डहाणू (जिल्हा पालघर) येथील हिंदूंच्या धर्मांतराच्या पार्श्वभूमीवर मागणी
पालघर, ९ ऑगस्ट (वार्ता. ) – पालघर जिल्ह्यातील डहाणू, तलासरी, जव्हार आणि विक्रमगड या दुर्गम आदिवासीबहुल तालुक्यांत धर्मांतराचे प्रकार अनेक वर्षांपासून चालू आहेत. महाराष्ट्राच्या राजधानीपासून जवळच अशा घटना घडणे, हे अत्यंत गंभीर आहे. त्यामुळे गुजरात, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश आदी राज्यांच्या धर्तीवर महाराष्ट्रात धर्मांतरबंदी कायदा तातडीने करावा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ते डॉ. उदय धुरी यांनी केली. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ९ ऑगस्ट या दिवशी येथील गोविंदराव दादोबा ठाकूर सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी सनातन संस्थेच्या सौ. नयना भगत आणि हिंदु जनजागृती समितीचे मुंबई समन्वयक श्री. बळवंत पाठक उपस्थित होत्या.
डॉ. उदय धुरी पुढे म्हणाले,
१. पालघर जिल्ह्यातील डहाणूजवळील सरावली तलावपाडा येथे ‘ख्रिस्ती धर्म स्वीकारल्यास तुमचे सर्व दुखणे बंद होईल’, असे आमीष दाखवून धर्मांतराचा प्रयत्न केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. एका हिंदुत्वनिष्ठ महिलेने गावकर्यांच्या साहाय्याने पोलीस ठाण्यात केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी या प्रकरणी ४ ख्रिस्त्यांना अटक केली.
२. धर्मांतराची समस्या ही केवळ राज्यातील नव्हे, तर देशातील मोठी समस्या आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ‘धर्मांतर हे राष्ट्रांतरच’, असे म्हटले होते. भारताचे पुन्हा तुकडे होऊ द्यायचे नसतील, तर धर्मांतरबंदी कायदा व्हायलाच हवा. यापूर्वीही पालघर जिल्ह्यातील आदिवासी भागांत आदिवासी हिंदूंचे धर्मांतर केल्याचे प्रकार घडले आहेत. यामुळे हिंदू आणि धर्मांतरित हिंदू यांच्यात सण-उत्सव साजरे करण्यावरून वारंवार वाद निर्माण होत आहेत.
३. ‘पोलीस आणि प्रशासन यांनी धर्मांतराचे असे प्रकार रोखण्यासाठी ठोस उपाययोजना काढावी’, अशी मागणी स्थानिक नागरिकांनीही केली आहे.
४. ‘लंगडा चालू लागेल’, ‘आंधळ्याला दिसू लागेल’, असा धादांत खोटा प्रचार करणार्या ‘चंगाई सभां’चा देशभरात सुळसुळाट चालू आहे. या सभांतून गोरगरीब हिंदूंना धर्मांतरित केले जाते.
५. राज्यात अंधश्रद्धा निर्मूलन कायदा असूनही अशा खोट्या चमत्कारांचा प्रसार मिशनर्यांनी उघडपणे चालवला आहे. याविषयी राज्यातील अंधश्रद्धा निर्मूलनाचा ठेका घेतलेली अंनिस पण गप्प आहे. असे चमत्कार दाखवून भोळ्या हिंदूंना फसवणार्या पाद्य्रांवर जादूटोणा कायद्याच्या अंतर्गत कारवाई करावी.
अहिंदूंच्या लोकसंख्येच्या विस्फोटाचा परिणाम देशाच्या धार्मिक संतुलनावर होत आहे ! – सौ. नयना भगत, प्रवक्त्या, सनातन संस्था
देशभरात धर्मांतरबंदी कायदा करण्याविषयी आम्ही केंद्र सरकारकडेही यापूर्वीच मागणी केली आहे. आपल्या देशात प्रतिवर्षी १० लाख हिंदूंचे धर्मांतर केले जात आहे. नागालँड, मिझोराम, मेघालय, अरुणाचल प्रदेश आणि मणिपूर ही राज्ये ख्रिस्तीबहुल झाली आहेत. अनेक राज्यांत धर्मांतराच्या घटनांमुळे ख्रिस्त्यांची लोकसंख्या वाढत आहे. भारतात ९ राज्यांमध्ये हिंदू अल्पसंख्य झाले आहेत. अहिंदु लोकसंख्येच्या विस्फोटाचा परिणाम देशाच्या धार्मिक संतुलनावर होत आहे. आधीच देशात लव्ह जिहादच्या माध्यमातून हिंदु युवतींच्या धर्मांतराची समस्या ज्वलंत आहे, त्यात ख्रिस्त्यांकडून हिंदूंचे करण्यात येणारे धर्मांतरही मोठ्या प्रमाणात चालू आहे. यांवर आता नियंत्रण आणायला हवे.