‘ज्ञानशक्ती प्रसार अभियाना’ची सेवा करतांना सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी ‘सुनियोजन, कार्यपद्धतीचे पालन करण्याचे महत्त्व आणि भावाच्या स्तरावर करायचे प्रयत्न’, यांविषयी साधकांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले, ‘‘श्री गुरुदेवांनी आपल्याला हिंदु राष्ट्र स्थापनेच्या महान कार्यात माध्यम केले आहे. हे दैवी नियोजन आहे. आपण आपली साधना म्हणून आपले सर्वस्व समर्पण करून प्रयत्न केले, तर आपल्याला अखंड गुरुकृपा अनुभवता येईल.’’ त्याप्रमाणे संभाजीनगरमधील साधकांना जिज्ञासूंचा मिळालेला प्रतिसाद, साधकांना शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
१. श्री. महेश देशपांडे
१ अ. एका नगरसेवकांच्या घरी गेल्यावर तेथे पुष्कळ दाब जाणवून बोलण्याची इच्छा न होणे : ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियानाच्या अंतर्गत सेवा करतांना एका नगरसेवकांना भेटण्याचा योग आला. त्यांना सनातन संस्थेच्या कार्याविषयी काहीच ठाऊक नव्हते. त्यांच्या घरी गेल्यावर आरंभी आम्हाला दाब जाणवत होता आणि काही बोलण्याची इच्छा होत नव्हती.
१ आ. परात्पर गुरुदेवांच्या ग्रंथांतील चैतन्यामुळे वातावरणातील दाब उणावणे आणि नगरसेवक अन् त्यांच्या पत्नी यांनी ग्रंथांची मागणी देणे : आम्ही त्यांना सनातनचा एकेक ग्रंथ दाखवायला आरंभ केल्यावर वातावरणात पालट होत गेला. ‘परात्पर गुरुदेवांचे (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे) चैतन्य ग्रंथांच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोचून त्यांच्यावरील सूक्ष्मातील वाईट शक्तीचे त्रासदायक आवरण दूर होत आहे’, असे जाणवून वातावरणात सकारात्मकता जाणवू लागली. ते नगरसेवक वेगळ्या विचारधारेचे असूनही ग्रंथांतील चैतन्यामुळे ‘धार्मिक कृतींची माहिती व्हावी आणि त्यामागील शास्त्र कळावे’, यासाठी त्यांनी काही ग्रंथ घेतले. त्यांनी आणि त्यांच्या पत्नीने लहान कार्यक्रमात वाटण्यासाठी मोठे ग्रंथ अन् लघुग्रंथ यांची मागणी दिली. त्यांना सनातनचे कार्य आवडल्यामुळे त्यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’चे वर्गणीदार होण्याची सिद्धताही दर्शवली.
यातून ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियाना’च्या माध्यमातून ‘गुरुदेव समाजातील सात्त्विक जिवांना हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी कसे एकत्र आणत आहेत ?’, हे मला शिकायला मिळाले.’
२. एक साधिका (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के)
२ अ. जिज्ञासूंनी आईच्या वर्षश्राद्धानिमित्त येणार्या पाहुण्यांना भेट देण्यासाठी मोठ्या संख्येने ग्रंथ विकत घेणे : ‘आम्ही ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियाना’च्या अंतर्गत पहिला संपर्क करत असतांना जिज्ञासूंनी आम्हाला सांगितले, ‘‘आमच्याकडे कोणते ग्रंथ असावेत ?’, ते तुम्हीच आम्हाला सांगा.’’ त्यांनी तशी सूची आमच्याकडून लिहून घेतली. त्यांनी ‘आईचे वर्षश्राद्ध आहे’, असे आम्हाला सांगितले. तेव्हा ‘त्यानिमित्त येणार्या पाहुण्यांना तुम्ही ग्रंथ देऊ शकता’, असे आम्ही त्यांना सुचवल्यावर त्यांनी लगेचच ८० मोठे ग्रंथ आणि २५ लघुग्रंथ घेतले.
२ आ. आमदारांनी ग्रंथांसाठी आमदार निधीतून पैसे उपलब्ध करून देणे आणि स्वतःही ग्रंथ घेणे : आम्ही जालना येथील काँग्रेसच्या आमदारांना ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियाना’च्या अंतर्गत भेटलो. ग्रंथ पाहिल्यावर त्यांनी लगेचच आमदार निधीतून ग्रंथांसाठी निधी देण्याविषयी त्यांच्या लोकांना सांगितले. त्यांना ‘तुम्ही स्वतःही परिचितांना ग्रंथ देऊ शकता’, असे सांगितल्यावर त्यांनी लगेचच ‘मला आणखी काही ग्रंथ वैयक्तिक स्तरावर द्या’, असे सांगून ग्रंथांची रक्कमही त्याच दिवशी जमा केली. ‘केवळ आणि केवळ ‘गुरुमाऊलीचा संकल्प आणि ग्रंथांतील चैतन्य’, यांमुळे हे आपोआप घडत आहे’, असे मला जाणवले.
