कोल्हापूर येथील पंचगंगा नदी धोक्याच्या पातळीजवळ : विद्यापिठाच्या परीक्षा स्थगित !

पंचगंगा नदी

कोल्हापूर, १० ऑगस्ट (वार्ता.) – गेले ४ दिवस होत असलेल्या पावसामुळे पंचगंगा नदीने ४० फूट पातळी ओलांडली असून ती आता धोक्याच्या पातळीकडे म्हणजे ४३ फुटांकडे सरकत आहे. कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर पाणी आल्याने तो मार्ग पोलिसांनी बंद केला आहे. संभाव्य पूरस्थितीमुळे शिवाजी विद्यापिठाने १० आणि ११ ऑगस्ट या दिवशी होणार्‍या सर्व परीक्षा स्थगित केल्या असून नवीन वेळापत्रक लवकरच कळवण्यात येईल, असे विद्यापीठ प्रशासनाच्या वतीने कळवण्यात आले आहे.

अन्य घडामोडी

१. राधानगरी धरण १०० टक्के भरल्याने एकूण ४ स्वयंचलित द्वारे उघडून त्यातून ७ सहस्र ३१२ घनफूट प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग भोगावती नदीत चालू झाला आहे.

२. आपत्कालीन परिस्थितीत १०७७ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन प्रशासनाने केले असून आंबेवाडी आणि चिखली गावांतील गावकर्‍यांना त्वरित सुरक्षितस्थळी जाण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

३. अलमट्टी धरणातून सध्या चालू असणारा १ लाख २५ सहस्र घनफूट प्रतिसेकंद विसर्ग वाढवण्यात येऊन तो १ लाख ५० सहस्र घनफूट प्रतिसेकंद करण्यात आला.

४. वारणा नदीचे पाणी पात्राबाहेर पडले असून सागाव, कोकरूड, मांगले येथे बोटी सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. नदीकाठच्या गावांना सतर्कतेची चेतावणी देण्यात आली आहे.

५. कोयना धरण सध्या ८० टी.एम्.सी. भरले असून सांगलीत आयर्विन पूल येथे कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी २३ फूट नोंदवण्यात आली आहे.