प्रवीण नेट्टारू यांच्या हत्येचे प्रकरण ‘एन्.आय.ए.’कडे सोपवण्यात येणार !

मुख्यमंत्री बसवराज बोम्माई आणि हत्या झालेले भाजपचे युवा मोर्चाचे दक्षिण कन्नड जिल्हा सचिव प्रवीण नेट्टारू

बेंगळुरू – राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि मंत्री यांच्याशी झालेल्या उच्चस्तरीय बैठकीनंतर प्रवीण नेट्टारू यांच्या हत्येचे प्रकरण राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडे सोपवण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री बोम्माई यांनी २९ जुलैच्या सायंकाळी प्रसारमाध्यमांना दिली. हत्येच्या प्रकरणात संघटित गुन्हेगारी आणि आंतरराज्य संबंध असल्याच्या कारणाने हे प्रकरण ‘एन्.आय.ए.’कडे सोपवण्यात येईल, असेही बोम्माई म्हणाले.

चकमकींच्या संदर्भात आम्ही उत्तरप्रदेशच्या ५ पावले पुढे असू ! – अश्‍वथ नारायण, उच्च शिक्षणमंत्री, कर्नाटक

प्रवीण नेट्टारू यांच्या हत्येच्या प्रकरणात दोषी असणार्‍यांना अटक केली जाईल; मात्र अशा घटना घडूच नयेत, अशी आमच्या (भाजपच्या) कार्यकर्त्यांची इच्छा आहे. कार्यकर्त्यांच्या इच्छेनुसार कारवाई केली जाईल. चकमकींच्या संदर्भात आम्ही उत्तरप्रदेशच्या ५ पावले पुढे असू, असे वक्तव्य कर्नाटकचे उच्च शिक्षणमंत्री अश्‍वथ नारायण यांनी केले.

आवश्यकता भासल्यास कर्नाटकात उत्तरप्रदेशातील ‘योगी मॉडेल’ लागू करू ! – मुख्यमंत्री बोम्माई

(‘योगी मॉडेल’ म्हणजे गुन्हेगारांच्या विरोधात उत्तरप्रदेश पोलीस आणि प्रशासन यांच्याकडून अवलंबण्यात येणारे कठोर कारवाईचे धोरण)

प्रवीण नेट्टारू यांच्या हत्येनंतर भाजपचे कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. मुख्यमंत्री बसवराज बोम्माई करत असलेली कारवाई  आणि घेत असलेली भूमिका यांवरही ते समाधानी नाहीत. या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री बोम्माई यांनी, ‘आवश्यकता भासल्यास कर्नाटक राज्यातही ‘योगी मॉडेल’ लागू करू. आम्ही आवश्यक ती सर्व पावले उचलणार आहोत. जर आम्हाला अधिक कठोर व्हावे लागले, तरीही आमची पावले डगमगणार नाहीत’, असे म्हटले आहे. त्यामुळे आता ‘कर्नाटकातही उत्तरप्रदेशप्रमाणे ‘बुलडोझर’ चालवला जाईल का ?’, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. उत्तरप्रदेशात दंगल अथवा अन्य कोणत्या गुन्हेगारी कृत्यात सहभागी असणार्‍यांची घरे अथवा दुकाने अनधिकृत असल्याचे आढळल्यास त्यांच्यावर बुलडोझर चालवला जात आहे. तसेच कर्नाटकातही व्हावे, अशी अपेक्षा लोक व्यक्त करत आहेत.

१. भाजपचे कर्नाटकातील आमदार आणि खासदार यांनाही कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.

२. भाजपचे कार्यकर्ते उत्तरप्रदेशातील ‘बुलडोझर’च्या राजकारणाने पुष्कळ प्रभावित आहेत.

३. योगी आदित्यनाथ यांच्या कठोर बाण्यामुळेच उत्तरप्रदेशातील कायदा आणि सुव्यवस्था सुधारल्याचेही सांगण्यात येत आहे. त्यामुळे ‘योगी मॉडेल’ कर्नाटकात लागू करण्याची आग्रही मागणी भाजपच्या कार्यकर्त्यांकडून होत आहे.