माहिती आयोगाच्या आदेशाची अवहेलना केल्याचे प्रकरण
संभाजीनगर – मुलाच्या जन्म प्रमाणपत्राची माहिती देण्याचे माहिती आयोगाचे आदेश असतांनाही माहिती दिली नाही. त्यामुळे प्रविष्ट झालेल्या रिट याचिकेत सेलू येथील मुख्याधिकार्यांना नोटीस बजावण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपिठाचे न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती अरुण पेडणेकर यांनी ८ ऑगस्ट या दिवशी दिले आहेत.
याचिकाकर्ता समीउद्दीन काझी यांनी त्यांचा मुलगा अरमान काझी याच्या जन्माची नोंद चिखली नगर परिषद (जिल्हा बुलढाणा) येथे करून मुलाचे जन्म प्रमाणपत्र घेतले होते; मात्र त्यांच्यात कौटुंबिक वाद असल्याने त्यांचे सासरे हमीद खान शेरखान यांनी पुन्हा सेलू नगर परिषद (जिल्हा परभणी) येथे अरमानचे दुसरे जन्म प्रमाणपत्र मिळवले. त्यामुळे याचिकाकर्ता समीउद्दीन काझी यांनी सेलू नगर परिषदेचे मुख्यधिकारी यांच्याकडे माहितीच्या अधिकारात अर्ज देत ‘दुसरी नोंद कुठल्या प्रमाणपत्राच्या आधारे केली ?’ याची माहिती मागवली होती; मात्र त्यांना माहिती देण्यात आली नाही. या कारणास्तव काझी यांनी न्यायालयात याचिका प्रविष्ट केली.