श्रीमती जयश्री म्हैसकर (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के) यांना डोंबिवली, जिल्हा ठाणे येथील त्यांची बहीण श्रीमती नलिनी जोशी (वय ८५ वर्षे) यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये !

‘माझी मोठी बहीण श्रीमती नलिनी जोशी (वय ८५ वर्षे) डोंबिवली येथे रहाते. तिने कोरोना महामारीच्या वेळी दळणवळणबंदीच्या कालावधीत ‘सनातन संस्थे’च्या ‘ऑनलाईन’ सत्संगात सहभागी होऊन साधना चालू केली. तिची मला जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

१. स्वावलंबी आणि व्यवस्थितपणा

श्रीमती नलिनी जोशी

माझी बहीण श्रीमती नलिनी वयस्कर असूनही स्वावलंबी आहे. ती स्वतःची सर्व कामे स्वतः करते. ती घरातील सर्व वस्तू व्यवस्थित ठेवते. तिला काही हवे असेल, तर ती स्वतः उठून घेते.

२. उत्तम स्मरणशक्ती

नलिनीला या वयातही अनेक घटना आणि प्रसंग दिनांक अन् वार यांसह आठवतात.

३. अनाथ मुलांसाठी कपडे शिवून देणे

श्रीमती जयश्री म्हैसकर

नलिनी कपडे उत्तम शिवते. ती लहान मुलांसाठी कपडे शिवून गावातील अनाथ मुलांच्या संस्थेला देते. ‘लहान मुले ही देवासारखी असतात. त्यांचे कपडे शिवतांना ‘मी देवासाठी कपडे शिवत आहे’, असा तिचा भाव असतो. त्यामुळे तिने शिवलेले कपडे सुंदर होतात.

४. धर्माचरणाची आवड

तिच्या घरी वारकरी संप्रदायानुसार पंढरीची वारी आणि पांडुरंगाची भक्ती करतात. ती पूर्वीपासून कुलाचार पाळणे, पूजा-अर्चा करणे इत्यादी मनापासून करते. तिला धर्माचरणाची फार आवड आहे.

५. ‘सनातन संस्थे’च्या ‘ऑनलाईन’ सत्संगात सहभागी झाल्यापासून मिळत असलेल्या आनंदामुळे बाहेरच्या आपत्काळाची जाणीव होत नसल्याचे बहिणीने सांगणे

मार्च २०२० मध्ये कोरोना महामारीमुळे दळणवळणबंदी चालू झाली. त्यानंतर २९.३.२०२० पासून ‘सनातन’चे ‘ऑनलाईन’ (संगणकीय प्रणालीद्वारे) सत्संग चालू झाले. मी तिला सत्संगाविषयी सांगितले. तेव्हापासून ती मागील वर्षभर नियमित दुपारी २.३० वाजता होणारा ‘भावसत्संग’ आणि ४ वाजताचा ‘नामजप सत्संग’ ऐकते. ‘हे सत्संग म्हणजे केवळ आनंदच आहे. त्यामुळे ‘बाहेर आपत्काळ आहे’, याची जाणीवही मला होत नाही’, असा तिने सत्संगाच्या वर्षपूर्तीच्या निमित्ताने दिलेला अभिप्राय वाचून माझी भावजागृती झाली.

६. शिकण्याची वृत्ती

नलिनी प्रतिदिन तिच्या नातसुनेच्या साहाय्याने ‘ऑनलाईन’ सत्संगात सहभागी होत असे. त्यासाठी तिला तिच्या नातसुनेला झोपेतून उठवावे लागत असे; म्हणून तिने ‘ऑनलाईन’ सत्संगाची भ्रमणभाषवरील प्रणाली शिकून घेतली.

७. साधनेची आवड

ती नियमित नामजप करते. ती ‘ऑनलाईन’ सत्संगाच्या वेळी पुष्कळ तल्लीन होऊन भावपूर्ण नामजप करते. सध्या चालू असलेला ‘स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाचा सत्संग’ तिला फार आवडतो. ‘आम्हाला हे सर्व उशिरा समजले, नाहीतर आमचे जीवन अधिक आनंदी झाले असते’, असे तिला वाटते. तिच्या जवळ नेहमी श्रीकृष्णाचे चित्र आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्र असते. तिला दिलेले दैनिक ‘सनातन प्रभात’चे विशेषांकही तिने जपून ठेवले आहेत.

८. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती भाव  

अ. वर्ष २०१९ मध्ये ती आमच्या घरी (रसायनी, जिल्हा रायगड) आली होती. तेव्हा मी तिला ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन ग्रंथ भाग ३’ पहाण्यासाठी दिला. तेव्हा तिची पुष्कळ भावजागृती झाली. ती मला म्हणाली, ‘‘तू मला दिलेला हा ग्रंथ किती महत्त्वाचा आहे, ते मला शब्दांत सांगता येत नाही. हा ग्रंथ पहातांना माझे संपूर्ण शरीर हलके झाले आहे आणि मला फार शांत वाटत आहे.’’

आ. आताही तिचा ‘मी कधी गुरु केले नाहीत; पण आयुष्याच्या संध्याकाळी प.पू. गुरुदेवांच्या रूपाने मला गुरु मिळाले आहेत’, असा भाव असून ‘त्यांच्या कृपेनेच आता ‘आयुष्याचा शेवटचा दिन’ गोड आणि आनंदमय होईल’, अशी तिची  श्रद्धा आहे.

‘परात्पर गुरु डॉक्टर माझी बहीण श्रीमती नलिनी हिच्याकडून भावपूर्ण नामजप आणि साधना करवून घेत आहेत’, असे मला वाटते.  त्यासाठी परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी मी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’

– श्रीमती जयश्री म्हैसकर (बहीण) (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के, वय ७४ वर्षे), रसायनी, जिल्हा रायगड. (१२.१२.२०२१)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक