प.पू. दास महाराज यांचे वडील प.पू. भगवानदास महाराज आणि आई पू. रुक्मिणी नाईक यांना नागदेवतेच्या संदर्भात आलेल्या अनुभूती

प.पू. भगवानदास महाराज आणि पू. रुक्मिणी आई
प.पू. दास महाराज

१. नागदेवतेने चोरापासून गौतमारण्य आश्रमाचे रक्षण करणे

१ अ. चोरी करण्याच्या उद्देशाने आलेल्या अट्टल चोराला आईच्या (पू. रुक्मिणी नाईक यांच्या) पायावर मोठा सर्प दिसणे आणि तो घाबरून पळून जाणे : ‘माझी आई (पू. रुक्मिणी नाईक) रहात असलेल्या खोपीवर (झोपडीवर) नारळाच्या झावळ्या घातलेल्या होत्या. एकदा एक अट्टल चोर चोरी करण्याच्या उद्देशाने आला होता. त्याने झावळ्या बाजूला करून खाली पाहिले, तर काय ? आईच्या पायावर एक मोठा सर्प फणा काढून बसला होता. चोराने तो सर्प पाहिला आणि तो इतका घाबरला की, त्याने जागीच मलमूत्र विसर्जन केले आणि तो पळून गेला. तो सुपारीच्या झाडावर चढून चोरी करायचा. (शेवटी त्याला अर्धांगवायूचा झटका आला आणि तो मरण पावला.)

१ आ. पायावर नाग असल्याचे पाहून आईने त्याला ‘अंतर्धान पाव’, अशी प्रार्थना करणे आणि तो नाग प.प. श्रीधरस्वामींच्या पादुका ठेवलेल्या स्थानी जाऊन अदृश्य होणे : पहाटे ४ वाजता आईला जाग आली. तेव्हा तिला पायाला गार लागून जडपणा जाणवला. तिने डोळे उघडून पाहिले, तर ‘पायावर मोठा नाग फणा काढून तिच्याकडे पहात आहे’, असे तिला दिसले. आईने त्याला हात जोडून प्रार्थना केली, ‘बाबा, तू कोण आहेस ? तुझे हे रूप मला बघवत नाही. भगवंता, तुझे रूप सौम्य कर आणि तू अंतर्धान पाव.’ त्यानंतर तो नाग प.प. श्रीधरस्वामींच्या पादुका ठेवलेल्या देवघरात जाऊन अदृश्य झाला. सकाळी मी आश्रमात आलो, तर आश्रमात सुगंध पसरला होता. आश्रमात असलेल्या नागदेवतेच्या सूक्ष्मातील अस्तित्वामुळे हा सुगंध पसरल्याचे माझ्या लक्षात आले.

२. पू. रुक्मिणीआई यांच्या समवेत नागदेवता गौतमारण्य आश्रमात रहाणे आणि तिने आश्रमाचे रक्षण करणे

२ अ. नागपंचमीच्या आदल्या दिवशी प्रथेप्रमाणे मातीचे दोन नाग सिद्ध केल्यावर प्रत्यक्ष नागदेवता उपस्थित होणे, आईने पूजा करून तिला दुधाचा नैवेद्य दाखवणे : प.पू. भगवानदास महाराज यांच्यानंतर मी आणि आई आश्रमात रहात होतो. नागपंचमीच्या आदल्या दिवशी आईने मला आमच्या प्रथेप्रमाणे दोन नाग सिद्ध करायला सांगितले. मी आईकडे नागांना बसण्यासाठी पाट मागितला. तेव्हा आई म्हणाली, ‘‘पाट धुऊन भिंतीवर ठेवला आहे. तो घे.’’ पाट घेणार, तेवढ्यात त्या पाटाच्या बाजूलाच मला एक मोठा नाग फणा काढून बसल्याचे दिसले. मी घाबरून आईला बोलावले. आई म्हणाली, ‘‘अरे प्रत्यक्षच नागदेवता आली आहे. तिची अक्षता, फूल घालून पूजा कर आणि तिला दुधाचा नैवेद्य दाखव.’’ माझे पूजा करण्याचे धाडस झाले नाही. त्यामुळे आईनेच पूजा करून नागदेवतेसमोर दूध ठेवले. नागदेवतेने ते दूध प्राशनही केले. आम्ही एका सर्पमित्राला विचारले, ‘‘नाग दूध पितो का ?’’ त्याने सांगितले, ‘‘जंगली नाग दूध पीत नाहीत, तर पशू-पक्ष्यांची अंडी खाऊन जगतात. गारुडी नागासाठी पक्ष्यांची अंडीच शोधून आणतात. जे दैवी नाग असतात, ते दूध पितात. हा दैवी नाग असल्याने त्याने दूध प्राशन केले.’’

