डॉ. विलास आठवले यांची देवभूमीतील समाजसेवेची चार तपे

‘हा लेख वर्ष २००९ मध्ये छापलेला आहे. आता डॉ. विलास आठवले यांचे कार्य अनेक पटींनी वाढले आहे. यावरून ‘त्यांची आध्यात्मिक प्रगती किती झपाट्याने होत आहे’, याची कल्पनाही करता येत नाही !’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले (डॉ. विलास आठवले यांचे ज्येष्ठ बंधू) (२८.५.२०२२)    

१. उत्तराखंडमधील उत्तर काशी आणि गुप्तकाशी परिसरातील अनेक गावांमध्ये अनेक उपक्रम राबवणे

डॉ. विलास आठवले

‘उत्तराखंडमधील उत्तर काशी आणि गुप्तकाशी परिसरांतील अनेक गावांना आज एका देवदुताचा मदतीचा हात मिळाला आहे. त्याचे नाव डॉ. विलास आठवले, असे आहे. त्यांनी तब्बल चार दशकांहून अधिक काळ प्रसिद्धीपासून संपूर्णपणे दूर रहात मुंबईहून दरवर्षी तेथे जाऊन गोर-गरीब गावकर्‍यांची सेवा करण्याचे ‘असिधारा व्रत’ चालवले आहे. मुंबईतील प्रख्यात विल्सन महाविद्यालयात प्राणीशास्त्राचे प्राध्यापक असलेले डॉ. विलास आठवले हे वर्ष १९६६ पासून या देवभूमीतील गावांमध्ये जाऊन वैद्यकीय मदतीपासून कपडे देणे, शिक्षणाची व्यवस्था करणे, तसेच महिलांना स्वतःच्या पायावर उभे रहाता यावे, यासाठी अनेक उपक्रम राबवणे इत्यादी करत आहेत. हे सारे करतांना, ‘निसर्गाला जपा’, असा संदेशही ते गावोगावी देत असतात.

२. डोंगरावरील जंगलांमध्ये अनेक वेळा आगी लावल्या जात असल्याने ती वाचवण्याचा संदेश देणे

येथील डोंगरावरील जंगलांमध्ये अनेक वेळा आगी लावल्या जातात. यामागचे अर्थकारण मोठे असले, तरी जंगल वाचवण्याचा संदेश देण्याचे काम डॉ. आठवले मोठ्या प्रमाणात करत आहेत.

३. आध्यात्मिक उन्नती करतांनाच दुसरीकडे रुग्णसेवेचे व्रत अखंडपणे सुरू ठेवणे

चारधाम आणि हिमालयाचे आकर्षण डॉ. आठवले यांना लहानपणापासूनच असल्यामुळे पी.एच्.डी. करत असतांनाही ते वेळोवेळी या देवभूमीत जात असत. घरातील आध्यात्मिक वातावरण, तसेच चारधाम यात्रेच्या निमित्ताने होणार्‍या साधू-संतांच्या ओळखी यांतून एकीकडे आध्यात्मिक उन्नती करतांनाच दुसरीकडे रुग्णसेवेचे व्रत त्यांनी अखंडपणे सुरू ठेवले. सुरुवातीला म्हणजे वर्ष १९६६ पासूनची काही वर्षे ते एकटेच गावखेड्यांमध्ये फिरून तेथील लहान मुलांना गोळ्या-चॉकलेट देऊन स्वच्छतेचे धडे देत असत. यातूनच गावातील आरोग्याच्या समस्यांची माहिती घेऊन ‘विविध आजार आणि त्वचेच्या आजारांमध्ये कोणती काळजी घ्यायची’, याची माहिती गावकर्‍यांना देऊन उपचारासाठी मदत करत असत.

४. मुंबई विद्यापिठाच्या कुलसचिवांनी सत्कार करणे

विल्सन महाविद्यालयाचे प्राचार्य विश्वास सरवैय्या, प्राध्यापक, तसेच विद्यार्थीवर्गानेही वेळोवेळी त्यांच्या या उपक्रमाला यथार्थ मदत केली आणि प्रोत्साहन दिल्याचे ते आवर्जून सांगतात. विल्सन महाविद्यालयातील प्राध्यापक आणि विद्यार्थी यांना डॉ. विलास आठवले यांच्या कार्याचा अभिमान आहे. ते करत असलेल्या सेवेची दखल घेत मुंबई विद्यापिठाच्या कुलसचिवांनीही त्यांचा सत्कार केला होता.

