NEET Paper Leak : तुमच्यामुळे देशाची अपकीर्ती झाली, कोट्यवधी रुपयांची हानी झाली !

‘नीट’ प्रश्नपत्रिका फुटीतील मुख्य आरोपीचा जामीन अर्ज फेटाळतांना न्यायालयाने फटकारले !

आरोपी डॉ. मनोज शिरुरे

नवी देहली – तुमच्या निंदनीय आणि अवैध कृत्यांमुळे प्रामाणिक विद्यार्थ्यांचा विश्वासघात झाला आहे. दिवसरात्र श्रम करून, तसेच प्रामाणिकपणे अभ्यास करून या विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी सिद्धता केली होती. प्रश्नपत्रिका फुटीमुळे लाखो विद्यार्थ्यांवर परिणाम झाला. तुम्ही लोभ आणि अवैध संपत्ती यांसाठी संपूर्ण परीक्षाच उधळून लावली. तुमच्यामुळे कोट्यवधी रुपयांची हानी झालीच; मात्र देशाची अपकीर्तीही झाली. प्रश्नपत्रिका फुटीच्या टोळीचे हे सर्व सक्रीय सदस्य होते, अशा शब्दांत फटकारत देहलीतील विशेष न्यायालयाने ‘नीट’ प्रश्नपत्रिका फुटीतील प्रमुख आरोपी डॉ. मनोज शिरुरे याचा जामीन अर्ज फेटाळला. तसेच याप्रकरणी अटकेतील सर्व १३ आरोपींची न्यायालयीन कोठडी ६ ऑगस्टपर्यंत वाढवली.

डॉ. शिरुरे याने एका विद्यार्थ्याकडून ५ लाख रुपये घेऊन एप्रिल मासात फुटलेली रसायनशास्त्राची प्रश्नपत्रिका त्याच्या रुग्णालयातच उपलब्ध करून दिल्याचा त्याच्यावर आरोप आहे.