अभिनेता रणवीर सिंह याला सामाजिक कार्यकर्ते अनिरुद्ध यादव यांच्याकडून कायदेशीर नोटीस !

सामाजिक माध्यमांवर अश्‍लील छायाचित्रे प्रसारित केल्याचे प्रकरण

अभिनेता रणवीर सिंह

मुंबई, २६ जुलै (वार्ता.) – सामाजिक माध्यमांवर स्वत:ची नग्न छायाचित्रे प्रसारित केल्याच्या प्रकरणी नालासोपारा (जिल्हा पालघर) येथील सामाजिक कार्यकर्ते श्री. अनिरुद्ध यादव यांनी अभिनेता रणवीर सिंह याला कायदेशीर नोटीस पाठवली आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे अधिवक्ता प्रकाश साळसिंगीकर आणि अधिवक्ता प्रथमेश गायकवाड यांच्याद्वारे अनिरुद्ध यादव यांनी २५ जुलै या दिवशी ही नोटीस पाठवली आहे.

रणवीर सिंह याला पाठवलेल्या नोटिसीमध्ये श्री. अनिरुद्ध यादव यांनी म्हटले आहे…

१. तुम्ही चित्रपटसृष्टीतील आघाडीचे अभिनेता असून सार्वजनिक क्षेत्रात वावरणारे व्यक्तिमत्त्व आहात. इंस्टाग्रामसह अन्य सामाजिक माध्यमांवर तुमचे लक्षावधी समर्थक आहेत. तुम्ही स्वत:ची प्रसारित केलेली नग्न छायाचित्रे अश्‍लीलता आणि अनैतिकता यांना प्रोत्साहन देणारी आहेत.

२. तरुणवर्ग तुमचा चहाता आहे. तरुणवर्गावर तुमचा मोठा प्रभाव आहे. अशा नग्न छायाचित्रांमुळे तरुणांच्या मनावर वाईट परिणाम होऊ शकतो. यामुळे समाजातील तरुणवर्गही अशा प्रकारची कृती करू शकतो. तुमच्यासारख्या प्रसिद्ध व्यक्तीने अशा प्रकारे अश्‍लील छायाचित्रांचे प्रदर्शन करणे, हे समाजात अश्‍लीलतेला प्रोत्साहन देणारे आहे.

३. भारत हा संस्कृतीप्रधान देश आहे. तुमच्यासारख्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील व्यक्तीने अशा प्रकारचे अश्‍लील छायाचित्रे सामाजिक माध्यमांवर प्रसारित करणे म्हणजे एकप्रकारे भारताची प्रतिमा मलीन करणारे आहे.

४. तुम्ही प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व असल्यामुळे सावर्जनिक जीवनात दायित्वाचे भान ठेवून बोलणे, हे तुमचे दायित्व आहे. प्रसिद्धीसाठी समाजात अशा प्रकारे अश्‍लीलता पसरवणे अयोग्य आहे.