राजभवन परिसरातील वाहतूककोंडीमुळे शपथविधी समारंभास १३ मिनिटे विलंब !

राजभवन परिसरातील वाहतूककोंडी

मुंबई, ९ ऑगस्ट (वार्ता.) – राजभवन येथील मंत्र्यांच्या शपथविधीच्या कार्यक्रमामुळे गिरगाव चौपाटी ते राजभवन या मार्गात सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाली. त्यात अडकल्यामुळे मंत्रीपदाची शपथ घेणारे शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांना सोहळ्याला येण्यास विलंब झाला. त्यामुळे शपथविधीचा समारंभ १३ मिनिटे विलंबाने चालू झाला. वाहतूककोंडीत अडकल्यामुळे विधानसभेचे अध्यक्ष अधिवक्ता राहुल नार्वेकर यांनाही कार्यक्रमाला पोचण्यास विलंब झाला. शपथविधीच्या काळात राजभवनाकडे येणार्‍या बेस्टच्या गाड्याही काही काळ बंद ठेवण्यात आल्या होत्या, तरीही मोठ्या प्रमाणात आलेल्या खासगी चारचाकी गाड्या आणि टॅक्सी यांमुळे वाहतूककोंडी झाली.

या कार्यक्रमास मंत्रीपदाची शपथ घेण्यासाठी आलेले आमदार, त्यांचे कुटुंबीय, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, प्रशासकीय अधिकारी, पत्रकार आणि विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते. शपथविधीचा कार्यक्रम सकाळी ११ वाजता चालू होणार होता. तानाजी सावंत वगळता मंत्रीपदाची शपथ घेणारे सर्व आमदारही व्यासपिठावर उपस्थित होते. तानाजी सावंत सभागृहात आल्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी सभागृहात आले. सकाळी ११.१३ वाजता राष्ट्रगीताने कार्यक्रमाला प्रारंभ झाला.


शपथविधी सोहळ्यात नियोजन आणि सुरक्षाव्यवस्था यांमध्ये गोंधळ !

मुंबई, ९ ऑगस्ट (वार्ता.) – ९ ऑगस्ट या दिवशी झालेल्या मंत्र्यांच्या शपथविधी कार्यक्रमाच्या वेळी राजभवनाच्या परिसरात राजकीय नेत्यांच्या समर्थकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. या गर्दीचे नियोजन करण्यास, तसेच गर्दीला हाताळण्यास सुरक्षाव्यवस्था अपयशी ठरल्याचे दिसून आले. राज्यपालांच्या निवासासारख्या संवेदनशील ठिकाणी अशा प्रकारच्या सुरक्षाव्यवस्थेमधील त्रुटी राज्यपालांच्या सुरक्षेच्या दृष्टीने धोक्याचे ठरू शकते.

राजभवनाच्या बाहेर किमान १ किलोमीटर परिसरात ओळखपत्रे पाहून सोडण्यात येत होते. शपथविधीच्या कार्यक्रमाला मंत्रीपदाची शपथ घेणार्‍या आमदारांच्या समर्थकांनी राजभवनाच्या बाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. त्यांना राजभवनाच्या बाहेरील परिसरात प्रवेश देण्यात आला; परंतु त्यांची कुठेही व्यवस्था करण्यात आलेली नव्हती. त्यामुळे राजभवनाच्या प्रवेशद्वाराच्या बाहेर ठिकठिकाणी राजकीय नेत्यांच्या समर्थकांनी गर्दी केली.

प्रवेशपास पडताळण्याच्या वेळी गोंधळ !

शपथविधीच्या कार्यक्रमाचे वृत्तसंकलन करण्यासाठी राज्य सरकारच्या माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाकडून वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्या यांच्या प्रत्येकी एका प्रतिनिधीला बोलावण्यात आले होते. शपथविधीचा कार्यक्रम अचानक ठरल्यामुळे प्रवेशपासाऐवजी पत्रकारांच्या नावाची सूची राजभवनाकडे पाठवण्यात आली होती. प्रत्यक्षात कार्यक्रमाच्या वेळी पत्रकारांकडे पासाची मागणी करण्यात आली. त्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. शपथविधीचा कार्यक्रमाच्या ठिकाणी सभागृहाच्या गॅलरीत पत्रकारांची व्यवस्था करण्यात आली होती; मात्र त्या ठिकाणी बसण्यासाठी आसंद्यांची व्यवस्था नव्हती. त्यामुळे गॅलरीत पत्रकारांची गर्दी झाली.

शपथविधीनंतर पत्रकारकक्षाला बाहेरून कडी लावण्याचा प्रकार !

कार्यक्रम संपल्यावर मान्यवरांच्या प्रतिक्रिया घेण्यासाठी पत्रकार निघाले असता गॅलरीचे दरवाजे बाहेरून बंद करण्यात आले. सुरक्षारक्षकांना सांगूनही पोलिसांनी दरवाजे उघडले नाहीत. त्यामुळे पत्रकारांनी आरडाओरडा करण्यास प्रारंभ केला, तरीही पोलिसांनी दरवाजे उघडले नाहीत. त्यानंतर पत्रकारांनी गॅलरीतून सभागृहातील मंत्री महोदयांना हातवारे करून आणि हाक मारून लक्ष वेधून घेतले. त्या वेळी भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी  सुरक्षायंत्रणेला सूचना दिल्यानंतर गॅलरीचा दरवाजा उघडण्यात आला.