आक्रमणानंतर लेखक सलमान रश्दी यांची प्रकृती चिंताजनक

आक्रमणकर्ता हादी मातर पोलिसांसमवेत (डावीकडे) लेखक सलमान रश्दी (उजवीकडे)

न्यूयॉर्क (अमेरिका) – येथे १२ ऑगस्टला सकाळी एका व्यक्तीने चाकूद्वारे केलेल्या आक्रमणानंतर ‘सॅटनिक व्हर्सेस’ (सैतानाची आयते (वाक्ये)) या पुस्तकाचे लेखक सलमान रश्दी यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना ‘व्हेंटिलेटर’वर ठेवण्यात आले आहे. रश्दी यांचे सहकारी अँड्र्यू यील यांनी सांगितले की, रश्दी यांना बोलण्यास त्रास होत आहे, तसेच त्यांचा एक डोळा पूर्णतः निकामी होण्याची शक्यता आहे. त्यांच्या यकृताला गंभीर जखम झाली आहे. त्यांच्या हाताच्या रक्तवाहिन्याही कापल्या गेल्या आहेत

आक्रमणकर्त्याची ओळख पटली असून त्याचे नाव हादी मातर आहे. २४ वर्षीय मातरने हे आक्रमण करण्यामागील कारण आणि उद्देश अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. पोलिसांनी त्याला अटक केली असून ते पुढील अन्वेषण चालू आहे.

रश्दी यांच्यावर २० सेकंदांत चाकूचे १० ते १५ वार ! – प्रत्यक्षदर्शीची माहिती

चार्ल्स सेव्हेनर नावाच्या एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, एक व्यक्ती व्यासपिठावर धावत आली आणि तिने सलमान रश्दी यांच्या गळ्यावर चाकूने वार केले. या अनपेक्षित आक्रमणामुळे तेथील सर्वांना धक्का बसला. कुणालाच काही समजले नाही. आक्रमणकार्‍याने अवघ्या २० सेकंदांतच रश्दी यांच्यावर चाकूचे १० ते १५ वार केले. त्यानंतर लोकांनी त्याला पकडले. रश्दी यांच्यावर आक्रमण झाल्यामुळे ते भूमीवर कोसळले. त्यानंतर त्यांच्यावर तात्काळ प्रथमोपचार करून त्यांना जवळच्या रुग्णालयात भरती करण्यात आले. ही घटना घडली, तेव्हा सभागृहात जवळपास ४ सहस्त्र प्रेक्षक उपस्थित होते.

रश्दी हे भारतीय वंशाचे ब्रिटिश-अमेरिकी लेखक आहेत. त्यांनी ८० च्या दशकात लिहिलेल्या ‘सॅटनिक व्हर्सेस’ या पुस्तकामध्ये कुराणाच्या आयतांचा अवमान केल्यावरून इराणचे सर्वोच्च धार्मिक नेते आयतुल्ला खोमेनी यांनी त्यांना ठार मारण्याचा फतवा काढला होता. रश्दी यांना अनेक वेळा जिवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या होत्या. त्यामुळे जवळपास १० वर्षे ते पोलीस संरक्षणात होते. रश्दी यांना त्यांच्या लिखाणासाठी ‘बुकर पुरस्कारा’नेही सन्मानित करण्यात आले आहे.