स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांनी जागे झालेले प्रशासन आणि सरकार ! झोपी गेलेल्या जनतेला असेच झोपलेले प्रशासन आणि सरकार मिळणार !

प्रभादेवी मंदिरासमोर ‘सेंट थॉमस चर्च’ उल्लेख असणारा महापालिकेने बसवलेला ब्रिटीशकालीन मैलाचा दगड

‘मुंबईतील प्रभादेवी या पुरातन मंदिराच्या समोर ‘सेंट थॉमस चर्च’ असा उल्लेख असलेला मैलाचा दगड मुंबई महानगरपालिकेच्या पुरातन वास्तू जतन विभागाकडून नुकताच लावण्यात आला होता. मंदिरात जाण्याच्या मार्गात मध्येच, तसेच चर्चचा उल्लेख असलेला दगड लावण्यात आल्याने स्थानिक नागरिक आणि हिंदुत्वनिष्ठ यांच्याकडून संताप व्यक्त करण्यात येत होता. या विरोधात बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी तात्पुरते कह्यात घेतले. हिंदुत्वनिष्ठांच्या प्रक्षोभामुळे अंततः महानगरपालिका प्रशासनाने हा दगड हटवला आहे.

आक्रमणकर्त्या ब्रिटिशांचे उदात्तीकरण कशासाठी ?

‘खरेतर मैलाचे अंतर मोजण्यासाठी बसवलेल्या या दगडांवर ब्रिटिशांना भारतात त्या वेळी अस्तित्वात असलेल्या ठिकाणाचा उल्लेख करता आला असता; मात्र त्यांनी जाणीवपूर्वक स्वत:च्या प्रतिकाचा म्हणजे ‘सेंट थॉमस चर्च’चा उल्लेख केला. असे असतांना स्वातंत्र्योत्तर काळात आपण आपल्या प्राचीन भारतीय प्रतिकांचा उल्लेख का करू नये ? ब्रिटिशांचे उदात्तीकरण करण्याऐवजी प्रशासनाने भारतातील प्राचीन वास्तूंचा उल्लेख दगडांवर करणे अपेक्षित होते. यापूर्वी ‘व्हिक्टोरिया टर्मिनस’, ‘एल्फिन्स्टन’, ‘बाँबे’ आदी अनेक ब्रिटीश नावे मुंबई महानगरपालिकेने पालटली आहेत, मग या मैलांच्या दगडांचे जतन करतांना ब्रिटिशांचे उदात्तीकरण कशासाठी ? त्यामुळे या दगडांवरील ‘सेंट थॉमस चर्च’चा उल्लेख काढून जेथून हे मोजमाप प्रारंभ करण्यात आले आहे, तेथील भारतीय वास्तूचा उल्लेख करावा, अशी भारतीय म्हणून देशवासियांची अपेक्षा असणे स्वाभाविक आहे.’ – संपादक