नागपूर – जिल्ह्यात गेल्या ३ दिवसांपासून मुसळधार पाऊस चालू आहे. चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे पोडसा पूल पाण्याखाली गेला. त्यामुळे महाराष्ट्र -तेलंगाणा यांचा संपर्क तुटला आहे. चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्याला जोडणारा आष्टी पूलही पाण्याखाली गेला आहे, तर महानगरालगतची इरई नदी दुथडी भरून वहात असल्याने सखल भागातील लोकवस्त्या पाण्याखाली आल्या आहेत. सखल भागांतील नागरिकांना सलग पाचव्यांदा घर सोडावे लागले आहे.
अनेक गावांचा संपर्क तुटला !
मुसळधार पावसामुळे नागपूर जिल्ह्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. बरेच मार्ग ठप्प झाले आहेत. अतीवृष्टीमुळे पाण्याचा वेढा वाढल्यास धरणातून विसर्ग पुन्हा वाढू शकतो. परिणामी वैनगंगा, वर्धा, पैनगंगा आणि इरई या नद्यांकाठी पूरस्थिती निर्माण होईल. चंद्रपूर, वर्धा, भंडारा आणि गडचिरोली या जिल्ह्यांत पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. नद्या-नाले दुथडी भरून वहात असल्याने अनेक मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. अनेक वस्त्या जलमय झाल्या असून शेतीपिकांचीही हानी झाली आहे.