महाराष्ट्रातील १०४ मदरशांना राज्य सरकारकडून ३ कोटी ८३ लाख रुपयांचे अनुदान !

मुंबई, २९ जुलै (वार्ता.) – ‘डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजने’च्या अंतर्गत महाराष्ट्र सरकारकडून राज्यातील १०४ मदरशांना ३ कोटी ८३ लाख रुपयांचे अनुदान देण्यात आले आहे. वर्ष २०२२-२३ मध्ये सरकारकडून मदरशांच्या आधुनिकीकरणासाठी १५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या निधीच्या अंतर्गत सरकारकडून हा निधी देण्यात येत आहे.

मदरशांमध्ये शिकणार्‍या विद्यार्थ्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पांरपरिक धार्मिक शिक्षणासह अन्य शैक्षणिक विषयांचे शिक्षण देणे, विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती देणे, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ होऊन रोजगारक्षमता वाढावी, तसेच त्यांचा आर्थिक दर्जा सुधारावा, यांसाठी मदरशांच्या आधुनिकीकरणासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या सत्ताकाळात वर्ष २०१३ मध्ये या योजनेला आरंभ करण्यात आला होता. यामध्ये संभाजीनगर, जालना, नांदेड, बीड, धाराशिव, लातूर, हिंगोली आणि वर्धा येथील मदरशांचा समावेश आहे. यापूर्वी मे २०२२ मध्ये ‘डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजने’च्या अंतर्गत राज्यातील ५७ मदरशांना २ कोटी ९ लाख ९० सहस्र रुपये इतके अनुदान देण्यात आले होते.

संपादकीय भूमिका

  • धर्मनिरपेक्ष देशात धर्माच्या आधारावर मदरशांना अनुदान कशासाठी ?
  • असे अनुदान कधी हिंदूंच्या संस्थांना दिले आहे का ?