अमेरिकेत १३ दिवसांत ३ मुसलमानांच्या हत्या

वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेमध्ये गेल्या १३ दिवसांत ३ मुसलमानांच्या हत्या झाल्या आहेत. न्यू मेक्सिकोमध्ये ५ ऑगस्टला एका मुसलमान तरुणाची हत्या करण्यात आली होती. हत्येचे कारण समोर आलेले नाही. २६ जुलैला महंमद अफजल हुसेन याची, तर १ ऑगस्टला आफताब हुसेन याची हत्या करण्यात आली. हे सर्व जण वर्ष २०२१ मध्ये झालेल्या एका हत्येशी संबंधित होते. ते एकाच मशिदीत जात होते, असे समोर आले आहे.

१. या हत्यांविषयी अल्बुकर्कचे पोलीस प्रमुख हेरॉल्ड मेडिना म्हणाले की, या हत्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. परस्थिती बिघडत चालली आहे. अनेकांनी घराबाहेर पडणे बंद केले आहे. मशिदीत जाणार्‍या अनेकांनीही येथे येणे बंद केले आहे.

२. न्यूयॉर्क टाइम्सच्या वृत्तानुसार अमेरिकेत वांशिक हिंसाचारासह मुसलमानांविरुद्धचे गुन्हेही वाढत आहेत. ‘कॅलिफोर्निया स्टेट युनिव्हर्सिटी’मधील फौजदारी न्यायाचे प्राध्यापक ब्रायन लेविन म्हणाले की, वर्ष २०२० नंतर मुसलमानांच्या विरोधातील द्वेषपूर्ण गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. वर्ष २०२१ मध्ये त्यात २० टक्के वाढ झाली आहे.

अशा घटना खपवून घेतल्या जाणार नाहीत ! – राष्ट्राध्यक्ष बायडेन

राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी म्हटले आहे की, अशा द्वेषपूर्ण गुन्ह्यांना अमेरिकेत स्थान नाही. प्रशासन मुसलमान समाजासमवेत आहे. या प्रकरणाचे अन्वेषण पूर्ण झाल्यानंतर आरोपींना कठोर शिक्षा केली जाईल. अशा घटना खपवून घेतल्या जाणार नाहीत.

संपादकीय भूमिका

अशी अमेरिका भारतात अल्पसंख्यांकांवरील कथित अत्याचारांच्या घटनांवरून ‘भारतात अल्पसंख्य समाज असुरक्षित आहे’, असा खोटा अहवाल प्रसिद्ध करून भारताची नाचक्की करते ! आता भारतानेही अमेरिकेला आरसा दाखवला पाहिजे !