५. काही विद्यार्थ्यांनी यात सक्रीय सहभाग घेण्यास सुरुवात करणे

साधारणपणे दरवर्षी एप्रिल-मे महिन्यात त्यांचा हा दौरा ठरलेला असतो. त्यापूर्वी ओळखीच्या लोकांकडून या मुलांसाठी कपड्यांची मदत मिळवणे, औषधांची व्यवस्था करणे, तसेच या सर्व गोष्टी तेथील गावांमध्ये योग्य प्रकारे पोहोचतील याची काळजी घेणे, याची व्यवस्था करून डॉ. विलास आठवले हिमालयाच्या कुशीतील गावांमध्ये जातात. साधारणपणे वर्ष १९९० पासून त्यांच्या या कामाने प्रभावित होऊन त्यांच्या काही विद्यार्थ्यांनी यात सक्रीय सहभाग घेण्यास सुरुवात केली. यांतील अनेक जण आज प्रतिष्ठित डॉक्टर, संशोधक, तसेच वेगवेगळ्या क्षेत्रांत चांगल्या प्रकारे स्थिरावले आहेत. परदेशात असलेले अनेक विद्यार्थीही या सेवेला मदत करण्यासाठी सरसावले आहेत.

६. डोंगरातील जंगल भागात पायी जावे लागणार्‍या गावांमध्ये जाऊन तेथील रुग्णांवर उपचार करणे, ही एक तपश्चर्याच असणे 

वर्ष २००१ पासून डॉ. विलास आठवले यांच्या कार्याने खर्‍या अर्थाने आकार घेण्यास सुरुवात केली. जवळपास सहा-सात डॉक्टर दरवर्षी देवभूमीतील गावा-गावांमध्ये जाऊन तेथील गावकर्‍यांच्या आरोग्याची तपासणी करतात. खोड, बांगर, बक्सीर, डांगी आणि घंघासूर अशा आठ ते दहा सहस्र फूट उंचीवरील आणि मुख्य रस्त्यापासून डोंगरातील जंगल भागात ७ ते १४ किलोमीटर पायी जावे लागणार्‍या गावांमध्ये जाऊन तेथील रुग्णांवर उपचार करणे, ही एक तपश्चर्याच म्हणावी लागेल. विख्यात डेंटिस्ट डॉ. महेश कुलकर्णी, डॉ. अमित मराठे, डॉ. विद्याधर गांगण, डॉ. मंदार देवल, डॉ. संजीव पवार, डॉ. राम आणि दीपा साठे, फिजिओथेरपिस्ट गौरी कामत, असे डॉक्टर दिवसेंदिवस रुग्णांना तपासून औषधे देत असतात. या कार्यात विजय लिमये, वरिष्ठ संशोधक म्हणून एका नामांकित कंपनीत काम करणारे विजय करंदीकर, विशाखा कुलकर्णी, मनीषा पवार, किरण पाटील, असे अनेकजण निरलसपणे मदत करत असतात, तसेच रुस्तम मेहता यांनीही तेथील शाळांसाठी काही संगणक दिले. डॉ. विलास आठवले यांनी हरिद्वार, गंगोत्री, तसेच ऋषिकेश येथील अनेक आश्रमांच्या माध्यमातून आरोग्यसेवेचे  जाळे निर्माण केले आहे. या गावांमधील एखाद्याला मोठा आजार असल्यास उपचारासाठी हरिद्वार येथील ‘व्यासाश्रमा’च्या रुग्णालयात उपचारासाठी पाठवले जाते. पुष्कळ मोठा आजार असल्यास दिल्ली अथवा मुंबईत आणून स्वखर्चाने या रुग्णांवर डॉ. विलास आठवले उपचार करतात. काही वर्षांपूर्वी ‘काशीमठ’ संस्थानच्या वतीने त्यांनी ऋषिकेश येथे एक ‘दंतयज्ञ’ केला होता.

७. अनेक गावांमध्ये पिण्यास योग्य असे पाणी नसल्याचे आढळून आले आहे. यासाठी काही गावांमधील पाण्याचे नमुने मुंबईला पाठवून त्यांची तपासणी केल्याचे डॉ. विलास आठवले यांनी सांगितले.

८. व्यासाश्रम आणि भृगु आश्रम यांच्या सहयोगाने अनेक चांगले उपक्रम राबवणे शक्य झाल्याचे डॉ. विलास आठवले यांनी आवर्जून सांगणे

हरिद्वार येथील ८७ वर्षांच्या योगिनी ब्रह्मज्योतीजी या अनेक वर्षे ‘महर्षी भृगु आश्रमा’च्या माध्यमातून आध्यात्मिक आणि सामाजिक कार्य करत आहेत. मुलांसाठी शाळा चालवण्यापासून आरोग्य व्यवस्थेपर्यंत अनेक उपक्रम या आश्रमाच्या माध्यमातून चालवण्यात येत असून व्यासाश्रम आणि भृगुआश्रम यांच्या सहयोगाने अनेक चांगले उपक्रम राबवणे शक्य झाल्याचे डॉ.  विलास आठवले यांनी आवर्जून सांगितले.

