सतत इतरांचा विचार करणारे आणि गुरुकार्याचा ध्यास असलेले सनातनचे ४२ वे समष्टी संत पू. अशोक पात्रीकर (वय ७२ वर्षे) !

पू. अशोक पात्रीकर

१. शिकण्याच्या स्थितीत असणे

पू. अशोक पात्रीकरकाका संत असूनही सतत इतरांकडून शिकण्याच्या स्थितीत असतात.  साधकांनी गुरुकार्य वाढवण्यासाठी केलेल्या सूचना ते लगेच लिहून घेतात. एकदा मी त्यांना म्हणाले, ‘‘नागपूर येथे बुद्धीजीवी वर्ग आहे. आपण गावाकडील भागात कार्य वाढवले पाहिजे.’’ तेव्हा पू. काकांनी लगेच ते सूत्र वहीत लिहून घेतले.

२. प्रेमभाव

अ. एकदा एका कार्यशाळेत काही शिबिरार्थी त्यांच्यासाठी आणलेला दुपारचा खाऊ न घेताच परत जात होते. पू. काकांनी ती चूक आमच्या लक्षात आणून दिली आणि तत्परतेने त्यांना परत बोलवायला सांगितले.

आ. एकदा एका साधिकेने तहान लागली; म्हणून पू. काकांच्या थर्मासमधील पाणी पिऊन संपवले. तेव्हा ‘अन्य साधकांनाही तहान लागली असेल’, असे वाटून पू. काकांनी मला सर्वांना पाणी द्यायला सांगितले.

इ. आम्ही छत्तीसगड येथे गेलो असतांना दौर्‍याच्या आरंभी आणि परत येत असतांना पू. काका आम्हाला सनातनचे १८ वे संत पू. चत्तरसिंग इंगळेकाकांकडे घेऊन गेले. त्यांनी मला सांगितले, ‘‘आपण पू. काकांसह जेवूया.’’ पू. काकांनी पू. इंगळेकाकांना अत्यंत प्रेमाने खाऊ दिला.

३. आवड-नावड नसणे

पू. काका साधकांना ‘मला अमुक एक पदार्थ हवा आहे’, असे कधीही सांगत नाहीत. एकदा एका कार्यशाळेच्या दिवशी सकाळी केलेले धिरडे त्यांनी रात्री खाल्ले.

४. इतरांना साहाय्य करणे

सौ. गौरी जोशी

अ. एकदा आम्ही छत्तीसगड येथे पू. चत्तरसिंग इंगळेकाकांकडे गेलो होतो. त्यांना रामनाथी आश्रमात काही कपडे पाठवायचे होते; पण ते ‘नेमके कुठे ठेवले होते ?’, हे त्यांना आठवत नव्हते. पू. पात्रीकरकाकांनी त्यांना कपडे शोधायला पुष्कळ वेळ साहाय्य केले आणि साधकांनाही कपडे शोधण्यास सांगितले अन् त्यांना कपडे शोधून दिले.

आ. एकदा मला आणि एका साधिकेला कार्यशाळेसाठी भ्रमणसंगणक हवा होता. तेव्हा पू. काकांनी स्वतःचा भ्रमणसंगणक आम्हाला दिला.

इ. पू. काकांचे वय होऊनही ते न थकता सतत सेवेचा विचार करतात. अधिवेशनाची सेवा करत असतांना कितीतरी दूरचा प्रवास ते न थकता उत्साहाने करत होते. त्यांना शारीरिक मर्यादा असूनही ते सतत इतरांना आनंदाने साहाय्य करत होते.

५. इतरांचा विचार करणे

एकदा छत्तीसगड येथील एका संतांनी पू. काकांना त्यांच्या समवेत महाप्रसाद घेणार असल्याचा निरोप दिला. तेव्हा पू. काकांनी त्या संतांची पुष्कळ वेळ वाट पाहिली. पू. काकांची नेहमीची जेवणाची वेळ उलटून अर्ध्या घंट्याने ते संत आले. त्यानंतर पू. काकांनी त्यांच्या समवेत जेवण केले.

६. कृतज्ञता आणि प्रार्थना

या दौर्‍यात मला २ संतांचा अपूर्व सत्संग मिळाला. मला त्यांच्याशी वार्तालाप करता आला आणि त्यांच्यातील प्रेमभाव अनुभवता आला. परात्पर गुरु डॉक्टरांनी आम्हाला इतके प्रेमळ आणि स्वतःच्या आचरणातून इतरांसमोर आदर्श ठेवणारे मार्गदर्शक संत दिले, त्याबद्दल मी परात्पर गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.

‘पू. काकांमधील ‘तळमळ आणि भाव’ आमच्यातही निर्माण होऊ दे’, अशी मी परात्पर गुरुदेवांच्या चरणी प्रार्थना करते.

– सौ. गौरी विद्याधर जोशी, नागपूर (२६.५.२०२२)