२ इ. माजी खासदारांनी पुष्कळ जिज्ञासेने ग्रंथ पाहून ग्रंथांच्या संचांची मागणी देणे : आम्ही एका माजी खासदारांना भेटायला गेलो होतो. ते नुकतेच प्रवास करून आले असूनही त्यांनी आम्हाला पुष्कळ वेळ दिला. त्यांनी सर्व ग्रंथ पाहिले आणि लगेचच ग्रंथांच्या संचाची मागणी दिली आणि तसे ग्रंथही त्यांनी घेतले.
२ ई. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या संकल्पशक्तीने कार्य होत आहे’, याची प्रचीती येणे : ‘गुरुदेवांची (परात्पर गुरु डॉ. आठवले यांची) अपार कृपा आहे आणि त्यांच्या संकल्पशक्तीनेच आतापर्यंत कधीही झाल्या नाहीत, अशा सहजतेने या सेवा होत आहेत. आपण केवळ माध्यम आहोत. गुरुमाऊलीच आम्हाला आमचे बोट धरून घेऊन जात आहे. ‘कुठे काय माहिती सांगायची ?’, हेही तेच बोलून घेत आहेत. त्यांच्याच चैतन्याने समोरचे प्रतिष्ठित आणि मान्यवर यांच्याकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. ‘आम्ही कुणाला संपर्क करण्याआधीच गुरुमाऊली तिथे पोचलेली असते’, हे प्रत्यक्ष किंवा भ्रमणभाषवर संपर्क झाल्यावर आमच्या लक्षात येते. ‘सूक्ष्मातून सर्व कार्य आधीच झाले आहे आणि आम्ही स्थुलातून केवळ देवाण-घेवाण करत आहोत’, असे आम्हाला जाणवते. ‘गुरुमाऊलींनी आम्हाला या दैवी अभियानात सहभागी होण्याची संधी दिली’, त्याबद्दल कोटीशः कृतज्ञता !’
३. सौ. छाया गणेश देशपांडे (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के)
३ अ. ‘हळदीकुंकवाच्या कार्यक्रमात भेट म्हणून ग्रंथ घेऊ’, असे शिवसेनेच्या एका नगरसेविकेने सांगणे आणि सनातनच्या कार्याची प्रशंसा करणे : ‘आम्ही शिवसेनेच्या एका नगरसेविकेला भेटण्यासाठी गेलो. जानेवारी मासात त्यांच्याकडे हळदीकुंकवाचा मोठा कार्यक्रम असतो. त्या प्रतिवर्षी महिलांना भांडी देतात. त्यांनी ‘या वर्षी सनातनचे ग्रंथ देऊ’, असे आम्हाला सांगितले. त्यांनी सनातनच्या कार्याची प्रशंसाही केली.
३ आ. जिज्ञासूंना त्यांच्या मुलाच्या लग्नात भेट देण्यासाठी ग्रंथ घ्यायला सुचवल्यावर त्यांनी ग्रंथ घेणे : आम्ही साधनावृद्धी सत्संगातील एका जिज्ञासूंना ग्रंथांचे महत्त्व सांगितले. त्यांच्या मुलाचे लग्न होते. ‘त्यानिमित्त ग्रंथ भेट देऊन ते ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियाना’त सहभागी होऊ शकतात’, असे त्यांना सांगितल्यावर त्यांनी अनेक मोठे ग्रंथ घेतले. त्यांनी त्यांच्या सुनेसाठी इंग्रजी भाषेतील ४ ग्रंथ घेऊन ते अमेरिकेला पाठवले. त्यांचा परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती पुष्कळ भाव आहे. त्यांनी आम्हाला सांगितले, ‘‘आता माझ्या मुलाचे लग्न झाल्यावर मी पूर्णपणे झोकून देऊन सनातन संस्थेचे कार्य करणार आहे.’’
केवळ आणि केवळ साधकांसाठी हे ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियान’ चालू केले आहे अन् त्या माध्यमातून ‘गुरुदेवांची कृपा, त्यांनी केलेला संकल्प आणि त्यांची अपार प्रीती’, हे सर्व अनुभवता येत आहे.’
४. श्री. शरद चावडा (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के)
४ अ. ‘प्रतिदिन सेवेला आरंभ करतांना भावाच्या स्तरावर प्रयत्न केल्याने ‘प्रत्येक संपर्कात गुरुतत्त्व कार्यरत असून गुरुदेव सतत समवेत आहेत’, असे अनुभवता आले.
