दौंड (पुणे) येथील कर्तव्यदक्ष शिक्षणाधिकार्‍याचे स्थानांतर !

राजकीय संस्थाचालकांच्या हट्टापायी हा प्रकार घडल्याची चर्चा !

पंचायत समितीचे प्रभारी गटशिक्षण अधिकारी किसन भुजबळ

दौंड (जिल्हा पुणे) – येथील बोगस शिक्षण संस्थांना आळा घालणारे पंचायत समितीचे प्रभारी गटशिक्षण अधिकारी किसन भुजबळ यांचा पदभार अवघ्या ११० दिवसांत काढून घेण्यात आला आहे. किसन भुजबळ हे पुणे जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात विस्तार अधिकारी म्हणून काम पहात होते. त्याच पदावर कार्यरत असतांना त्यांना गटशिक्षण अधिकारी या पदाचाही अतिरिक्त पदभार दिला होता. राजकीय संस्थाचालकांच्या हट्टापायी हा प्रकार घडला असल्याचे म्हटले जात आहे. किसन भुजबळ यांच्या जागी शिरूरचे बाळकृष्ण कमळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

किसन भुजबळ यांनी बोगस (खोट्या) शिक्षण संस्थांना लगाम लावून ५ शिक्षण संस्थांना टाळे ठोकले, तर ३ शिक्षण संस्थांकडून १४ लाख रुपयांचा दंड आकारण्याच्या संदर्भात त्यांना नोटिसा पाठवल्या होत्या. कामकाजात चुकारपणा करणार्‍या काही शिक्षकांना सूचनाही दिल्या होत्या. परिणामी अचानक कुठल्याही शाळेला भेटी देणार्‍या किसन भुजबळ यांचा अंकुश दौंड तालुक्यातील शिक्षण व्यवस्थेमध्ये होता. त्यामुळे त्यांचा अतिरिक्त पदभार काढून घेण्यात आला. ‘प्रशासकीय कारणास्तव पदभार काढून घेत आहे’, असे कारण जिल्हा परिषदेने दिले आहे.