इस्लामच्या चिनीकरणाची प्रक्रिया ही वर्ष २०१७ मध्ये चालू झाली होती. चीनच्या शिनजियांग प्रांतातील उघूर मुसलमानांना शिबिरांच्या नावाखाली छळछावण्यांमध्ये डांबून, त्यांच्यावर अत्याचार करून, त्यांच्या बायकांचे बळजोरीने गर्भपात घडवून चिनी कम्युनिस्ट (साम्यवादी) सरकारने तेथील इस्लामचे चिनीकरण चालू केले.
१. चीनमधील उघुरांवरील दडपशाहीविषयी इस्लामी देश गप्प का ?
उघुरांवरील ही दडपशाही लपवण्याचेही चीनने आटोकाट प्रयत्न केले. चीनमधील उघुरांची स्थिती जगासमोर मांडणार्या संस्था आणि पत्रकार यांच्यावरही चीनने बंदी आणली; पण तरीही जवळपास १.८ दशलक्ष (१८ लाख) चिनी उघुरांवरील नृशंस अत्याचाराच्या कथा जगासमोर आल्या. अमेरिका आणि हाताच्या बोटावर मोजण्याइतपत काही पाश्चिमात्त्य देश सोडल्यास या हत्याकांडावरून चीनला कुणीही खडसावणे फारसे आवश्यक समजले नाही. एवढेच नाही, तर काश्मीरवरून कावकाव करणार्या, इस्लामी बंधुभावची तळी उचलणार्या इस्लामी देशांनी तर जणू डोळ्यांवर चक्क पट्टी बांधली.
२. संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार आयोगाने चीनच्या पाशवी धोरणांविषयी चिंता व्यक्त करणे
चीनशी असलेले व्यापारी हितसंबंध इस्लामपेक्षा वरचढ ठरले. अशा परिस्थितीत मे मासातच चीन सरकारशी प्रचंड वाटाघाटीनंतर संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार आयोगाच्या प्रमुख मिशेल बॅचलेट यांनी शिनजियांग प्रांताला भेट दिली. तेथील उघूर मुसलमानांशी चर्चा केली. त्यानंतर मिशेल यांनीही चीनकडून या प्रांतात आतंकवाद आणि कट्टरता यांच्या विरोधाच्या नावाखाली राबवलेल्या पाशवी धोरणांवर प्रश्न उपस्थित केले, तसेच ‘चीनच्या या धोरणांचा उघूर अन् अन्य मुसलमान अल्पसंख्यांकांच्या अधिकारांवर होणारा परिणामही चिंताजनक आहे’, असे त्या म्हणाल्या.
३. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी इस्लाम धर्मियांना चीनमध्ये रहाण्याविषयी चेतावणी देणे
यानंतर चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी काही दिवसांपूर्वीच शिनजियांगला भेट दिली आणि त्यांच्या मनातील, तसेच पक्षातील इस्लामच्या चिनीकरणाचे मनसुबे उघडपणे तोंडावर आले. राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर वर्ष २०१४ नंतर जिनपिंग हे पहिल्यांदाच शिनजियांग प्रांतात गेले. तिथे त्यांनी भेटीगाठी आणि कार्यक्रमांच्या माध्यमातून इस्लाम धर्मियांना ‘चीनमध्ये रहायचे असेल, तर चिनी कम्युनिस्ट पक्ष आणि राष्ट्र यांच्या अनुषंगानेच जगावे लागेल’, अशी एक प्रकारची धमकीही देऊन टाकली. एकीकडे ‘तुम्ही तुमच्या धर्माचे खुशाल पालन करा’, असे जिनपिंग म्हणाले खरे; पण ‘तुमचा धर्म हा चीनच्या साम्यवादी धोरणांतच बसणारा हवा, अन्यथा त्याला या भूमीत कदापि स्थान नाही’, असे त्यांनी ठणकावून सांगितले. याचाच अर्थ ‘तेथील अल्पसंख्यांकांनी त्यांची धार्मिक ओळख आणि कृती यांना प्राधान्य न देता स्वतःची ओळख ‘चिनी नागरिक’ हीच सर्वस्व मानावी. त्यानुसार वर्तन करावे’, असा स्पष्ट संकेत जिनपिंग यांनी दिला.
यावरूनच चीनचा उघुरांकडे पहाण्याचा दृष्टीकोन पूर्णत: स्पष्ट होतो, तसेच यातून चीनचे यासंबंधीचे धोरण अधोरेखित होते. आता लोकशाही, धार्मिक स्वातंत्र्य, मानवी मूल्य वगैरे यांच्याशी चीनचा सूतराम संबंध नाहीच. त्यामुळे मानवाधिकारांचे चीनकडून यापूर्वी ना कधी पालन झाले आणि यानंतरही तसे काही होण्याची शक्यता ही शून्यच !
४. इस्लामच्या चिनीकरणाविषयी भारतातील साम्यवादी गप्प का ?
या निमित्ताने चीन आणि साम्यवाद यांची तळी उचलणार्या भारतातील कम्युनिस्टांचे या भूमिकेविषयी काय म्हणणे आहे ? केंद्र सरकारवर अल्पसंख्यांकांच्या खच्चीकरणाचे आरोप करणार्या या कम्युनिस्टांना जिनपिंग यांच्या उघुरांविषयीच्या धोरणाविषयी आता काय वाटते ? तसेच हिंदु राष्ट्रवाद, भारतीय राष्ट्रवाद यांना कडाडून विरोध करणार्या याच मंडळींना जिनपिंग यांची चिनी राष्ट्रवादाची संकल्पना तरी मान्य आहे का ? यावर भारतीय कम्युनिस्टांनी स्वतःची भूमिका स्पष्ट करावी; पण त्यांच्याकडून तसे होणे नाही. ‘चीनमध्ये पाऊस पडला की, इथले कम्युनिस्ट छत्री उघडतात’, हा पूर्वापारचा समज अनेक उदाहरणांतून सिद्ध झाला आहेच; पण चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या दावणीलाच बांधलेल्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाकडून जिनपिंग यांच्या युक्तीवादाचे खंडण होणे नाही. त्यामुळे इस्लामचे चिनीकरण हा इतिहास होता, वर्तमानही आहे आणि असेच चालू राहिले, तर चीनमधून इस्लाम नामशेष होईल, तो दिवस आता दूर नाहीच !
– श्री. विजय कुलकर्णी, मुख्य उपसंपादक (फीचर्स)
(साभार : दैनिक ‘मुंबई तरुण भारत’)