४ आ. एका जिज्ञासूंना ग्रंथ दाखवल्यावर सूक्ष्मातून गुरुदेव दिसणे आणि त्यानंतर जिज्ञासूंनी ग्रंथांची मागणी देणे : आम्ही एका जिज्ञासूंना भेटलो. आम्ही त्यांना ग्रंथ दाखवले. तेव्हा ते म्हणाले, ‘‘सर्वच ग्रंथांमध्ये धर्माविषयी चांगली माहिती आहे.’’ त्यांना ‘कुठले ग्रंथ घ्यायचे ?’, हे लक्षात येत नव्हते. तेवढ्यात मला सूक्ष्मातून परात्पर गुरुदेव पांढर्या शुभ्र वेशात दिसले. त्या क्षणी जिज्ञासू म्हणाले, ‘‘मला या २ ग्रंथांच्या प्रती द्या.’’ आम्ही निघतांना ते म्हणाले, ‘‘फारच छान वाटले. चैतन्य जाणवले.’’ तेव्हा मी मनात म्हटले, ‘माझे श्री गुरुदेव माझ्या समवेत आहेत ना !’
४ इ. जालना येथील उद्योजकांनी लघुग्रंथांची मागणी देणे : जालना येथील एका उद्योजकांना ग्रंथांची माहिती सांगितल्यावर ते म्हणाले, ‘‘हे ग्रंथ पुष्कळ चांगले आणि महत्त्वाचे आहेत. तुम्ही माझी ६ लघुग्रंथांची मागणी घ्या. मी माझ्या सर्व कर्मचार्यांना हे भेट स्वरूपात देतो.’’
४ ई. साधकांनी सुचवल्याप्रमाणे जिज्ञासू उद्योजकांनी लघुग्रंथांची मागणी देणे : मी जालना येथील एका उद्योजकांना भ्रमणभाषवरून ग्रंथांची मािहती सांगितल्यावर ते म्हणाले, ‘‘सध्या मी एका बैठकीमध्ये आहे. मला २ घंट्यांनी भेटा. मी ग्रंथ घेईन.’’ नंतर प्रत्यक्ष भेटल्यावर ते मला म्हणाले, ‘‘मी कोणते ग्रंथ घ्यायला हवेत ?’, हे तुम्हालाच अधिक ठाऊक आहे. तुम्हीच मला ग्रंथ निवडून द्या.’’ आम्ही त्यांना ६ लघुग्रंथ घेण्यास सुचवले. त्यानुसार त्यांनी ६ लघुग्रंथांची मागणी दिली.’
५. सौ. अक्षरा दिनेश बाबते (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के), संभाजीनगर
५ अ. एका उद्योगपतींकडे संपर्कासाठी गेल्यावर प्रारंभी ‘हा संपर्क थोडक्यात संपणार’, असे वाटणे : ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियाना’च्या अंतर्गत मी आमच्या परिचयातील उद्योगपती श्री. गिरीश हंचनाळ यांच्याकडे गेले होते. ते एका वृद्धाश्रमाचे विश्वस्तही आहेत. मी त्यांना ग्रंथांची सूची दाखवताच ते सहजतेने मला म्हणाले, ‘‘तुला वाटतील ते ग्रंथ दे.’’ तेव्हा मला वाटले, ‘हा संपर्क येथेच संपला. आता ते अधिक काही बोलू देणार नाहीत.’
५ आ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांना शरण जाऊन आणि प्रार्थना करून उद्योगपतींना ग्रंथ दाखवणे अन् ग्रंथांतील चैतन्याने प्रभावित होऊन त्यांनी पुष्कळ ग्रंथ घेणे : मी गुरुदेवांना शरण गेले आणि प्रार्थना करून त्या उद्योगपतींना म्हणाले, ‘‘तुम्ही एकदा ग्रंथ पहा.’’ त्यानंतर मी माझ्याजवळील ४० ग्रंथ पिशवीतून बाहेर काढले. तेव्हा वातावरणात पालट झाला. ग्रंथातील चैतन्यामुळे त्यांनी दूरचित्रवाहिनी संच बंद करून एकेक ग्रंथ पहायला आरंभ केला. मी त्यांना ग्रंथांची माहिती आणि गुरुदेवांचे कार्य सांगत होते. ग्रंथ पाहून झाल्यावर ते मला म्हणाले, ‘‘गुरुदेव आणि सनातन संस्थेचे कार्य यांच्याविषयी आणखी सांगा. ग्रंथ फार छान आहेत. सगळेच ग्रंथ घ्यायला हवेत.’’ त्यांनी निवड करून ४१ मोठे आणि २३ लघुग्रंथ घेतले अन् स्वतःसाठी काही ग्रंथ वेगळे घेतले.
५ इ. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले सेवा करवून घेतात आणि त्यातून आनंदही तेच देतात’, याची अनुभूती येणे : त्यांच्याशी बोलतांना ‘गुरुदेव माझ्या समवेत आहेत आणि माझ्या अंतरातून तेच बोलत आहेत’, अशी अनुभूती मला येत होती. तो २ घंट्यांचा सत्संगच झाला. मला या सेवेतून पुष्कळ आनंद मिळाला आणि मला तो बराच काळ अनुभवता येत होता. गुरुदेव आणि सद्गुरु जाधवकाका यांच्या संकल्पाने ती सेवा गुरुचरणी अर्पण झाली. यातून ‘गुरुदेवांच्या ग्रंथांतील चैतन्यशक्ती कशी कार्य करते ?’, याची मला प्रचीती आली.’
(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक : १०.१२.२०२१)
|