परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवानिमित्त रथोत्सव आणि पालखी सोहळा होणार असल्याची मिळालेली पूर्वसूचना !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. आकाशातून रथ आणि पालखी येतांना दिसणे, तेव्हा ‘हे दृश्य नेमके काय सूचित करत आहे ?’, ते न कळणे

कु. प्रतीक्षा हडकर

‘१६.५.२०२२ या दिवशी मी जागृतावस्थेत असतांना मला आकाशमार्गे एक रथ येतांना दिसत होता. तो सुवर्ण रंगाचा रिकामा रथ एक देवदूत चालवत होता. मला रथाच्या बाजूला एक पालखी दिसत होती. पालखी घेऊन चालणारेही दोन देवदूतच होते. पालखी आणि रथ पृथ्वीवर आलेले पाहून मला ‘ही भगवंताची दैवी लीला आहे’, असे वाटले. रथ आणि पालखी आकाशातून येतांना दिव्य ज्योतींप्रमाणे चमकत होते. रथ आणि पालखी यांवर देवता फुलांचा वर्षाव करत होत्या. काही वेळाने मी भानावर आले.

२. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांना स्थुलातून फिरवून आणायला हवे’, असे वाटणे

मला जे पहायला मिळाले, तो भास होता का ? ‘हे दिसलेले दैवी दृश्य म्हणजे नेमके काय आहे ?’, याची मला उत्सुकता वाटत होती. मी एका साधिकेला हे सांगितले. त्यावर ती हसली. मी तिला म्हणाले, ‘‘प्रसारातील साधक परात्पर गुरु डॉक्टरांचे छायाचित्र पालखीत ठेवून त्यांची पालखी काढतात. ‘आपण परात्पर गुरु डॉक्टर यांनाच रथातून फिरवायला हवे’, असे मला वाटत आहे. तेव्हा ती काहीच बोलली नाही.

३. परात्पर गुरु डॉ. आठवले यांना श्रीविष्णुरूपात रथात पहातांना ‘स्वतः हवेत तरंगत असून वेगळेच विश्व अनुभवत आहे’, असे जाणवणे

‘२२.५.२०२२ या दिवशी ‘सर्व साधकांनी जयघोष करण्यासाठी आश्रमाच्या बाहेरील बाजूस उभे रहायचे आहे’, असे सांगितले होते; म्हणून आम्ही सर्व साधक आश्रमाच्या बाहेरच्या बाजूला उभे राहिलो. काही क्षणांतच पालखी समोर आली. पालखीत ‘श्रीराम शाळिग्राम’ होता. आम्ही सर्व साधक त्याचे दर्शन घेत होतो. त्या पालखीच्या मागोमाग रथ होता. त्या दैवी रथात परात्पर गुरु डॉक्टर बसले होते आणि त्यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ अन् श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ या त्यांच्या पुढे बसलेल्या दिसल्या. तेव्हा ‘मी जे पहात आहे, ते खरेच आहे का ?’, असे वाटून मी डोळे चोळून पाहिले. तेव्हा ‘मी भूमीवर उभी नसून हवेत तरंगत आहे. देव मला वेगळ्याच विश्वात घेऊन जात आहे. यातून बाहेर येऊच नये’, असे मला वाटत होते.

४. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा हा अवर्णनीय रथोत्सव पहातांना पुष्कळ भावजागृती होणे

परात्पर गुरु डॉ. आठवले, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ  यांना रथात आरूढ झालेले पाहून माझे मन भरून आले. ‘ते रूप डोळ्यांत किती साठवून ठेवू ?’, अशी माझ्या मनाची अवस्था झाली होती. त्यांना पहातांना आरंभीच भावजागृती झाली. त्यामुळे माझ्या डोळ्यांतील अश्रू थांबतच नव्हते. काही क्षणच मी त्यांना पाहू शकले. त्यानंतर डोळे अश्रूंनी भरल्यामुळे मला त्यांना पहाताच येत नव्हते. ‘हा सोहळा संपूच नये’, असे मला वाटत होते.

५. कृतज्ञता

हे दृश्य पाहिल्यावर ५ – ६ दिवसांपूर्वी मला दिसलेल्या दृश्याची आठवण होऊन मला वाटले, ‘देवाने सूक्ष्मातून पृथ्वीवर देवदूतासहित पालखी आणि रथ पाठवला अन् स्थुलातून हा मंगलमय रथोत्सव अनुभवण्यास दिला. देवाने माझ्या मनात आलेला विचार पूर्ण केला. देवा, तू किती रे आम्हा साधकांसाठी करतोस ? देवा, माझ्याकडे कृतज्ञता व्यक्त करण्यासही शब्द नाहीत. परात्पर गुरु डॉक्टर,  श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळ अन् सप्तर्षी यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञतापूर्वक भावपूर्ण शिरसाष्टांग नमस्कार !’

– कु. प्रतीक्षा हडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२३.५.२०२२)


असा द्विगुणीत आनंदोत्सव झाला साजरा ।

 कु. प्रतीक्षा हडकर यांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा मंगलमय रथोत्सव सोहळा पहातांना सुचलेल्या काही भावस्पर्शी ओळी !

निघाली पालखी रामशिळा घेऊनी ।
तिन्ही गुरु रथात आरूढ होऊनी ।। १ ।।

क्षण ते टिपण्यात होते सर्व मग्न ।
भान हरपून गेले, गुरुरूप पहाण्यात सर्व दंग ।। २ ।।

भक्तजन निघाले श्रीहरीच्या दरबारातून ।
साधकजन जयघोष करिती रांगेत उभे राहून ।। ३ ।।

गुरुमाऊलीचे पाऊल पडे या पृथ्वीवर ।
दृष्ट प्रवृत्तींचे निर्मूलन होईल या भूमीवर ।। ४ ।।

त्या क्षणाची प्रतीक्षा करीतसे भूमाता ।
पदस्पर्श होणार आता गुरुमाऊलीच्या चरणांचा ।। ५ ।।

निसर्गही पहाण्यास झाला आतुर ।
वेलींवरील फुले अलगद भूमीवर पाडून ।। ६ ।।

पक्षी करिती किलबिल आकाशात भ्रमण करून ।
घिरट्या घालून करिती गुणगुण ।। ७ ।।

असे हा आगळा-वेगळा अमृताचा झरा ।
येणार भेटण्यास अमुचा हरि नारायण सखा ।। ८ ।।

गुरुमाऊलीचा जन्मोत्सव सोहळा ।
संत आणि भक्तजनांचा हा मेळावा ।। ९ ।।

चैतन्यमय अशा तुषारांचाच जणू फवारा (कारंजे) ।
नाचत, गात साजरा केला हा जन्मोत्सव सोहळा ।। १० ।।

भक्त आणि भगवंत यांच्या भेटीचा हा भावसोहळा ।
भगवंताने भक्ताला लावियला लळा ।। ११ ।।

हृदयातील मंदिरी साठवूनी ठेवावा तसा ।
असा द्विगुणीत आनंदाचा उत्सव झाला साजरा ।। १२ ।।

– कु. प्रतीक्षा हडकर (२३.५.२०२२)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक