तूरडाळ आणि साखर यांच्या नासाडीचे प्रकरण
पणजी, १२ ऑगस्ट (वार्ता.) – सुमारे २ कोटी रुपयांची २४२ टन तूरडाळ आणि सुमारे १० टन साखर यांची नासाडी केल्याच्या प्रकरणी दक्षता खात्याने अखेर नागरी पुरवठा खात्याचे तत्कालीन संचालक सिद्धिविनायक नाईक यांना सेवेतून निलंबित केले आहे. सरकारच्या आदेशावरून दक्षता खात्याने ही कारवाई केली आहे. तूरडाळ आणि साखर यांची नासाडी केल्याच्या प्रकरणी अन्वेषण करण्यासंबंधीची धारिका दक्षता खात्याला प्राप्त झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
(सौजन्य : Prudent Media Goa)
गोवा सरकारने कोरोना महामारीच्या काळात स्वस्त दरात कडधान्य वितरित करण्याच्या हेतूने प्रतिकिलो ७९ रुपये दराने ३ कोटी २२ लाख रुपये खर्चून ४०८ टन तूरडाळ खरेदी केली होती. ही तूरडाळ ८३ रुपये किलो दराने लोकांना विक्री करायची होती; मात्र सरकारच्या लालफितीच्या कारभारामुळे २४२ टन तूरडाळीची नासाडी झाली. नासाडी झालेल्या तूरडाळीची किंमत सुमारे २ कोटी ८६ सहस्र रुपये होते, तसेच सुमारे १० टन साखरेची नागरी पुरवठा खात्याच्या गोदामात नासाडी झाली.