प्रगल्भता आणि सूक्ष्मातील जाणण्याची क्षमता असणारे पू. वामन अनिरुद्ध राजंदेकर (वय ३ वर्षे) !

पू. वामन अनिरुद्ध राजंदेकर (वय ३ वर्षे) हे जन्मतःच संत आहेत. त्यांच्याकडून विविध सूक्ष्मातील प्रयोग करवून घेण्यात आले. त्यांची आणि अन्य दोन प्रसंगांत त्यांनी दिलेली वैशिष्ट्यपूर्ण उत्तरे येथे दिली आहेत.

पू. वामन राजंदेकर

१. सूक्ष्मातील प्रयोग

सौ. मानसी राजंदेकर

१ अ. परात्पर गुरु डॉ. आठवले बसत असलेल्या आसंदीच्या ठिकाणी उभे राहिल्यावर पू. वामन यांना भाव आणि शक्ती जाणवणे : ‘मध्यंतरी पू. वामन यांचे चित्रीकरण कक्षात एका विषयाचे चित्रीकरण होते. चित्रीकरण चालू होण्यापूर्वी मी पू. वामन यांना विचारले, ‘‘जिथे परात्पर गुरु डॉ. आठवले कधीतरी येऊन बसतात, त्या जागी उभे राहून तुम्हाला काय जाणवते ? ते पहा.’’ तेव्हा पू. वामन यांनी मला अगदी सहज आणि शांतपणे उत्तर दिले, ‘‘तिथे उभे राहिल्यावर मला भाव अन् शक्ती जाणवली.’’

१ आ. दैनिक ‘सनातन प्रभात’च्या विशेषांकामधील परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या छायाचित्रावर हात ठेवून प्रयोग करतांना पू. वामन यांना भाव जाणवून हिना अत्तराचा सुगंध येणे : एकदा चित्रीकरण चालू असतांना पू. वामन यांना त्यांच्या बहिणीने, म्हणजेच कु. श्रिया राजंदेकर (वय ११ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६६ टक्के) हिने दैनिक ‘सनातन प्रभात’चा विशेषांक दाखवला आणि ‘त्यात असलेल्या परात्पर गुरुदेवांच्या छायाचित्रावर हात ठेवून काय जाणवते ?’, हे पहाण्यास सांगितले. त्यावर पू. वामन म्हणाले, ‘‘छायाचित्रावर हात ठेवल्यावर मला भाव जाणवला आणि हिना अत्तराचा सुगंध आला.’’

१ इ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयीचा ‘छायाचित्रमय जीवनदर्शन’ हा ग्रंथ पहात असतांना पू. वामन यांना आनंद जाणवणे : त्यानंतर कु. श्रियाने पू. वामन यांना परात्पर गुरुदेवांचा ‘छायाचित्रमय जीवनदर्शन’ हा ग्रंथ दाखवला आणि ‘ग्रंथ पहात असतांना काय जाणवले ?’, असे विचारल्यावर पू. वामन यांनी पुष्कळ आनंदाने उत्तर दिले, ‘‘मला आनंद जाणवला.’’

१ ई. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी ‘एक पांढरा कागद हातात घेतल्यावर काय जाणवते ?’, हा प्रयोग करण्याविषयी सांगितल्यावर पू. वामन यांचा गणपतीचा नामजप चालू होऊन त्यांना हिना अत्तराचा सुगंध येणे : १९.१२.२०२१ या दिवशी संध्याकाळी आम्ही सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांच्या खोलीत गेलो होतो. त्या वेळी त्यांनी आम्हाला सूक्ष्मातील प्रयोग करण्यासाठी एक पांढरा कागद दिला आणि पू. वामन यांना सांगितले, ‘‘कागद हातात घेऊन काय जाणवते ?’’ तेव्हा पू. वामन यांनी सांगितले, ‘‘माझा गणपती बाप्पाचा नामजप चालू झाला आणि मला हिना अत्तराचा सुगंध आला.’’

२. ‘पू. (श्रीमती) दीक्षितआजी यांच्या संतसन्मान सोहळ्यात काय जाणवले ?’, याविषयी विचारल्यावर पू. वामन यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे सूक्ष्मातून दर्शन झाल्याचे आणि शांत वाटून भाव जागृत झाल्याचे सांगणे

काही दिवसांपूर्वी आम्हाला सनातन संस्थेच्या संत पू.  (श्रीमती) दीक्षितआजी यांच्या सन्मान सोहळ्याला उपस्थित रहाण्याची संधी मिळाली होती. त्या वेळी संपूर्ण कार्यक्रम होईपर्यंत साधारण ३ ते ४ घंटे पू. वामन शांतपणे एका जागेवरच बसून होते. मध्येच काही वेळ त्यांच्या डोळ्यांत पाणी आल्याचे माझ्या लक्षात आले. रात्री घरी आल्यावर मी त्यांना ‘या संतसन्मान सोहळ्यात तुम्हाला काय जाणवले ?’, असे विचारले. तेव्हा ते म्हणाले, ‘‘आजी संत आहेत ना ? ‘मग त्या आताच घरी का गेल्या ? त्यांनी आश्रमात थांबायला पाहिजे’, असे मला वाटले. (पू. दीक्षितआजी त्यांच्या संत सन्मान सोहळ्यानंतर त्याच दिवशी त्या परत बेळगावला गेल्या). तसेच मला सूक्ष्मातून समोर नारायण (परात्पर गुरुदेव) दिसत होते. त्यामुळे मला शांत वाटले आणि माझा भाव जागृत झाला.’’

३. एकदा परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी पू. वामन यांना ते बोलत नसण्याविषयी विचारल्यावर पू. वामन यांनी त्यांच्या आईला ‘परात्पर गुरुदेवांच्या समोर आपण बोलू नये आणि त्यांच्याकडे पहायचे नसते’, असे सांगणे

एकदा परात्पर गुरुदेवांनी पू. वामन यांना विचारले, ‘‘वामन, आज तू काहीच का बोलत नाहीस ? याचे उत्तर आईला सांग.’’ त्यावर पू. वामन यांनी सांगितले, ‘‘आई, नारायण (परात्पर गुरुदेव) हे आपले गुरु आहेत. गुरूंच्या समोर आपण बोलायचे नाही. त्यांच्याकडे पहायचेही नसते.’’

वरील सर्व उत्तरांवरून ‘पू. वामन यांची प्रगल्भता, त्यांची सूक्ष्मातील जाणण्याची क्षमता, त्यांचे सामर्थ्य, तसेच अगदी अत्यल्प शब्दांत ते उत्तर देतात’, ही त्यांची गुणवैशिष्ट्ये माझ्या लक्षात आली. परात्पर गुरुदेवांनी ‘बालसंतांच्या माध्यमातून किती दिव्य जीव अनुभवायला दिले आहेत’, याची जाणीव होऊन पुष्कळ कृतज्ञता व्यक्त होत होती. ‘परात्पर गुरुदेवांच्या कृपेनेच आम्ही पू. वामन यांच्या बाललीलांमधील आध्यात्मिक अर्थ समजून घेऊ शकतो आहोत’, याची प्रत्येक क्षणी जाणीव होते. परात्पर गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– सौ. मानसी अनिरुद्ध राजंदेकर (पू. वामन यांची आई, आध्यात्मिक पातळी ६१ टक्के), फोंडा, गोवा. (२१.१२.२०२१)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक