‘सौ. सुमन तुकाराम लोंढे या पटलावर कापूर मांडून तो डब्यांमध्ये भरणे, डब्यांना झाकणे लावणे, त्यावर लेबल (वस्तूवर लावलेली चिठ्ठी) लावणे, अशा सेवा करत होत्या. मीही अनेक वर्षे त्यांच्या समवेत डब्यांमध्ये कापूर भरण्याची सेवा करते. त्या वेळी मला त्यांच्याविषयी लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
१. सकाळी ७ वाजता घरातील सर्व आवरून आश्रमात येणे
‘सौ. लोंढेकाकू देवद येथील सनातन संकुलामध्ये रहातात. त्या आश्रमात येऊन-जाऊन सेवा करतात. त्या सकाळी ७ वाजता घरातील सर्व आवरून आश्रमात येतात. दिवसभर त्या सात्त्विक उत्पादनांच्या संदर्भातील सेवेत सहभागी असतात.
२. शारीरिक त्रासांमुळे हात आणि पाठ दुखत असतांनाही कोणत्याही प्रकारे सवलत न घेता झोकून देऊन सेवा करणे
काकू कापूर डबीत भरण्याची सेवा करण्याचा प्रयत्न करतात. शारीरिक त्रासांमुळे त्यांचा हात आणि पाठ पुष्कळ दुखते. तरीही त्या सवलत न घेता झोकून देऊन सेवा करतात. पुष्कळच असह्य झाले, तरच त्या मला सांगतात, ‘‘तुम्ही कापूर भरा. मी कापराचे वजन करते.’’
३. ‘सर्वकाही ईश्वरावर सोपवून तोच कर्ता करविता आहे’, अशी गुरूंप्रती दृढ श्रद्धा असल्याने नेहमी स्थिर, शांत आणि आनंदी दिसणे
काकूंच्या बोलण्यातून मला त्यांची परात्पर गुरुदेवांवर असलेली दृढ श्रद्धा जाणवते. त्यामुळे कुटुंबातील कुठल्याही कठीण प्रसंगाचा त्यांच्यावर काहीच परिणाम होत नाही. काकूंनी सर्व काही ईश्वरावर सोपवले आहे. तोच सर्व करतो; म्हणजे ‘कर्ता करविता देवच आहे. मला कशाचीच आणि कोणतीही चिंता नाही’, असे त्यांना वाटते. त्यामुळेच त्या सर्व त्रासांवर मात करून नेहमी स्थिर, शांत आणि आनंदी दिसतात.
४. चूक झाल्यावर ईश्वरचरणी लगेचच क्षमायाचना करणे अन् त्यातून त्यांच्यातील भोळा भाव दिसून येणे
काकू नेहमीच हसतमुख असतात. त्यांच्याकडे पाहून चांगले वाटते. त्यांच्या मनात कुणाविषयीही अपेक्षा किंवा प्रतिक्रिया नाहीत. त्यांचे शालेय शिक्षण झालेले नसल्याने त्या सारणी लिखाण करू शकत नाहीत; पण त्या चुका झाल्या की, ईश्वराच्या चरणी क्षमायाचना करतात. त्यांच्या भोळ्या भावामुळेच ईश्वराने त्यांची प्रगती करवून घेतली, हे ऐकून मला आनंद झाला.
‘गुरुमाऊलींवरील दृढ श्रद्धा, भोळा भाव, सेवेची तळमळ, सतत देवाच्या अनुसंधानात रहाणे, प्रेमभाव आणि सहनशीलता’, असे अनेक गुण सौ. लोंढेकाकू यांच्यामध्ये आहेत. ‘त्यांच्यातील हे गुण माझ्यात यावेत’, हीच गुरुदेवांच्या चरणी प्रार्थना आहे.’
– श्रीमती शशिकला भगत, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२.७.२०२०)