२ आ. आईच्या साधनेमुळे नागदेवता २ दिवस आश्रमात थांबणे आणि तेव्हापासून आईने मला हाताने नागाच्या प्रतिमा बनवून त्यांचे पूजन करण्यास सांगणे : दुसर्‍या दिवशी आम्ही मातीच्या नागदेवतेच्या प्रतिमांचे पूजन करून संध्याकाळी त्या प्रतिमा आळूच्या झाडामध्ये ठेवून खोपीत (झोपडीत) परत आलो. आईच्या साधनेमुळे दोन दिवस ती एकाच जागेवर बसून होती. तेव्हापासून आईने सांगितले, ‘‘जिवात जीव असेपर्यंत तूही नागदेवतेची पूजा कर. बाजारातून नागाची प्रतिमा न आणता तूच हाताने नागाची प्रतिमा करून तिचे पूजन कर.’’ आईने सांगितल्याप्रमाणे मी आजपर्यंत नागदेवतेची पूजा करत आहे.

३. प.पू. भगवानदास महाराज यांच्यावर असलेली नागदेवतेची कृपा !

३ अ. नागाने दंश करूनही प.पू. भगवानदास महाराज यांना विषबाधा न होता केवळ त्यांचा पाय सुजणे : गळदगा, निपाणी येथे प.पू. भगवानदास महाराज विहिरीच्या पाण्यात उभे राहून नामजप करत असतांना त्यांच्या कमरेला एक मोठा नाग गुंडाळला आणि त्याचा फणा महाराजांच्या चेहर्‍यासमोर आला. हे दृश्य मंदिरात आलेल्या लोकांनी पाहिले आणि ते घाबरून एकदम किंचाळले. त्यामुळे नाग बिथरला आणि त्याने महाराजांच्या पायाला दंश केला. त्यानंतर महाराजांचा पाय सुजला. सद्गुरूंच्या कृपेने नागाने दंश करूनही महाराजांचा विषबाधेने मृत्यू झाला नाही. केवळ पायाला सूज आली.

३ आ. नागदंशाचा दोष अल्प होण्यासाठी प.प. श्रीधरस्वामींनी सांगितलेले कठोर उपाय प.पू. भगवानदास महाराजांनी करणे : नागाने दंश केल्यामुळे आलेली पायाची सूज आणि वेदना अल्प करण्यासाठी, तसेच दंश केलेला दोष नाहीसा होण्यासाठी प.प. श्रीधरस्वामींनी प.पू. भगवानदास महाराजांना अन् पू. आईंना उपाय सांगितले. त्यांनी दोघांना रत्नागिरी येथे जाऊन समुद्राच्या पाण्यात उभे राहून १ लाख गायत्रीमंत्राचा जप करण्यास आणि कुलदेवीला नारळ ठेवून प्रार्थना करण्यास सांगितली. समुद्रातील खारे पाणी आणि पाण्यातील मासे महाराजांच्या पायांतून येणारे पू आणि रक्त शोषून घ्यायचे. त्यानंतर वैद्य त्यावर मलमपट्टी करत. स्वामींनी सांगितलेले हे उपाय केल्यावर नागदंशाचा दोष न्यून झाला.

४. गौतमारण्य आश्रमात सेवा करणार्‍या अनेक साधकांना अंगावर सोनेरी केस असलेल्या नागदेवतेचे दर्शन होत असणे; परंतु नागदेवतेने कुणालाही दुखापत न करणे

गौतमारण्य आश्रमात अनेक वर्षांपासून सईमावशी (श्रीमती सई झोरे) बागकाम करायला येतात. मावशींना बागेत काम करतांना झाडीमध्ये, आश्रमातील झर्‍याजवळ अंगावर सोनेरी केस असलेल्या आणि फणा काढून बसलेल्या नागदेवतेचे दर्शन होते; पण कधीच त्या नागदेवतेने त्यांना दुखापत केली नाही.

आश्रमाभोवती नागदेवता फिरत असतात. त्यांच्या अंगावर सोनेरी केस आहेत. केस दिसतच नाहीत, तर ‘सोन्याच्या काड्या लावल्या आहेत’, असे दिसते. मी वर्ष १९६१ मध्ये गौतमारण्य आश्रमात आलो. तेव्हापासून आजपर्यंत ६१ वर्षे झाली; परंतु नागदेवतेने कुणालाही कधीच कसला त्रास दिला नाही. त्या आश्रमाचे आणि आम्हा सर्वांचे रक्षणच करतात. बर्‍याचदा श्रीरामनवमीच्या दिवशी मंदिराच्या आवारात येऊन त्या श्रीरामाचे दर्शन घेऊन जातात. श्रीरामनवमीची सेवा करणार्‍या साधकांनाही नागदेवतेचे दर्शन होते.’

– प.पू. दास महाराज, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२९.७.२०२२)

या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक