मधाचा सर्वांत मोठा निर्यातदार असलेल्या ऑस्ट्रेलियाला ५५८ कोटी रुपयांचा तोटा होण्याची शक्यता !

कॅनबेरा (ऑस्ट्रेलिया) – ऑस्ट्रेलिया हा मध निर्यात करणारा जगातील प्रमुख देश आहे. जगभरात सर्वाधिक मध ऑस्ट्रेलियातून पुरवले जाते; परंतु सध्या तेथील मधमाशांच्या पोळ्यांवर ‘व्हॅरोआ माईट’ नावाच्या कीटकाने आक्रमण केल्याने तेथील मधमाशांना संसर्गजन्य रोग होऊन त्या मोठ्या संख्येने मरत आहेत. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला ७ कोटी डॉलर्सचा (५५८ कोटी भारतीय रुपयांहून अधिकचा) तोटा होण्याची शक्यता आहे.

हा कीटक मधमाशांना चिकटतो आणि त्यांचे शोषण करतो. त्यामुळे त्यांची क्षमता न्यून होते अणि त्या अर्धमेल्या होतात. एक कीटकही मधमाशांचे अख्खे पोळे नष्ट करू शकतो. वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे जसे संसर्गजन्य रोग झाल्यावर माणसे स्वतःला इतरांपासून वेगळे करतात, तशा मधमाशाही स्वतःहून अन्य मधमाशांपासून वेगळ्या होतात; परंतु या रोगात या कीटकाचा संसर्ग त्वरित होत असल्याने मधमाशांच्या या विलगीकरणामुळेही फारसा फरक पडलेला नाही.

तेथील सरकारने जैवसुरक्षा उपायांचा भाग म्हणून मधमाशांच्या वसाहती आता ‘लॉकडाऊन’ केल्या आहेत. हे कीटक येथे ४०० ठिकाणी पसरल्याने ऑस्ट्रेलियाने १ कोटींहून अधिक मधमाशा नष्ट केल्या आहेत. त्यामुळे मधाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटणार आहे. बदाम, ब्ल्यू बेरी आदी वनस्पतीही परागीकरणासाठी मधमाशांवर अवलंबून असतात. यामुळे त्यांच्या उत्पादनालाही फटका बसणार आहे.