पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणार्‍या २ शिवसैनिकांवर गुन्हा नोंद !

मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट समाजिक माध्यमांवर प्रसारित केल्याच्या प्रकरणी शीव पोलिसांनी २ शिवसैनिकांच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे.

वरळीतील युवा सेना शाखा अधिकारी आणि सोशल मिडिया शाखा समन्वयक रोहन पाटणकर, तसेच पुणे विभागाचे युवासेना आयटी शाखेचे प्रमुख नितीन शिंदे अशी या आरोपींची नावे आहेत.

भाजपच्या नेत्यांची प्रतिमा जनमानसात मलिन करण्यासाठी आरोपींनी हा प्रकार केल्याची तक्रार विजय पगारे यांनी केली होती. यामध्ये म्हटले आहे की, ‘रोहन पाटणकर १९’ या (प्रोफाईल) खात्यावरून संबंधित पोस्ट १ ऑगस्ट या दिवशी ट्वीट करण्यात आली होती. त्यात नरेंद्र मोदी आणि शहा यांच्या चेहर्‍याचे विद्रूपीकरण करण्यात आले होते, तसेच आक्षेपार्ह मजकूर अपलोड करण्यात आला होता. त्यानंतर शिंदे याने या पोस्टला दुजोरा देऊन ते छायाचित्र पुन्हा ट्वीट केले आहे.

या तक्रारीवरून गटांमध्ये शत्रूत्व निर्माण करणे आणि एकोपा टिकवण्यास बाधा निर्माण होईल, अशी कृती केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.