श्रीलंकेचा त्राता : श्रीराम !

श्रीलंकेने रामायणाशी संबंधित स्थळांचे पावित्र्य आणि सात्त्विकता टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत !

श्रीलंका हा देश सध्या आर्थिक दिवाळखोरीच्या संकटात पुरता अडकलेला आहे. त्यातून बाहेर पडायचे सर्वच मार्ग त्याच्यासाठी बंद झाले आहेत, नव्हे नव्हे ‘त्यानेच ते बंद करून घेतले आहेत’, असे म्हणता येईल ! अशातच श्रीलंकेला एक आशेचा किरण दिसला आहे, तो श्रीरामाच्या रूपात ! ‘श्रीलंकेतील रामायणाशी संबंधित पौराणिक स्थळांच्या पर्यटनवाढीला प्रोत्साहन आणि चालना देऊ’, असे विधान श्रीलंकेचे नवनियुक्त पर्यटनदूत आणि माजी क्रिकेटपटू सनथ जयसूर्या यांनी नुकतेच केले आहे. यासाठी त्यांनी श्रीलंकेतील भारतीय उच्चायुक्त गोपाळ बागळे यांचीही भेट घेतली. ‘रामायणाशी निगडित पौराणिक स्थळांच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेला चालना मिळू शकते’, असे श्रीलंकेला वाटत आहे. ‘अनुकूल परिस्थितीत नव्हे, तर संकटातच देव आठवतो’, असे म्हटले जाते. या विधानाची प्रचीती श्रीलंकेच्या उदाहरणातून येते. अर्थसंकटाच्या गर्तेत पुरते अडकल्यावर देव आठवला, हेही नसे थोडके ! श्रीलंकेत सध्या अराजकाने परिसीमा गाठलेली आहे, नागरिक असुरक्षित आहेत, सोयीसुविधांची वानवा आहे. थोडक्यात काय, तर ‘श्रीलंका स्वतःच्याच कुकर्मांची फळे भोगत आहे’, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही ! अशा स्थितीतही ‘शेजारधर्मा’चे पालन करत भारत श्रीलंकेला सर्व प्रकारचे साहाय्य करून ‘विश्वबंधुत्वा’ची प्रचीती देत आहे. यातून श्रीलंका आणि भारत यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंध पुन्हा दृढ होऊ शकतात. पर्यटनदूत सनथ जयसूर्या यांनी या साहाय्यासाठी भारताचे आभार मानले आहेत. थोडक्यात काय, तर श्रीरामाने जन्म घेतलेली भारतभूमीच आज श्रीलंकेला तारत आहे !

आता आला प्रश्न श्रीलंकेच्या पुनर्उभारणीचा ! तेथे श्रीराम, सीता, हनुमंत, लक्ष्मण, रावण आणि मंदोदरी यांच्याशी संबंधित अनेक स्थाने, तीर्थे, गुहा, पर्वत आणि मंदिरेही आहेत. रामायणात ज्या भूभागाला ‘लंका’ किंवा ‘लंकापुरी’ म्हटले आहे, ते स्थान म्हणजे आताचा श्रीलंका देश आहे. त्रेतायुगात श्रीमहाविष्णूने श्रीरामावतार धारण करून लंकापुरीत रावणादी असुरांचा नाश केला. इतकी महत्त्वपूर्ण धार्मिक परंपरा लाभलेल्या श्रीलंकेत सध्या ७० टक्के लोक बौद्ध आहेत. त्यामुळे मध्यंतरी ते ‘बौद्ध राष्ट्र’ म्हणून घोषित करण्यात आले होते.

३० वर्षांपूर्वी तेथे ३० टक्के असणारे हिंदू आता केवळ १५ टक्केच राहिले आहेत. तेथे ख्रिस्त्यांची संख्या वाढत आहे. ही स्थिती पहाता देश वाचवण्यासह तेथील हिंदूंना वाचवण्याचीही वेळ आली आहे. ‘रामायणाशी संबंधित स्थळांच्या विकासाच्या माध्यमातून हा हेतू काही प्रमाणात साध्य होऊ शकतो’, असे वाटते.

विज्ञानवाद्यांना चपराक !

