गणेशोत्सवात चित्रपटातील गाणी लावणे, त्यावर बिभत्स नृत्य करणे असे प्रकार बंद होणे आवश्यक ! – कालीपुत्र कालीचरण महाराज

श्रावणी सोमवार निमित्ताने श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या वतीने कावड यात्रा !

कावड यात्रेत सहभागी कालीपुत्र कालीचरण महाराज

सांगली, १९ ऑगस्ट (वार्ता.) – घरी आलेल्या प्रत्येक पाहुण्याचा आपण योग्य सन्मान राखतो, मग श्री गणेशाचा राखायला नको का ? त्यामुळे गणेशोत्सव कालावधीत चित्रपटातील गाणी लावणे, त्यावर बिभत्स नृत्य करणे असे प्रकार बंद होणे आवश्यक आहे, असे आवाहन कालीपुत्र कालीचरण महाराज यांनी केले. श्रावणी सोमवार निमित्ताने श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या वतीने कावड यात्रा काढण्यात आली. त्या प्रसंगी ते बोलत होते.

कावड यात्रेत सहभागी नितीन चौगुले आणि कालीपुत्र कालीचरण महाराज

प्रारंभी कालीपुत्र कालीचरण महाराज यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर कावड पूजन करण्यात आले. शिवतीर्थ ते हरिपूर येथील संगमेश्वरपर्यंत यात्रा काढण्यात आली. यात ११ गड, ११ नदी यांचे जलपूजन करण्यात आले. या प्रसंगी उद्योजक श्री. मनोहर सारडा यांनी मार्गदर्शन केले. या प्रसंगी श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे संस्थापक श्री. नितीन चौगुले, माजी आमदार श्री. दिनकर पाटील, भाजपचे श्री. दीपक शिंदे, शिवसेनेचे सांगली शहराध्यक्ष श्री. मयुर घोडके, भाजप नगरसेवक श्री. लक्ष्मण नवलाई यांसह अन्य उपस्थित होते.