विज्ञानाच्याही पलीकडील प्रगतीचा उच्चांक गाठलेला प्राचीन भारत !

विज्ञानाच्या जवळपास सर्वच शाखांमध्ये प्राचीन भारतात कुणी आणि कोठपर्यंत संशोधन केले होते ? याचे पुरावे गेल्या १० वर्षांत विविध माध्यमांतून प्रकर्षाने पुढे आले आहेत. अलीकडच्या काळात पाश्चात्त्य वैज्ञानिकांच्या नावे सर्वांना शिकवल्या गेलेल्या बहुतांश शोधांचे मूळ हे प्रत्यक्षात प्राचीन भारतातील साहित्यात आणि त्याद्वारे ऋषीमुनींनी लावलेल्या शोधांत आहे. अर्थात् बीजरूपाने त्यांचे मूळ वेदांमध्ये आहे. प्राचीन भारताने जगाला सर्वांगस्पर्शी परिपूर्ण असे सर्व शास्त्रांचे ज्ञान देऊन ठेवले आहे. त्याने जीवनातील प्रत्येक क्षेत्रात प्रगतीचे शिखर गाठलेली शास्त्रपरंपरा दिली, त्याद्वारे अतिशय समृद्ध जीवन जगण्याची कला दिली आणि या दोन्हींच्या माध्यमांतून उच्च आध्यात्मिक जीवनमूल्ये अन् विविध साधनामार्ग यांद्वारे जीवनाचे अंतिम उद्दिष्ट ‘ईश्वरप्राप्ती’ साध्य करण्याचे साधन दिले !

सौ. रुपाली वर्तक

प्राचीन भारताच्या संशोधन क्षेत्रातील ज्ञान एवढे परिपूर्ण आहे की, त्यात नव्याने काही शोधण्याची आवश्यकता नाही; याउलट आधुनिक विज्ञानात सतत नवीन शोध लावून जुने शोध बाद ठरवले जातात. ‘यज्ञांत देवतांना हविर्भाग देऊन सृष्टीसंचालनाचे कार्य उत्तम प्रकारे पार पडते’, हे ऋषींनी जाणले होते. त्याद्वारे पंचमहाभूतांना प्रसन्न करून समृद्ध संस्कृती आणि राष्ट्र यांची निर्मिती यांचा विकास वरील विविध शास्त्रांच्या आधारे त्यांनी केला होता. केवळ भौतिकच नाही, तर मृत्यूनंतरच्या जीवनाविषयीचे सखोल ज्ञान आणि परिपूर्ण संशोधन, तसेच दैवी आणि आधिदैविक हा विज्ञानाच्या क्षमतेच्या पलीकडील शास्त्रांचा विकास भारतातील ऋषीमुनींनी त्यांच्या साधनासामर्थ्याने केलेला होता !

हिंदुद्वेषी, पुरो(अधो)गामी किंवा निधर्मी हे प्राचीन संदर्भांना अपुरे ठरवून हिंदुत्वनिष्ठांना वेड्यात काढत असले, तरी याच संदर्भाच्या आधारे आज पाश्चात्त्य उघड्या डोळ्यांनी संशोधन करून त्यांना चपराक देत आहेत. काळाच्या ओघात लुप्त झालेले हे अनमोल ज्ञान परत मिळवण्याचे आव्हान हिंदु धर्मप्रेमींपुढे आहेच; परंतु या अमोघ ज्ञानाच्या आधारे भारतवर्षाचे महत्त्व जाणून त्याची कीर्ती सर्वदूर पसरवण्याचे दायित्वही त्यांच्यावर आहे. जय भारत ।

– सौ. रूपाली वर्तक, देवद आश्रम, पनवेल. (१०.८.२०२२)