भोसरी भूखंड प्रकरणी एकनाथ खडसे यांना कारागृहात जावे लागेल ! – गिरीश महाजन, आमदार, भाजप

डावीकडून एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन

जळगाव – भोसरी भूखंड प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे एकनाथ खडसे यांनी जे पराक्रम केले, ते समोर आहेत. त्यांचे जावई गिरीश चौधरी हे कारागृहात आहेत. त्यांना न्यायालय जामीन का देत नाही ? भूखंडाची किंमत ३० कोटी रुपये असतांना ती ३ कोटी रुपये दाखवण्यात आली. मंत्रीपदावर असतांना अनेक अपकृत्ये केल्याने ते चौकशीच्या फेर्‍यांत अडकले आहेत. जावयासमवेत त्यांनाही लवकरच कारागृहात जावे लागेल. यात कुणाचाही ‘हात’ असल्याचा संबंध नाही, अशी प्रतिक्रिया भाजपचे आमदार गिरीश महाजन यांनी दिली. ते पक्षाच्या जिल्हा बैठकीसाठी आले असता जळगाव येथे पत्रकारांशी बोलत होते.

आपली भूमिका स्पष्ट करतांना आमदार एकनाथ खडसे म्हणाले, ‘‘भोसरी भूखंड प्रकरणी आतापर्यंत अनेक चौकशी समित्यांकडून चौकशी झाली. त्यात काही सापडले नाही. फडणवीस सरकारने मी निर्दोष (क्लीनचीट) असल्याचा अहवाल दिला आहे. तरी पुन्हा ते प्रकरण काढून माझे मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आगामी काळात होणार्‍या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून हे सर्व राजकारण चालले आहे.’’