आतापर्यंत ज्यांनी रामायण किंवा श्रीरामाचे अस्तित्व यांवर टीका केली किंवा श्रीरामाविषयी शंका घेतल्या, ते नास्तिकतावादी, पुरो(अधो)गामी, निधर्मीवादी आता श्रीलंकेच्या पर्यटनदूतांच्या निर्णयाविषयी मूग गिळून गप्प का आहेत ? श्रीलंकेवर ‘श्रीरामावर अवलंबून रहाण्याची वेळ ओढावणे’, हे धर्म आणि देव न मानणारे यांच्यासाठी एक चपराकच आहे ! भौतिक सुविधा आणि तंत्रज्ञान यांच्या जोडीला विकासाची नवनवी दालने उघडली जाणार्‍या जगातील एका देशाला त्याच्या आर्थिक वाटचालीसाठी आध्यात्मिक स्थळांचा आसरा घ्यावा लागतो, ही धर्माने विज्ञानाला दिलेली चपराकच म्हणावी लागेल ! ‘विज्ञान आणि धर्म यांना तराजूत तोलल्यावर धर्माचाच विजय होतो’, हे श्रीलंकेच्या उदाहरणातून अधोरेखित होत आहे. प्रत्येक वेळी विज्ञानाचा उदोउदो करणारे ‘विज्ञान हीच काळाची आवश्यकता आहे’ किंवा ‘विज्ञान म्हणजेच राष्ट्राचा उत्कर्ष’, असे छातीठोकपणे सांगणारे अशा सर्वांनीच श्रीलंकेच्या उदाहरणातून बोध घेऊन शहाणे व्हावे !

तीर्थक्षेत्रे पर्यटनस्थळे होऊ नयेत !

सनातन संस्था गेल्या अनेक वर्षांपासून सांगत आहे, ‘आपत्काळात भगवंतच तारतो.’ हे विधान श्रीलंकेसाठी सत्य ठरत आहे. आज विश्व तिसर्‍या महायुद्धाच्या उंबरठ्यावर आहे. काही राष्ट्रांनी तर युद्धारंभ केलेलाच आहे. श्रीलंकेप्रमाणे पाकिस्तान आणि बांगलादेश ही राष्ट्रेसुद्धा आर्थिक संकट अनुभवतच आहेत. विनाशाच्या खाईत गेल्यावर श्रीलंकेला जे सुचले, तसे आपल्या संदर्भात होऊ नये, यासाठी अन्य राष्ट्रांनी आध्यात्मिक स्थळांचे वेळोवेळी संरक्षण आणि संवर्धन करायला हवे. ही आध्यात्मिक स्थळे म्हणजे आपले अर्थप्राप्तीचे साधन निश्चितच नव्हेत, हे लक्षात घेऊन श्रीलंकेने रामायणाशी संबंधित स्थळांच्या ठिकाणचे पावित्र्य आणि सात्त्विकता टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत. ‘रामायणाशी संबंधित स्थळे ही तीर्थक्षेत्रे आहेत’, अशी रामभक्तांची श्रद्धा आहे. त्या श्रद्धेला श्रीलंकेने तडा जाऊ देऊ नये. तीर्थक्षेत्रे ही पर्यटनस्थळे व्हायला नकोत ! हा आध्यात्मिक वारसा प्रत्येकानेच जोपासायला हवा. आता जसे श्रीलंकेत घडले, तसे या स्थळांकडे शेवटचा पर्याय म्हणून पाहू नये; कारण धार्मिक स्थळे म्हणजे देशाचा आध्यात्मिक पाया आहेत. राष्ट्राचा डोलारा उभा रहाण्यासाठी हा पाया भक्कम हवा.

खरे पहाता आध्यात्मिक स्थळे किंवा तीर्थक्षेत्रे यांच्या माध्यमातून देशाची आर्थिक भरभराट घडवून आणणे सर्वथा अयोग्य आहे. त्यांचा उपयोग धर्मकार्यासाठीच व्हायला हवा. त्यामुळे श्रीलंकेनेही त्या एकाच सूत्रावर विकासाची आशा न बाळगता राष्ट्राच्या पुनर्उभारणीसाठी अन्य पर्यायांचाही शोध घेणे क्रमप्राप्त आहे. अनेक पर्यटनस्थळे विकासात हातभार लावतातच; पण सरतेशेवटी रामायणाशी निगडित स्थळांची निवड श्रीलंकेला करावी लागली, हा खर्‍या अर्थाने प्रभु श्रीरामाचा आणि हिंदूंसाठी धर्मविजयच आहे ! अनेक संत-महात्म्यांनी सांगून ठेवले आहे की, लवकरच पृथ्वीवर रामराज्य येणार आहे. ‘श्रीलंकेत घेण्यात आलेला हा निर्णय एक प्रकारे रामराज्याचीच नांदी असावी’, असे हिंदूंना वाटते. १०० कोटी हिंदूंच्या भावना श्रीरामाशी निगडित आहेत. त्या धर्मभावनांचा विचार करून श्रीलंकेने प्रत्येक पाऊल दायित्वाने उचलावे, हीच श्रीरामभक्तांची अपेक्षा आहे ! तसे झाल्यासच श्रीराम लंकेला तारू शकतो !