तिस्ता सेटलवाड विचारवंत कि अविचारवंत ?

वर्ष २००२ मध्ये गुजरात राज्यात झालेल्या दंगलीमध्ये तेथील सरकारला अस्थिर करण्यासाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिवंगत अहमद पटेल यांनी कथित सामाजिक कार्यकर्त्या आणि विचारवंत तिस्ता सेटलवाड यांना ३० लाख रुपये दिल्याचे प्रतिज्ञापज्ञ गुजरातच्या विशेष अन्वेषण पथकाने सत्र न्यायालयात सादर करून त्यांच्या जामिनाला विरोध केला आहे. गुजरात दंगलीच्या प्रकरणात अनेकांना चुकीच्या पद्धतीने अडकवल्याच्या प्रकरणी आतंकवादविरोधी पथकाने तिस्ता सेटलवाड यांना अटक केली असून त्या सध्या कारागृहात आहेत. विशेष अन्वेषण पथकाने सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये सेटलवाड यांनी गुजरात दंगलीच्या वेळी केंद्रात सत्तेत असलेल्या तत्कालीन पक्षाच्या प्रमुखांची भेट घेतल्याचाही गंभीर आरोप केला आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न त्या वेळी करण्यात आल्याचाही आरोप या प्रतिज्ञापत्रामध्ये करण्यात आला आहे. गुजरात दंगलीनंतर काँग्रेसच्या तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांनी नरेंद्र मोदी यांचा ‘मौत का सौदागर’ असा उल्लेख केला होता. विशेष पोलीस पथकाने न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रावरून सामाजिक माध्यमांवर आरोप-प्रत्यारोप चालू झाले आहेत. यामध्ये दिवंगत अहमद पटेल यांचे नाव आल्याने ‘मृत माणसावर आरोप करणे बरे नव्हे’, यापासून ‘सरकार आतंकवादविरोधी पथकाला स्वत:च्या तालावर नाचवत आहे’ असे आरोप होत आहेत. ज्या वेळी हिंदुत्वनिष्ठांच्या विरोधात कारवाई होते, तेव्हा राज्यघटनेचे गोडवे गातांना जी मंडळी थकत नाहीत, ती मंडळी सेटलवाड यांच्यासारख्यांवर कारवाई झाल्यावर मात्र ‘अटक घटनाबाह्य’ अशा प्रकारे टीका करतांना दिसतात. अशांनी न्यायव्यवस्थेचा निर्णय स्वीकारून राज्यघटनेवरील निष्ठा दाखवून द्यायला हवी. तिस्ता सेटलवाड यांच्या कारवाया पहाता त्यांना ‘विचारवंत’ म्हणावे कि ‘अविचारवंत ?’ हे ठरवण्याची वेळ आता आली आहे.

आजकाल स्वत:च्या सोयीचे निकाल आल्यावर राज्यघटनेच्या गोष्टी करायच्या आणि विरोधात निकाल गेला की, केंद्रातील भाजप शासनाला दूषणे द्यायची, ही पुरोगाम्यांची पद्धत झाली आहे. गुजरात दंगलीच्या प्रकरणात सर्वाेच्च न्यायालयाने नरेंद्र मोदी यांना निर्दाेष ठरवले आहे. ‘प्रशासनातील काहींच्या अकार्यक्षमतेचे खापर राज्य सरकारवर फोडता येणार नाही’, असे न्यायालयाने स्पष्ट करूनही काही पुरोगामी मंडळी नरेंद्र मोदी यांना दूषणे देत आहेत. देशातील बाँबस्फोटाच्या प्रकरणात ‘आतंकवादाला धर्म नसतो’ म्हणायचे आणि न्यायालयाने हिंदुत्वनिष्ठांना दोषी ठरवण्यापूर्वीच ‘हिंदु आतंकवाद’ रूढ करायचा, हे पाप काँग्रेसने यापूर्वीच केले आहे. नक्षलवादी कारवायांमध्ये पकडले गेलेले ‘विचारवंत’ आणि मालेगाव स्फोटाच्या आरोपामध्ये अटक केलेले ‘हिंदु आतंकवादी’, असे वेगवेगळे निकष लावणाऱ्या मंडळींमधील तिस्ता सेटलवाड या एक आहेत. आता स्वत:वर वेळ आल्यावर त्याची पिडा काय असते ? याची जाणीव सेटलवाड यांना निश्चितच झाली असेल.

