समीर वानखेडे मुसलमान नसल्याचे जात पडताळणी समितीकडून घोषित, नवाब मलिक तोंडघशी

डावीकडून समीर वानखेडे आणि नवाब मलिक

मुंबई – अमली पदार्थ नियंत्रण कक्षाचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे हे मुसलमान नसल्याचा निष्कर्ष जात पडताळणी समितीने काढला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे कारागृहात असलेले नेते नवाब मलिक चांगलेच तोंडघशी पडले आहेत.

चित्रपट अभिनेते शाहरूख खान यांचा मुलगा आर्यन खान याच्या अटकेनंतर मलिक हे पोलीस अधिकारी वानखेडे यांच्या विरोधात आक्रमक झाले होते. त्यांनी वानखेडे यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले होते. वानखेडे हे मुसलमान असून त्यांनी जात पालटल्याचा दावा मलिक यांच्यासह ४ जणांनी केला होता. सरकारी सेवेतील नोकरी मिळवण्यासाठी वानखेडे यांनी त्यांची खोटी जात सांगितल्याचा आरोपही मलिक यांनी केला होता. या प्रकरणी मलिक यांनी वानखेडे यांच्या विरोधात जात पडताळणी समितीकडे तक्रारही प्रविष्ट केली होती.

त्यावर समितीने अन्वेषण करून अहवाल सादर केला. यामध्ये म्हटले आहे की, समीर वानखेडे आणि त्यांचे वडील यांनी मुसलमान धर्म स्वीकारल्याचे कुठेही सिद्ध होत नाही. त्यामुळे त्यांचे हिंदु-महार हे जात प्रमाणपत्र वैध आहे. यासह ते मुसलमान असल्याच्या संदर्भात कोणतेही पुरावे सापडलेले नाहीत. त्यामुळे समितीने मलिक यांची तक्रार फेटाळून लावली आहे.