गोव्याचा इतिहास पाठ्यपुस्तकात घेण्यासाठी लिखाण सिद्ध नाही !

नवे लिखाण सिद्ध करण्यासाठी समितीची स्थापना

पणजी – ४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर गोवा शिक्षण मंडळाच्या इयत्ता ९ वीच्या इतिहासाच्या पुस्तकात गोव्याच्या इतिहासाविषयी महत्त्वाच्या घटनांचा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे; परंतु याविषयी कार्यवाही करण्यासाठी गोव्यातील इतिहासाविषयीचे लिखाण अद्याप सिद्ध झालेले नाही. त्यामुळे वर्ष २०२२-२३ या शालेय वर्षातील इतिहासाच्या अभ्यासक्रमात त्याचा समावेश होणार नाही.

सध्याच्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकात गोव्याचा इतिहास आणि स्वातंत्र्यलढा यांविषयी माहिती असलेला एक लहान धडा आहे. इयत्ता ९ वीच्या पाठ्यपुस्तकात गोव्याच्या इतिहासाविषयीचे नवे लिखाण सिद्ध करण्यासाठी वर्षा कामत यांच्या नेतृत्वाखाली एक समिती नेमण्यात आली आहे. या समितीमध्ये गोव्याच्या माजी शिक्षण संचालिका सेल्सा पिंटो, तसेच इतिहासतज्ञ प्रजल साखरदांडे यांचा समावेश आहे.

गोवा शिक्षण मंडळाच्या निर्णयानुसार इयत्ता ९ वीच्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकात समाविष्ट करण्यासाठी कुंकळ्ळी येथील उठाव, पिंटो कट, गोवा विधानसभा स्थापनेमागचा इतिहास इत्यादी मजकूर सिद्ध केला जात आहे. अशा प्रकारे पहिल्यांदाच इयत्ता ९ वीच्या पाठ्यपुस्तकात गोव्याच्या इतिहास समाविष्ट करण्यात येईल. ‘गोवा राज्यातील विविध गटांकडून हा इतिहास समाविष्ट करण्यात यावा’, अशी मागणी करण्यात येत होती. वर्ष २०१९-२० मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी ‘गोव्याचा इतिहास अभ्यासक्रमात समाविष्ट केला जाईल’, असे आश्वासन दिले होते. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या कार्यवाहीला आरंभ केला आहे.

संपादकीय भुमिका

  • गोव्याचा इतिहास पाठ्यपुस्तकात समाविष्ट होण्यासाठी लवकरात लवकर कृती होणे गोमंतकियांना अपेक्षित आहे !
  • हा इतिहास पाठ्यपुस्तकात समाविष्ट होईपर्यंत शिक्षण खात्याने वेगळा उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना याविषयी माहिती द्यायला हवी !