केरळमध्ये रामायणावर आधारित प्रश्‍नमंजुषा स्पर्धेत २ मुसलमान तरुणांचे यश !

विजेते मुसलमान तरुण

मलप्पूरम् (केरळ) – येथे रामायणावर आधारित ‘ऑनलाईन’ प्रश्‍नमंजुषा स्पर्धेत २ मुसलमान तरुणांनी यश मिळवल्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. एकूण ५ विजेत्यांपैकी महंमद जाबिर पीके आणि महंमद बसीथ एम्. हे स्पर्धक मुसलमान असून ते ‘के.के.एच्.एम्. इस्लामिक आणि कला महाविद्यालय’, वलेनचेरी येथे पदव्युत्तर इस्लामिक अभ्यास करत आहेत. या अभ्यासक्रमात हिंदु धर्म, बौद्ध, जैन आणि शीख या धर्मांचा अभ्यासही आहे. या स्पर्धेचे आयोजन ‘डीसी बूक्स’ या प्रसिद्ध प्रकाशन आस्थापनाने केले होते.

जुलै आणि ऑगस्ट या २ मासांच्या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत १ सहस्राहून अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदवला.

‘महाकाव्याचा अभ्यास करतांना मला समजले की, सर्व धर्मांतील लोकांनी एकमेकांच्या धार्मिक पुस्तकांचा अभ्यास केला पाहिजे. विविध धर्मांचा अभ्यास केल्यास धर्माच्या नावावर होणारी हिंसा रोखण्यास साहाय्य होईल. सर्व धर्म आपल्याला एकमेकांविषयी प्रेम आणि आदर करायला शिकवतात’, असे दुसरा विजेता महंमद बसीथ यांनी म्हटले आहे. महंमद बसीथ एम्. यांना रामायणातील अनेक अध्याय तोंडपाठ आहेत.

रामायण आणि महाभारत या ग्रंथांचे वाचन करणे आणि ते समजून घेणे, हे आपले दायित्व आहे ! – महंमद जाबिर पीके

महंमद जाबिर पीके यांनी म्हटले आहे की, सर्व भारतियांना रामायण आणि महाभारत यांचे वाचन केले पाहिजे. रामायण आणि महाभारत हे ग्रंथ आपली संस्कृती, परंपरा आणि इतिहास यांचा एक महत्त्वपूर्ण भाग आहेत. या ग्रंथांचे वाचन करणे आणि ते समजून घेणे, हे आपले दायित्व आहे.

संपादकीय भूमिका

किती हिंदु युवक हिंदूंच्या धार्मिक ग्रथांचा अभ्यास करून अशा स्पर्धांमध्ये यश संपादन करतात ?