संभाजीनगर येथे ‘हर घर तिरंगा’ मोहिमेसाठी ठेकेदाराकडून सदोष राष्ट्रध्वजांचा पुरवठा !

महापालिकेने २ लाखांहून अधिक ध्वज परत पाठवले !

संभाजीनगर – संभाजीनगर महानगरपालिकेला पुरवठा करण्यात आलेल्या राष्ट्रध्वजात गंभीर चुका आढळून आल्या आहेत. ठेकेदाराकडून महापालिकेला पाठवण्यात आलेले राष्ट्रध्वज निकृष्ट दर्जाचे असल्यामुळे महापालिका प्रशासक अभिजित चौधरी यांनी आलेल्या तिरंगा ध्वजांचा पंचनामा करत २ लाखांहून अधिक ध्वज परत पाठवले आहेत. ‘राष्ट्रध्वजाचा अवमान होऊ नये, यासाठी निकृष्ट दर्जाचे राष्ट्रध्वज परत पाठवण्याचा निर्णय घेतला आहे’, असे चौधरी यांनी स्पष्ट केले. ‘निकृष्ट दर्जाचे राष्ट्रध्वज कसे काय पाठवले ?’, असा प्रश्न उपस्थित होत आहे, तसेच ‘राष्ट्रध्वजाची पडताळणी करूनच वाटप करावे’, असे निर्देश स्थानिक प्रशासनाला देण्यात आले आहेत.

‘हर घर तिरंगा’ उपक्रमात १३ ते १५ ऑगस्टपर्यंत ३ दिवस प्रत्येकाने आपल्या घरावर राष्ट्रध्वज लावावेत’, असे आवाहन केंद्रशासनाने केले आहे. या उपक्रमांतर्गत नागरिकांना राष्ट्रध्वज देण्यासाठी ‘कन्नड पंचायत समिती’मध्ये शहरातील ‘अंकित ट्रेडर्स’कडून ९ ऑगस्ट या दिवशी ४४ सहस्र राष्ट्रध्वज मागवण्यात आले. तेही सदोष, दर्जाहीन आणि गंभीर चुका असलेले आहेत.

‘राष्ट्रध्वज लावणे आणि फडकावणे यांविषयी सामान्य नागरिक अनभिज्ञ आहेत. निकृष्ट आणि सदोष राष्ट्रध्वज घरांवर लावणे अन् फडकावणे चुकीचे ठरणार आहे. याविषयी कारवाई होऊ शकते’, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.

संपादकीय भूमिका 

देशाप्रती राष्ट्रभावना व्यक्त होण्यासाठी ‘हर घर तिरंगा’ ही मोहीम राबवण्यात येत आहे. असे असतांना निकृष्ट दर्जाच्या राष्ट्रध्वजांचा पुरवठा करणे, हे संतापजनक आहे. राष्ट्रध्वजांचा पुरवठा करणार्‍या ठेकेदारांवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा नोंद करून त्यांना कठोर शिक्षा करायला हवी.