पणजी, २९ जुलै (वार्ता.) – रात्रीच्या वेळी झालेले ९५ टक्के अपघात मद्यपान करून वाहन चालवल्याने झाले आहेत. त्यामुळे मद्यपान करून वाहन चालवणार्यांवर कडक कारवाई करण्यासाठी कायद्यात सुधारणा करण्याची सरकारची सिद्धता असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी म्हटले आहे. २६ जुलैच्या मध्यरात्री झुवारी पुलावरून चारचाकी वाहन कठडा तोडून नदीत कोसळल्याने ४ जणांचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.
ते म्हणाले, ‘‘सध्या अस्तित्वात असलेला कायदा थोडा मवाळ आहे. मद्यपान करून वाहन चालवतांना कुणी आढळल्यास दंड देऊन सोडले जाते. मद्यपान करून वाहन चालवणार्यांवर कडक कारवाई व्हायला हवी. प्रसंगी वाहनचालक अनुज्ञप्ती निलंबित व्हायला हवी, असे सरकारचे ठाम मत आहे.’’
रस्त्यांवर सी.सी.टी.व्ही. बसवणार ! – माविन गुदिन्हो, वाहतूकमंत्री
रात्रीच्या वेळी रस्ते मोकळे असल्याने अनेक जण भरधाव वेगात वाहन चालवतांना दिसतात. त्यातूनच भीषण अपघाताच्या घटना घडत आहेत. रात्रीच्या वेळी पोलीस नसल्याने वाहनचालक सुसाट वाहने हाकतात. यावर नियंत्रण आणण्यासाठी महामार्ग, तसेच अन्य मार्गांवर सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. कोण भरधाव वाहने चालवतात, ते कॅमेर्याद्वारे कळेल आणि त्यांना दंडाचे देयक थेट घरी पाठवण्यात येईल, अशी माहिती वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी दिली.
लवकरच स्वयंचलित यंत्रणेद्वारे रहदारीवर लक्ष ठेवले जाईल ! – नीलेश काब्राल, सा.बां. मंत्री
समाजाला शिस्त असेल, तर अपघात रोखण्यासाठी कोट्यवधी रुपयांची अत्याधुनिक यंत्रणा बसवण्याची आवश्यकताच नाही !
पणजी – गोव्यातील रस्त्यांवरील रहदारीवर २४ घंटे लक्ष ठेवण्यासाठी लवकरच स्वयंचलित यंत्रणा बसवण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री नीलेश काब्राल यांनी दिली आहे. ते म्हणाले, ‘‘हा प्रकल्प एखाद्या खासगी आस्थापनाला देण्याचा सरकारचा विचार आहे. अधिक गतीने वाहने चालवणे, चुकीच्या जागी ‘ओव्हरटेकींग’ करणे या गोष्टींवर या यंत्रणेद्वारे २४ घंटे लक्ष देण्यात येईल. पोलीस २४ घंटे रस्त्यावरील रहदारीकडे लक्ष देऊ शकत नाहीत. त्यामुळे अशा यंत्रणेची आवश्यकता आहे. याविषयी मी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, तसेच माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री रोहन खंवटे यांच्याशी बोललो आहे. वाहनचालकांनी स्वतःवर नियंत्रण ठेवून वाहने नियमानुसार ठरवलेल्या गतीने चालवावीत.’’