अकार्यक्षम गृहनिर्माण संस्था आणि विकासक यांच्या विरोधात दहिसर येथे स्थानिक रहिवाशांची एकजूट !

श्री संभाजीनगर – शिव टेकडी येथील रहिवाशांना संबोधित करताना अनिकेत सावंत

मुंबई, १० ऑगस्ट (वार्ता.) – मुंबई उपनगरातील दहिसर पूर्व येथील श्री संभाजीनगर – शिवटेकडी येथील गृहनिर्माण संस्था आणि विकासक यांच्या विरोधात येथील स्थानिकांनी एकजूट केली आहे. येथील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प गेल्या १८ वर्षांपासून प्रलंबित आहे. येथील श्री सौराष्ट्र पटेल समाज हॉल येथे ‘स्थानिक रहिवाशी बचाव समिती’च्या माध्यमातून अकार्यक्षम गृहनिर्माण संस्था आणि विकासक यांच्या विरोधात बैठक आयोजित केली होती. त्यात स्थानिक रहिवासी उपस्थित होते.

बैठकीला उपस्थित श्री संभाजीनगर – शिव टेकडी येथील रहिवाशी

बचाव समितीचे पदाधिकारी सर्वश्री अनिकेत सावंत, सचिन नाईक, सुहास कदम, मिलिंद कदम यांनी प्रकल्पातील त्रुटी, उत्तम विकासकाची निवड, गृहनिर्माण संस्थांची कार्यशैली यांविषयी संबोधित केले. विभागातील गृहनिर्माण संस्थांचे माजी मुख्य प्रवर्तक रवी सावंत आणि सोपान मरे यांनी साहाय्याचे आश्वासन दिले आहे. ‘महाराष्ट्र शासनाने बाद ठरवलेले विकासक हे प्रकल्प राबवण्यासाठी रहिवाशांचे बहुमत नसतांना खोटी आश्वासने देऊन जनतेत संभ्रम निर्माण करतात. अनेक वर्षांत रहिवाशांची सभाही आयोजित केली नाही’, असा आरोप स्थानिकांनी केला.