संभाजीनगर येथे रात्री १० वाजल्यानंतर ध्वनीक्षेपकावरून भाषण केल्याप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार !

शिवसेनेचाही आक्षेप !

श्री. एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

संभाजीनगर – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ३१ जुलैच्या रात्री १० वाजल्यानंतरही क्रांती चौक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर ध्वनीक्षेपकावरून भाषण करून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात येथील क्रांती चौक पोलीस ठाण्यात सामाजिक कार्यकर्ते आनंद कस्तुरे यांनी तक्रार प्रविष्ट केली आहे. सर्वाेच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केल्याचा आरोप करून मुख्यमंत्र्यांवर गुन्हा नोंद करण्याची मागणी कस्तुरे यांनी तक्रारीत केली आहे. पोलिसांनी कस्तुरे यांचा अर्ज स्वीकारला आहे; मात्र तूर्त त्या विरोधात कोणतीही कारवाई केलेली नाही. दुसरीकडे शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांनीही या प्रकरणी आक्षेप नोंदवला आहे. ते म्हणाले की, येथील पोलीस किरकोळ प्रकरणांतही गुन्हा नोंद करतात; पण मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात मध्यरात्रीपर्यंत ध्वनीक्षेपक यंत्रणा (डीजे) वाजत होती. त्यामुळे पोलिसांनी त्याची योग्य ती नोंद घेतली पाहिजे. कायदा सर्वांना समान आहे, हे पोलिसांनी दाखवून द्यावे.