिक ध्येयाचे स्मरण झाले. त्यामुळे त्यांच्या ज्योतीस्वरूप लिंगदेहाचा महर्लाेकातून जनलोकाकडे जाण्याचा दैवी प्रवास आरंभ झाला.

वरील सर्व सूत्रांतून कै. मुननकरकाका यांची वाटचाल शीघ्रतेने संतपदाकडे चालू असल्याचे जाणवले. ते ७१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून संत झाल्याचे ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले कोणत्याही क्षणी घोषित करतील’, असे मला जाणवले.

कृतज्ञता

श्री गुरूंच्या कृपेनेच मला कै. मुननकरकाकांचे सूक्ष्म परीक्षण करता आले आणि त्यांच्या संदर्भातील गुणवैशिष्ट्ये अनुभवण्यास मिळाली’, यासाठी मी श्रीगुरुचरणी कृतज्ञ आहे.’

– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान) (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१५.८.२०२२)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्म परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवाप्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म परीक्षण’ म्हणतात.
  • या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही.- संपादक