९. शिक्षण

आध्यात्मिक क्षेत्रातील अधिकारी असलेले इंदूरचे प.पू. भक्तराज महाराज यांच्या प्रेरणेतून हे कार्य उभे राहिल्याचे डॉ. विलास आठवले यांनी सांगितले. या सार्‍यांच्या बरोबरीने या दुर्गम भागांत काही शाळा चालवण्याचे कार्यही केले जाते. दोन शाळांमधील गणित आणि इंग्रजी या विषयांच्या शिक्षकांचा सर्व खर्च डॉ. विलास आठवले यांच्या माध्यमातून केला जातो. विद्यार्थ्यांसाठी पुस्तके अथवा गणवेश उपलब्ध करून देण्यात येतो. गंगोरी येथील माता सुभद्रा आश्रमाचे प्रमुख स्वामी हरिदास हे कर्नाटकमधील असून अहमदाबादच्या ‘आय.आय.एम्.’ मधून ‘एम्.बी.ए.’ झाले आहेत. गेली नऊ वर्षे निष्ठेने आश्रमाचे कार्य ते पहात आहेत. त्यांच्या माध्यमातून येथील अनेक गावांमध्ये मुलांना दोन तास शिकवण्याचा उपक्रम राबवला जात आहे. यासाठी येथील गावांमधीलच पदवी शिक्षण घेतलेल्या अथवा शिकणार्‍या मुलांना ६०० रुपये पाठ्यवेतन देऊन रोज दोन तास शिकवण्यास सांगितले जाते.

१०. खोड गावातील महिलांना शिलाई यंत्र देऊन स्वयंरोजगाराची व्यवस्था करून देण्यात आली आहे.

११. जंगलसंपत्ती वाचवण्यासाठी ‘सात्त्विक फाऊंडेशन’, या संस्थेची स्थापना करणे

डोंगरावरील जंगलात आगी लागू नयेत, तसेच आगी लागल्यास त्या तात्काळ विझवल्या जाव्यात यासाठी डॉ. विलास आठवले यांनी येथील गावांमध्ये जनजागृती सुरू केली आहे. गावकर्‍यांसाठी बक्षीस योजना चालू करण्यात येणार असून जंगलसंपत्ती वाचवण्याची जबाबदारी गावांवर सोपवण्यात आली आहे. हे काम अधिक योजनाबद्ध रितीने व्हावे म्हणून त्यांनी अलीकडेच ‘सात्त्विक फाऊंडेशन’, या संस्थेची स्थापना केली आहे.

१२. डॉ. विलास आठवले यांची भूमिका त्यांच्या मनाची विशालता दाखवणारी असणे

मुंबईहून सहस्रो मैल दूर जाऊन लोकांची सेवा करण्याचे कार्य आगळेवेगळेच म्हणावे लागेल. शतकानुशतके यात्रेकरूंना मदत करणार्‍यांच्या ऋणातून उतराई होण्याची डॉ. विलास आठवले यांची भूमिका त्यांच्या मनाची विशालता दाखवणारी आहे. हे काम अत्यंत शिस्तबद्धतेने चालते.

१३. गावकर्‍यांना औषधे पाठवणे

गावकर्‍यांना वर्षभर लागणारी औषधे वेगवेगळ्या खोक्यांमध्ये भरून मुंबईहून हरिद्वारच्या व्यासाश्रमात पाठवली जातात. तेथून खोड गावचे श्री. पुष्करसिंग भंडारी हे वेगवेगळ्या आश्रमांमध्ये औषधे पोहोचवण्याचे काम करतात. त्यानंतर डॉ. विलास आठवले, अन्य डॉक्टर आणि सहकारी या गावांमध्ये जाऊन गावकर्‍यांच्या आरोग्याची तपासणी करून औषधोपचार करतात. इतर वेळी दूरध्वनीवरून गंभीर आजारी असलेल्या रुग्णांची व्यवस्था हरिद्वारच्या व्यासाश्रमाच्या रुग्णालयात केली जाते.

१४. डॉ. विलास आठवले यांच्या चालू असलेल्या ‘भगीरथ’ तपश्चर्येची दखल घेऊन उत्तराखंड राज्यानेही या गावकर्‍यांसाठी योजना राबवल्यास त्यांचा खर्‍या अर्थाने विकास होऊ शकेल ! 

जवळपास शून्य तापमान असलेल्या कडाक्याच्या थंडीत जवळपास १० सहस्र फूट उंचावरील जंगलभागातील गावांमध्ये जाऊन तेथील गावकर्‍यांच्या आरोग्य, शिक्षण, कपडे, स्वयंरोजगारासह सामाजिक उन्नतीसाठी डॉ. आठवले यांच्या चालू असलेल्या ‘भगीरथ’ तपश्चर्येची दखल घेऊन उत्तराखंड राज्यानेही या गावकर्‍यांसाठी योजना राबवल्यास त्यांचा खर्‍या अर्थाने विकास होऊ शकेल.’

– संदीप आचार्य, लोकसत्ता (मुंबई, रविवार, ३१.५.२००९)