श्रीकृष्णाप्रमाणेच सतत साक्षीभावात असणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

डॉ. रूपाली भाटकार

१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ते साक्षीभावात असल्याने कुणी काही सांगितले, तरच कृती करू शकत असल्याचे सांगणे

‘काही वर्षांपूर्वी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी एकदा मला सांगितले होते, ‘‘संस्थेत काही चुकीचे आढळले, तर साधकांनी मला सांगायला पाहिजे.’’ मी त्यांना म्हणाले, ‘‘पण तुम्हाला सगळे कळते ना !’’ तेव्हा परात्पर गुरुदेव म्हणाले, ‘‘नाही; कारण मी साक्षीभावात असतो. जेव्हा कुणीतरी मला काही सांगते, तेव्हाच मी कृती करू शकतो.’’

२. द्रौपदी वस्त्रहरणाच्या वेळी द्रौपदीने हाक मारल्यावरच श्रीकृष्णाने साहाय्यासाठी येणे

बर्‍याच वर्षांपूर्वी परात्पर गुरु डॉक्टरांना साधकांच्या चुकांविषयी कुणीतरी सांगीतल्यावर त्यांनी एक मोहीम राबवली होती. १८.८.२०२१ या दिवशी मी त्याविषयी एका साधिकेला सांगितले. १९.८.२०२१ या दिवशी श्रीचित्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी भावसत्संगात द्रौपदी वस्त्रहरणाची गोष्ट सांगितली. त्यामध्ये द्रौपदी श्रीकृष्णाला विचारते, ‘सख्या, तू मला वाचवायला अगोदरच का आला नाहीस ?’ श्रीकृष्ण म्हणाला, ‘‘तू जोपर्यंत मला हाक मारणार नाहीस, तोपर्यंत मी तुला साहाय्य करू शकत नाही. तू मला हाक मारलीस, त्या वेळी मी लगेच आलो.’’ परात्पर गुरुदेवांनी दिलेलेच उत्तर श्रीकृष्ण द्रौपदीला देतो.

३. साक्षीभावातील भगवंताने त्याला हाक मारल्यावरच साहाय्य करणे

भगवंत साक्षीभावात असतो. जोपर्यंत आपण त्याला हाक मारून जागृत करत नाही, तोपर्यंत तो आपल्याला साहाय्य करत नाही.

यावरून ‘महर्षि’ परात्पर गुरु डॉ. आठवले यांना ‘श्रीविष्णूचे अवतार का म्हणतात ?’, हे स्पष्ट झाले.’

– डॉ. रूपाली भाटकार, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२०.८.२०२१)