सलग सुट्यांमुळे मुंबई बाहेर जाणार्‍या वाहनांमुळे मुंबई-पुणे महामार्गावर वाहतुकीची कोंडी !

मुंबई – या आठवड्यात सलग आलेल्या सुट्यांमुळे राष्ट्रीय महामार्ग आणि मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग यांवर दिवसभर मोठ्या प्रमाणात अनेक ठिकाणी वाहतूककोंडी झाली होती. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारी वाहने आणि रुग्णवाहिका यांना या वाहतूककोंडीचा फटका बसला.

या सुट्यांमुळे अनेकांनी पर्यटनस्थळी आणि गावाकडे जाण्यास पसंती दिली. १३ ऑगस्टच्या सकाळपासून मुंबई बाहेर जाणार्‍या मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा दिसून आल्या. सकाळी वाशी टोल नाक्यावर वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती. पनवेल ते खालापूर टोलनाका मार्गावर टोलनाक्यावर २ ते अडीच किलोमीटर वाहनांच्या रांगा होत्या.  पुणे आणि सातारा येथे जाणार्‍या वाहनांची लोणावळा घाटात वाहतूककोंडी झाली होती.

पुण्याला जाणार्‍या मार्गिकेवर वाहतूककोंडी झाल्याने पोलिसांनी लोणावळा बोगद्यातून मुंबईला जाणार्‍या मार्गिकेवरून काही वेळेसाठी वाहतूक वळवली होती, तसेच मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर वाहनांच्या लांबच-लांब रांगा होत्या. पालघर, वसई-विरार, मुंबई, ठाणे येथून पर्यटनासाठी लोक मोठ्या संख्येने बाहेर पडले. वसईहून ठाणे, मुंबई यांच्याकडे जाणारी वाहतूक, मुंबईहून गुजरात, ठाणे यांच्याकडे जाणार्‍या मार्गिकेवर अडीच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

संपादकीय भूमिका 

सलग सुट्ट्या आल्यावर वाहतूक कोंडी होते, हे लक्षात घेऊन अत्यावश्यक वाहनांना लवकर जाण्यासाठी मार्ग ठेवणे आवश्यक !