माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या ४ अपत्यांचे ‘टीईटी’ प्रमाणपत्र रहित !

शिक्षक भरती घोटाळा प्रकरण

अब्दुल सत्तार

संभाजीनगर – शिक्षक भरती घोटाळा प्रकरणात माजी मंत्री आणि शिंदे गटातील विद्यमान आमदार अब्दुल सत्तार यांच्या ४ मुलांची नावे आली आहेत. ‘टीईटी’ परीक्षेच्या अपात्र सूचीत सत्तार यांच्या ४ मुलांची नावे आहेत. सत्तार यांच्या मुली हिना, उजमा, हुमा फहरीन सत्तार आणि मुलगा अमीर सत्तार या सर्वांचे ‘टीईटी’ प्रमाणपत्र रहित करण्यात आले आहे.

महाराष्ट्रात झालेल्या ‘टीईटी’ परीक्षेत अपव्यवहार झाला होता. त्यानंतर परीक्षा विभागाने ७ सहस्र ८७४ विद्यार्थ्यांची सूची घोषित केली. त्यात अब्दुल सत्तार यांच्या ४ मुलांचा समावेश आहे. सत्तार यांचे सिल्लोड तालुक्यात ‘डी.एड्.’ महाविद्यालय आहे. ‘टीईटी’ परीक्षेतून पात्रता मिळवत महाविद्यालयात सत्तार यांच्या मुलांचा समावेश करण्यात येणार होता. या घोटाळ्यात मुलांचाही समावेश असल्याचा आरोप होत आहे.

दोषी आढळल्यास कारवाई करा ! – अब्दुल सत्तार

याविषयी अब्दुल सत्तार म्हणाले की, माझी अपर्कीती करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आमची चूक असेल, मुलांचा सहभाग असेल, तर त्यांच्यावर कारवाई करावी; पण विनाकारण अपकीर्त केले जात असेल, तर अशांना फासावर लटकवा. मीच याची चौकशी करण्याची मागणी करत आहे. आमच्या संस्थेतून एखादा कागदही गेला असेल, तर आम्ही उत्तरदायी राहू. माझ्या मुलींनी वर्ष २०१९ मध्ये ‘टीईटी’ परीक्षा दिली होती; पण त्या परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्या होत्या. तसे प्रमाणपत्र माझ्याकडे आहे. माझ्या मुलाने परीक्षाच दिली नाही, तर त्याचे नाव अपात्र सूचीत कसे आले ?

चौकशी केल्यास सत्य बाहेर येईल ! – अंबादास दानवे, आमदार

शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे म्हणाले की, सर्व प्रकरणाची चौकशी व्हावी. ‘टीईटी’ घोटाळा उघडकीस आला होता. या प्रकरणी सत्तार यांच्या मुलांसहित इतरांची चौकशी करायला हवी. सत्तार म्हणतात की, हे विरोधकांचे हे षड्यंत्र आहे. यावर मी म्हणतो की, या प्रकरणात चौकशी करावी. कुणाचा सहभाग आहे, हे समजेल.

राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी म्हटले, ‘‘या प्रकरणात चौकशी आणि दोषींना शासन व्हायलाच हवे.’’