एक नव्हे, अनेक गंभीर आरोप !

थोडे इतिहासातही डोकावून पाहिल्यास, तिस्ता सेटलवाड या काही समाजसेविका नव्हेत, हे आपल्या लक्षात येईल. समाजकार्याऐवजी गुजरात दंगलीचे प्रकरण आणि हिंदूंच्या विरोधात बोलण्यात आणि लिहिण्यात त्यांचे नाव पुढे आहे. अशा मंडळींना पुरस्कार देऊन काँग्रेसने मोठे केले. बरे तिस्ता सेटलवाड यांच्यावरील हा काही पहिला आरोप नाही. गुजरात दंगलग्रस्तांसाठी आलेला निधी लाटल्याचा आरोप त्यांचे सहकारी रईस खान यांनी तिस्ता सेटलवाड यांच्यावर केला आहे. गुजरात दंगलीमध्ये बनावट साक्षीदार उभे करणे, कबरस्तानमध्ये अवैधरित्या थडगी खोदणे असेही आरोप त्यांच्यावर झाले आहेत. गुजरात दंगलग्रस्तांना न्याय देण्याच्या नावाखाली तिस्ता सेटलवाड यांच्या ‘सिटिझन फॉर जस्टीस अँड पीस’ या संस्थेत गोळा झालेला निधी सेटलवाड यांनी स्वत:चे नियतकालिक चालवण्यासाठी वापरल्याचे वर्ष २०१२-१३ मध्ये हिंदु विधीज्ञ परिषदेने दाखवून दिले आहे. बेस्ट बेकरी प्रकरणातील महत्त्वाच्या साक्षीदार यास्मिन बानू आणि जहिरा शेख यांनीही ‘आरोपींना शिक्षा व्हावी, यासाठी तिस्ता सेटलवाड यांनी त्यांना हवी तशी साक्ष देण्यासाठी दबाव आणला’, असा गंभीर आरोप त्यांच्यावर केला होता. तिस्ता सेटलवाड यांच्यावरील आतापर्यंत झालेले गंभीर आरोप पहाता त्यांच्या विश्वासाहर्तेविषयी नक्कीच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

गुजरातच्या दंगलीनंतर तिस्ता सेटलवाड आणि त्यांचे सहकारी यांनी गुजरात सरकारवर टीकेची झोड उठवली होती. गुजरात सरकार अडचणीत येईल, असा तो काळ होता. तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना तत्कालीन पंतप्रधान वाजपेयी यांनी राजधर्म पाळण्याचा उपदेश केला होता. त्या काळात ‘या घटनेमागे काँग्रेसचा हात असू शकतो’, याचा विचारही कुणी केला नसेल. गांधीहत्येनंतर केवळ नथुराम गोडसे ब्राह्मण होते, म्हणून ‘किती ब्राह्मणांचे वाडे जाळले गेले ?’ याचा इतिहास काँग्रेसने कधीच जनतेपुढे येऊ दिला नाही. कोल्हापूरचे भालजी पेंढारकर हे त्याचे चांगले उदाहरण आहे. भारतीय चित्रपटसृष्टीत महत्त्वाचे योगदान देणारे भालजी पेंढारकर यांचा वाडाही त्या काळात जाळला गेला. अशा प्रकारे कितीतरी ब्राह्मणांची घरे काँग्रेस समर्थकांनी जाळली आहेत. इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर झालेल्या दंगलींमध्ये शिखांची झालेली हत्याकांडे आणि जाळपोळ यात तरी वेगळे काय झाले ? आणीबाणीच्या काळात कितीतरी जणांना नाहक कारागृहात डांबण्यात आले. या सर्वांचे काँग्रेसवाल्यांनी परीक्षण करून पहावे. ‘तिस्ता सेटलवाड यांच्याप्रमाणे किती जणांना काँग्रेसने प्रोत्साहन दिले होते आणि आर्थिक साहाय्य केले ?’ हे कधीतरी जनतेपुढे यायला हवे.